भाग्यश्री फडके धर्माधिकारी
काय खाल्ल्याने हाडे पोलादी बनतील? हाडे ही पूर्णतः घनपदार्थ नसतात तर त्यांच्या पेशींमध्ये लहान जागा आणि बाह्य पेशी मॅट्रिक्स देखील असते. काही जागांतून रक्तवाहिन्या धावतात ज्यांमधून हाडांच्या पेशींना पोषण मिळते. इतर जागा या लाल अस्थिमज्जा(redbonemarrow)साठवण्याची ठिकाणे असतात. हाडांमध्ये मधल्या जागा कशा विभागल्या आहेत त्याप्रमाणे कणखर, दाट अस्थि आहेत की (स्पंजसारखी)सुषिर अस्थि आहेत हे ठरते. सांगाड्यामध्ये ८०% कणखर अस्थि तर २०% सुषिर अस्थि असतात.
कणखर हाडांच्या उती- या हाडांच्या उती सर्वांत टणक व कणखर असतात. या उती हाडांच्या बाहेरील भागात आढळतात आणि लांब हाडांचा महत्त्वाचा घटक असतात. हाडांच्या कणखर उती संरक्षण व आधार देतात, तसेच वजन वा हालचालीमुळे आलेल्या ताणाला प्रतिरोध करतात. कणखर हाडे ऑस्टिओनचे वा अस्थिक कोषाचे बनलेले असतात.(Osteon)हाडांच्या मुख्य संरचनेचा व कार्याचा एक सूक्ष्म घटक आहे. तर सुषिर अस्थि हाडांच्या आतील भागात असतात. त्यावर कणखर अस्थि असतात. कल्पना करा- वृक्षाच्या आतील भागात कशी वर्तुळे दिसतात तशीच हाडे आतून दिसतात.
हाडांची निर्मिती
हाडे निर्माण होण्याच्या प्रक्रियेला अस्थीभवन म्हणतात(ossification/osteogenesis) ही मानवी शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये शरीरातील पेशी ऑस्टिओब्लास्ट्स नवीन हाडांची निर्मिती करतात किंवा हाडांची वाढ आणि खनिजीकरण होते. हाडांची निर्मिती चार परिस्थितींमध्ये होते. सुरुवातीला भ्रूण, अर्भक अवस्था असताना हाडांची निर्मिती होते, हाडांची वाढ व विकास तान्हेपणी, बालपणी आणि पौगंडावस्थेत प्रौढ होईपर्यंत होते, हाडांचे रिमॉडेलिंग(जुनी हाडे जाऊन नवीन हाडे निर्माण होणे)आयुष्यभर सुरू असते, हाडे मोडल्यावर फ्रॅक्चर दुरुस्ती आयुष्यभर सुरू असते.
भ्रूण आणि अर्भक, नवजात बालकांमधील सुरुवातीचे हाडांचे निर्माण
हाडांचा साधारण आकार प्राप्त होण्यासाठी, एक जागा असते जिथे कूर्चाचे निर्माण आणि ऑसिफिकेशन या प्रक्रिया भ्रूण अवस्थेत सहाव्या आठवड्यात चालू होतात. हाडांच्या निर्मितीमध्ये उतींचे हाडांमध्ये रुपांतर होत असते. हाडे कूर्चाच्या आतमध्ये तयार होतात जे मूळ पेशींपासून बनलेले असते. कवटीची हाडे, चेहऱ्याची हाडे, हनुवटीची, जबड्याची हाडे तयार होतात. ऑस्टियोप्रोजेनिटर पेशी किंवा ऑस्टियोजेनिक पेशी (हाडांच्या मूळ पेशी) सुरुवातीला निर्माण होतात. त्यांपासून पुढे ऑस्टिओब्लास्ट पेशी निर्माण होतात. ऑस्टिओब्लास्ट पेशी हाडांचे बाह्यपेशी मॅट्रिक्सचा स्त्राव तयार करतात आणि त्याभोवती जमा होतात.
