Black day for MahsaAmini 22year-old-woman-mahsa-amini-died-after-arrest-by-iran-morality-police-for-not-wearing-appropriate-hijab | Loksatta

#MahsaAmini साठी ब्लॅक डे!

काय ग, कॉलेजमध्ये काय आज ब्लॅक डे आहे का..हे काय सगळं काळं घालून चाललीएस..” “नाही गं, ते इराणमध्ये त्या मुलीला हिजाबचे नियम पाळले नाही म्हणून मारहाण केली ना त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळ्या जणी आज संपूर्ण काळे कपडे घालून कॉलेजला जायचं ठरवलंय.” कन्येने मागं वळून सुद्धा न पाहता एका श्वासात उत्तर दिलं.

#MahsaAmini साठी ब्लॅक डे!
महसा अमिनी (फोटो- ट्विटर)

प्राची साटम

प्रसंग पहिला

मॉलच्या फूडकोर्टमध्ये कोपऱ्यातल्या एका टेबलवर ती एकटीच बसली होती. त्याची वाट पाहत. इन्स्टाग्राम स्क्रोल करण्याचासुद्धा कंटाळा आला होता तिला. तीच ती गाणी, त्याच त्या रील्स. अंगठा मोबाईल स्क्रीनवर ती यंत्रवत वरखाली करत होती. मधेच एक पोस्ट तिला दिसली. #MahsaAmini लिहिलेली. इराणमध्ये कोण्या एका २० वर्षीय मुलीला हिजाबचे नियम न पाळल्यामुळे तिथल्या ‘संस्कृतीरक्षक’ पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. इराणच्या रस्त्यावर पोलिसांच्या या कथित कृत्याविरोधात निदर्शने करण्यात येत होती. बायका रस्त्यावर उतरून आपला हिजाब आणि चादोर जाळत होत्या. काहीजणींनी तर स्वतःचे केससुद्धा कापले होते. जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत होता या सगळ्याला. ‘आपलं डोकं झाकलं नाही म्हणून त्या मुलीला आपला जीव गमवावा लागला? २० वर्ष म्हणजे माझ्याच वयाची जवळपास. मी तरी मला हवे तसे कपडे घालू शकते, हवं तिथे जाऊ शकते, किती वाईट परिस्थिती आहे इराणमध्ये.’ विचार करता करता तिचं स्क्रोलिंगही सुरुच होतं.

आता स्वत:चं इन्स्टा प्रोफाइल पाहायला लागली, ‘हा चांगला फोटो आहे, यात थोडा प्रकाश जास्त आणि इफेक्ट कमी हवा होता, अजून नॆचरल वाटला असता; हा छान आहे पण मला जॆकेट शिवाय घालायचा होता पण त्याने म्हटलं की तसा छान दिसेल; त्या दिवशीचा तो साडीमधला फोटोसुद्धा चांगला आला असता. पण ब्लाउजच्या डीपनेक वरून किती सुनावलं त्याने मला. नंतर स्वतःच समजावणीच्या सुरात म्हणाला, बघ मला काही प्रॉब्लेम नाहीये अग, पण या बाकीच्या पुरुषांवर विश्वास नाहीये माझा. मी चांगलं ओळखून आहे सगळ्यांना. सुंदर मुलगी दिसली की लगेच तिच्या मागे, मग तिच्या कपड्यांबद्दल काय काय बोलणार, मला नकोय कोणी माझ्या गर्लफ्रेंडबद्दल असं बोललेलं, बाकी तू घाल ग तुला हवे तसे कपडे.’ “काय मॅडम, लक्ष कुठेय, कधीचा येऊन बसलोय तुझ्या शेजारी आणि तो समोरचा मुलगा मगासपासून तुला टक लावून पाहतोय, ते तरी ध्यानात आलंय का तुझ्या, म्हणून मी सांगत असतो तुला ते स्लिव्हलेस टॉप नको घालत जाऊस. मुलांची नजरच वाईट. चल आता, फिल्मची वेळ झाली. ” हसत हसत त्याने तिचा हात पकडला. तीसुद्धा त्याच्यासोबत चालायला लागली. बाजूच्या खुर्चीवर ठेवलेलं जॆकेट घालून.

