हॅशटॅग मी टू चळवळ, कास्टिंग काऊच हे शब्द कलाक्षेत्रामध्ये काही नवीन नाहीत. चित्रपटात काम मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो असं काही अभिनेत्रींनी बऱ्याचदा स्पष्टपणे सांगितलं. कास्टिंग काऊच हा प्रकार आता बंद आहे असं कितीही कोणीही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी वास्तव बदललेले नाही. कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणं बॉलीवूडमध्ये वेळोवेळी उघडकीस आली आहेत.

आजही चित्रपटसृष्टीमध्ये पुरुष आणि महिला असा भेदभाव केला जातो हे कास्टिंग काऊचच्या काही प्रकरणांवर नजर टाकली की लक्षात येतं. अनेकदा तर कास्टिंग काऊचचे आरोप झाले की तात्पुरती यावर चर्चा होते. काही काळ गेला की वातावरण पुन्हा ‘जैसे थे’ होते. पुन्हा एकदा नवी घटना उघड  होईपर्यंत कास्टिंग काऊच हा शब्दही पडद्याआड जातो.

sai tamhankar will next seen in the farhan akhtar dabba cartel
सई ताम्हणकर पुन्हा गाजवणार बॉलीवूड! ‘भक्षक’नंतर आता ‘डब्बा कार्टेल’मध्ये झळकणार, पहिली झलक आली समोर
future players in indian cricket team
विश्लेषण : टीम इंडिया ‘जनरेशन नेक्स्ट’ कशी असेल?
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
Sangeet Natak Academy Award announced to veteran actor Ashok Saraf for his performance in the field of theatre
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

एरव्ही सोशल मीडियाद्वारे इतर विषयांवर स्पष्टपणे बोलणारे कलाकार बॉलिवूड कास्टिंग काऊचमुक्त व्हावे म्हणून ठोस कृती का करत नाहीत? कृती तर सोडाच ते ठामपणे बोलतही नाहीत. काही अभिनेत्रींनी तर अगदी बिनधास्तपणे कास्टिंग काऊचबाबत खुलेपणाने बोलणं पसंत केलं. अर्थात काही काळापुरतीच चर्चा झाली पण काही सत्यघटनाही यामुळे समोर आल्या.

ईशा कोप्पिकर
अभिनेत्री ईशा कोप्पिकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ईशाने एका मुलाखतीदरम्यान कास्टिंग काऊचचा तिला आलेल्या अनुभवाबाबत सांगितले. ईशा म्हणाली, “२००० साली मला एका प्रसिद्ध निर्मात्याने बोलावले होते. त्यावेळी त्याने मला सांगितले की, तुला नायकाच्या नजरेत चांगले असायला हवे. त्यावेळी त्याला नेमकं काय म्हणायचे होते हे मला समजत नव्हते.”

“त्यानंतर मी त्या अभिनेत्याला फोन केला. त्यावेळी त्याने मला एकटीला भेटण्यासाठी बोलावले होते. पण त्यानंतर मी निर्मात्याला फोन केला आणि सांगितले की मी माझ्या कामामुळे आणि लूकमुळे इथपर्यंत आली आहे. जर मला त्यातून चांगले काम मिळाले तर ते खूप उत्तम होईल. पण माझ्या या उत्तराचा थेट परिणाम माझ्या करिअरवर झाला. मला अनेक चित्रपटांसाठी नकार मिळाला.”

मल्लिका शेरावत
अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या हिंदी चित्रपटापासून दूर आहे. पण काही दिवसांपूर्वी तिने कास्टिंग काऊचबाबत स्पष्टपणे सांगितलं. ” ए लिस्टमधील सगळ्याच अभिनेत्यांनी माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला. कारण मला कोणत्याच गोष्टीमध्ये तडजोड करणं योग्य वाटत नव्हतं. जी अभिनेत्री त्यांच्या दबावामध्ये राहील त्याच अभिनेत्री या कलाकारांना आवडायच्या. पण मी तशी नाही. माझं व्यक्तिमत्त्व त्या पद्धतीचं नाही.”

“इतरांच्या इच्छेनुसार मी वागू शकत नाही. जर एखाद्या अभिनेत्याच्या चित्रपटामध्ये तुम्ही काम करत आहात आणि त्याने तुम्हाला रात्री तीन वाजता फोन करून घरी बोलावलं तर तुम्हाला जावं लागतं. त्याचवेळी तुम्ही त्याच्या घरी गेला नाहीत तर चित्रपटामधून तुम्हाला बाहेर काढलं जाणार हे नक्की.” असं मल्लिकाने स्पष्ट शब्दात सांगितलं.