कॅल्सिफिकेशन प्रक्रिया सुरू झाल्यावर बाह्यपेशी मॅट्रिक्सचे स्रवणे थांबते आणि ऑस्टिओसाइट, अस्थिकोश किंवा अस्थी पेशी पोकळीत सर्वत्र पसरतात. काही दिवसांनी कॅल्शियम आणि इतर खनिज क्षार त्याजागी जमा होतात आणि बाह्यपेशी मॅट्रिक्स कडक होत जाते. तिथून पुढे सुषिर अस्थि तयार होतात.त्याला जोडून रक्त वाहिन्यांचे जाळे तयार होते. पुढे हाडांची निर्मिती होते.कणखरअस्थिचा पातळ थर सुषिर अस्थिच्या जागेवर निर्माण होतो; परंतु सुषिर अस्थि मध्य भागी राहतात. नंतर कूर्चाचे हाडांमध्ये रुपांतर होते.
बहुतांशी हाडे अशाचप्रकारे तयार होतात.जिथे हाडांची निर्मिती व्हायची असते तिथे रासायनिक संदेश जातात आणि मूळ पेशी त्या भागात गर्दी करतात आणि भविष्यातील हाडांचे आकारमान तयार करतात. मूळ पेशी कास्थिजनक पेशीमध्ये(chondroblast)बदलतात आणि या पेशी लवचिक बाह्य पेशी मॅट्रिक्स तयार करतात. त्याचीच पुढे लवचिक हाडांचे प्रतिरूपे बनतात. पेशी सतत विभाजन होऊन लवचिक हाडांचे प्रतिरूप लांबीने वाढत जाते. त्यात बाह्य पेशी मॅट्रिक्सचे स्राव मिसळले जातात आणि संयुग तयार होते.
नवजात बालक, लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये हाडांची वाढ विकास
अर्भकावस्थेत, बालपण आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये हाडे रुंदीने संपूर्ण शरीरभर वाढत असतात. लांब होणाऱ्या हाडांची लांबी वाढते. हाडांच्या लांबीमध्ये वाढ- लांब हाडांची वाढ दोन प्रकारे होते. एक कूर्चामध्ये आणि दुसरी कुर्चांचे रुपांतर हाडांमध्ये होते.
बोन रिमॉडेलिंग
त्वचेप्रमाणे हाडेसुद्धा जन्म होण्याच्या आधीच निर्माण होतात आणि सतत तेव्हापासून पुनर्निर्मित होत असतात. बोन रिमॉडेलिंग म्हणजे हाडांची पुनर्रचना प्रक्रियेत जुनी हाडे बदलून त्या जागी नवी हाडे निर्माण करणे. त्यात हाडांची पुनर्रचना, खनिजे आणि कोलाजन तंतुमय पदार्थ यांना हाडांतून ऑस्टिओक्लास्ट पेशी काढून टाकतात आणि नवीन हाडांचे थर हाडांवर जमा होतात. हाडांच्या विघटनामुळे हाडांचे पेशी बाह्यमँट्रिक्स नष्ट होते. तर हाडांच्या निर्मितीमुळे हाडांचे पेशी बाह्यमँट्रिक्स तयार होते. हाडांच्या पुनर्रचेनेचे अनेक फायदे असतात. हाडांना जेवढे कष्ट जास्त पडतात तेवढी हाडे मजबूत होतात. नवीन निर्माण झालेल्या हाडांना जड वजने उचलण्याचे काम असेल तर ती जुन्या हाडांपेक्षा अधिक टणक व मजबूत होतात. हाडांना जेवढा ताण बसतो तसे आकारमानसुद्धा बदलू शकते. त्यामुळे नवीन निर्माण झालेली हाडे जुन्यांपेक्षा फ्रॅक्चर होण्यापासून वाचवतात.
हाडांच्या वाढीसाठी आणि बोन रिमॉडेलिंग साठी लागणारे घटक
हाडांच्या वाढी आणि निर्मितीसाठी आहारातील खनिजे, जीवनसत्त्वे शिवाय बरीच संप्रेरके लागतात. खनिजे- हाडांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरसची आवश्यकता असते, तर मॅग्नेशियम, फ्ल्यूराइड, मँगनीज कमी प्रमाणात आवश्यक असतात. हाडांच्या पुनर्रचनेसाठी सुद्धा खनिजांची आवश्यकता असते.