प्रसंग दुसरा

आठवड्यातल्या मधल्या दिवसाची नेहमीच्या धावपळीची सकाळ. सगळ्यांची घर सोडून आपापल्या ठिकाणांवर जायची घाई, कोणी ऑफिसला तर कोणी कॉलेजला. किचनमध्ये सगळ्यांचे जेवणाचे डबे भरुन ठेवत असताना आईचे डोळे समोरच्या घड्याळाकडे होते, तिला कालसारखी नेहमीची फास्ट लोकल चुकवायची नव्हती. तिच्या कानांचा ताबा मात्र आज्जीने घेतला होता. काहीतरी कुजबुजत होती ती तिच्या कानाशी, दबक्या आवाजात. तेवढयात आईची नजर तिच्या कॉलेजकन्येकडे गेली. “काय ग, कॉलेजमध्ये काय आज ब्लॆक डे आहे का..हे काय सगळं काळ घालून चाललीएस..” “नाही गं, ते इराणमध्ये त्या मुलीला हिजाबचे नियम पाळले नाही म्हणून मारहाण केली ना त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळ्या जणी आज संपूर्ण काळे कपडे घालून कॉलेजला जायचं ठरवलंय.” कन्येने मागं वळून सुद्धा न पाहता एका श्वासात उत्तर दिलं. “असे कसे पण गं स्वप्नात आले अचानक, मला रात्रभर झोप नाही. सारखी आपली भीती की खरंच इथे आले तर नाही ना.” “कोण आले नाही आज्जी?”नातीने तिचा काळा दुपट्टा गळ्याभोवती गुंडाळत विचारलं. “हे गं. स्वप्नात आले होते माझ्या. हल्ली येतातच मधेमधे.” भेदरलेल्या चेहऱ्याने आज्जीने भिंतीवर लटकवलेल्या आजोबांच्या तसबिरीकडे बोट दाखवून म्हटलं. “मग चांगलंय ना आजोबा स्वप्नात आले तर, मिस करत असतील तुला.” नात मिश्किलपणे म्हणाली. “माझी आठवण येतेय की तिथे बसून मला मारता येत नाही याची ते देवच जाणे. काल आलेले माझ्या स्वप्नात, पूर्वीसारखे हातात मिळेल ते घेउन मारायला मला. आणि मी माझा जीव मुठीत धरुन धावत होते. पायाला मिळेल ती वाट पकडून. कधी संपणारेय हे चक्र काय माहित.” “चिल… आज्जी, घाबरु नकोस. आता कोण येणारेय मारायला, आहोत ना आम्ही सगळे.” असं म्हणत ती कॉलेजकन्या मनगटाला काळी फित बांधून पसार झाली. आज्जी मात्र त्याच भेदरल्या डोळ्यांनी खिडकीबाहेर बघत स्वतःशीच पुटपुटली, “बाईसाठी रडायला खूप येतात, पण बाईचं रडं पुसायला मात्र चिटपाखरु पण नसतं!”

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘वजेशियल’ – ‘त्या’ ठिकाणचं ‘फेशियल’!

संबंधित बातम्या

लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?
प्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…
यशस्विनी, करिअर : जपानच्या महिला क्रिकेट टीममध्ये चक्क मराठी मुलगी! (उत्तरार्ध)
अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?
Gujarat Election : १६२१ उमेदवार; त्यातील महिला फक्त १३९!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत
“सलमानच्या गाडीला…” अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट
IND vs BAN: आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास! बांगलादेशने जिरवली आणि रोहित सेनेच्या खिशाला कात्री
‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता सोशल मीडियावर मागतोय नोकरी; बायोडेटा शेअर करत म्हणाला…
तीन महिन्यांपूर्वी मावशीचं झालं निधन, अमृता खानविलकर भावूक होत म्हणाली, “कारण तिला मी…”