नीना गुप्ता
बॉलिवूडमधील बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता यांनी उत्तम काम केलं. आहे. नीना यांच्या जीवनावर आधारित ‘सच कहूँ तो’ पुस्तकही प्रकाशित झालं आहे. त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून कास्टिंग काऊच बाबात भाष्य केले आहे. नीना मुंबईच्या जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होत्या. हातातलं काम संपावून त्या एका निर्मात्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचल्या. पण जेव्हा निर्मात्याने नीना यांना हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटण्याऐवजी त्याच्या रूममध्ये बोलावले तेव्हा त्यांना विचित्र वाटलं. आपण अनेक अभिनेत्रींना काम करण्याची संधी दिली आहे असं त्या निर्मात्याने नीना यांना सांगितलं. चित्रपटामध्ये माझी भूमिका काय? असं नीना यांनी त्यावेळी त्या निर्मात्याला विचारलं.

यावेळी तो म्हणाला, मुख्य अभिनेत्रीच्या मैत्रिणीची भूमिका तुला साकारावी लागेल. त्यानंतर नीना यांनी तिथून निघत असल्याचं निर्मात्यांना सांगितलं. तर, निर्माता म्हणाला, “तू कुठे जातेस? तू इथे रात्रभर नाही राहणार?” हे ऐकताच नीना यांचे शरीर थंड पडले. त्याक्षणी त्या लगेच तिथून निघाल्या. ही संपूर्ण घटना नीना यांनी ‘सच कहूं तो’ या त्यांच्या पुस्तकामधून सांगितली आहे. 

ईशा गुप्ता
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ताला देखील कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागलं. “दोन व्यक्तींसोबत मला हा अनुभव आला आहे. त्यापैकी एका अभिनेत्याबरोबर मी चित्रपट केला. त्यांना वाटलं की माझ्याबरोबर चांगलं बोलून माझ्याच रुममध्ये जाऊ. पण मी हुशार होते. मी म्हणाले, मी एकटी रुममध्ये झोपणार नाही. मी माझ्या मेकअप आर्टीस्टला माझ्यासह रुममध्ये झोपायला सांगायचे. तेव्हा मी अनेकांना कारण दिलं मी घाबरते, त्यामुळे मी इथे एकटी झोपू शकणार नाही. पण प्रत्यक्षात मला कोणत्या भूताची भीती नव्हती तर त्या माणसांची भीती वाटत होती. मी एका व्यक्तीचे घाणेरडे रूप पाहिले होते, त्यामुळे मी खूप घाबरले होते,” असे ईशाने एका मुलाखतीदरम्यान अगदी सांगितले.

“एक वेळ अशी होती की चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना मध्येच मला निर्मात्याने सांगितले की त्याला मी चित्रपटात नको आणि ही संपूर्ण घटना चित्रीकरणाला पाच  दिवस झाल्यानंतरची आहे. मी त्याच्यासह शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्यांना मला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी द्यायची नव्हती.” अशाप्रकारचा धक्कादायक खुलासा ईशाने केला. 

सुरवीन चावला
हिंदी मालिका, चित्रपटांमुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे सुरवीन चावला. सुरवीनने कास्टिंग काऊचबाबत काही धक्कादायक खुलासे केले. सुरवीनने एक-दोन वेळा नाही तर पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाल्याचं सांगितलं. ‘मी एकदा नाही तर तब्बल पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाले आहे. एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने माझ्या शरीराचा इंच न् इंच पाहण्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर अनेकांनी माझ्या वजनामुळे सुद्धा मला नाना प्रकारचे प्रश्न विचारले होते’, असं सुरवीन म्हणाली होती.

‘बॉलिवूडमधील दोन दिग्दर्शकांनी तर चक्क मला अंगप्रदर्शन करण्यास सांगितलं होतं. हा प्रकार माझ्यासाठी प्रचंड मनस्ताप देणारा होता.’ सुरवीनबरोबर घडलेली ही विचित्र घटना तिच्यासाठी फारच त्रासदायक होती. आता कुठे अभिनेत्री बोलत्या झाल्या आहेत… पण आता गरज आहे ती, ठोस आणि ठाम कृतीची!