जीवनसत्त्व: अ जीवनसत्त्वामुळे ऑस्टिओब्लास्ट पेशींचे कार्य सुरू होते. क जीवनसत्त्व कोलाजन निर्मितीसाठी आवश्यक असते. ड जीवनसत्त्व हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. कारण ते अन्नातून कॅल्शियम शोषून घेते. क जीवनसत्त्व आणि बी १२ जीवनसत्त्वसुद्धा अस्थि प्रथिने निर्मितीसाठी आवश्यक असतात.
संप्रेरके: लहानपणी, हाडांच्या निर्मितीसाठी संप्रेरके लागतात ती म्हणजे इन्सुलिनलाइक ग्रोथ फँक्टर(IGF) जे यकृत आणि अस्थि उती निर्माण करतात. इन्सुलिनलाइक ग्रोथ फँक्टर ऑस्टिओब्लास्ट पेशी निर्माण करतात. वाढीची संप्रेरके इन्सुलिनलाइक ग्रोथ फँक्टर निर्माण करतात. पौगंडावस्थेत लैंगिक संप्रेरके हाडांच्या निर्मितीमध्ये नाट्यमय पद्धतीने परिणाम करतात. इस्ट्रोजन आणि अँड्रोजन अंडाशय आणि वृषणातून निर्माण होतात. ही संप्रेरके ऑस्टिओब्लास्ट पेशीची क्रिया वाढवतात.त्यामुळे पौगंडावस्थेत मुलांची अचानक वाढ झालेली दिसून येते. मुलांच्या सांगाड्यामध्ये बदल होतात, हाडांची लांबी वाढते आणि थांबते, मुलींमध्ये इस्ट्रोजन जास्त असल्याने हाडांची लांबी लवकर थांबते. म्हणजेच मुलींची उंची आणि शारीरिक वाढ मुलांपेक्षा लवकर होते. तर प्रौढपणी लैंगिक संप्रेरके हाडांचे विघटन कमी करून हाडांच्या पुनर्रचेनेमध्ये योगदान देतात, तसेच नवीन हाडांच्या निर्मितीस प्रेरणा देतात. इस्ट्रोजन विघटन कमी करून ऑस्टिओक्लास्ट पेशी नष्ट करतात.
गुडघ्यासाठी उपयुक्त आहार: महिलांमध्ये चाळिशीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो.महिलांनी शारिरीक श्रमाची कामे केल्याने वयाच्या उत्तरार्धात गुडघे अक्षरशः झिजून जातात.त्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश आवश्यक आहे. नाचणीसारखा पदार्थ शरीराला विशेषतः हाडासाठी खूपच उपयुक्त आहे. नाचणी, काळे व पांढरे तीळ, शेवग्याच्या शेंगा, शेवग्याचा पाला.
नाचणी: नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक (प्रति १००ग्रॅममध्ये सुमारे ३४४ मिग्रॅ)असते. शरीरातील हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि दात मजबूत करण्यासाठी नाचणी अत्यंत आवश्यक आहे. ऑस्टिओपोरोसिस(हाडे ठिसूळ होणे) या आजाराचा धोका यामुळे कमी होतो.
हाडांसाठी खास आहार
राजगिरा- राजगिऱ्यामध्ये गव्हाच्या तुलनेत तब्बल ४ पट जास्त कॅल्शियम असते. प्रति १०० ग्रॅम राजगिऱ्यात सुमारे १५९ मिग्रॅ कॅल्शियम आढळते. वाढत्या वयातील मुलांच्या हाडांच्या विकासासाठी, गरोदर महिलांसाठी आणि वृद्धांमधील ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) या आजाराचा धोका कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम अन्न आहे.
तीळ- हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आणि ऑस्टिओ आर्थरायटिस (सांधेदुखी/गुडघेदुखी)मधील जळजळ व वेदना कमी करण्यासाठी हे खनिज मिश्रण अत्यंत प्रभावी ठरते.
शेवगा- शरीरातील अंतर्गत सूज कमी करून हे संधिवात, गुडघेदुखी आणि सांध्यांच्या जुनाट वेदनांपासून खूप मोठा आराम मिळवून देतात. या सर्वांचा आहारात नेहमी समावेश करावा.
(लेखिका औषध निर्माण शास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक आहेत.)
bhagyashri1@zohomail.in
