श्रमजीवी महिला संस्थेने एक वर्षापूर्वी ‘बुक क्लब’ हा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून नाशिकमधील वस्ती परिसरातील काही मुली तसेच आदिवासी बहुल हरसूल परिसरातील कडवळीपाडा, घनशेत, खर्डेपाडा, बोर्डेपाडा, पळशी, आगपिटी, गावंद या ठिकाणी १० ते १८ वयोगटातील २०० हून अधिक मुली या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या. यामध्ये घरकामगार, कचरा वेचक, असंघटित क्षेत्रातील कष्टकरी एकल महिलांच्या मुलींचा समावेश आहे.
पुस्तके, वह्या, दप्तरांसह छान सजवलेला वर्ग… कौलारू खोली… पण अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे सर्व प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही. आजही शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित असणाऱ्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. शहर असो वा ग्रामीण, आदिवासी दुर्गम परिसर, शिक्षणाचा गुंता सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील असंघटीत महिला कामगारांसाठी काम करणाऱ्या श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेने पुढाकार घेत ‘बुक क्लब’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्या द्वारे शिक्षणापासून वंचित असलेल्या महिलांच्या हाती पुन्हा पुस्तक दिलं आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशोत्सवाचे कवित्व सुरू असताना आजही आदिवासी पाडे, ग्रामीण भाग, शहरातील काही मुले व मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर फेकली गेली आहेत. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, कारणे वेगळी. याबाबत श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने काही ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. घरात तीन-चार मुली आहेत.
गरजेपुरता लिहिता वाचता आल्यावर मुलींना शेतमजुरी, घरकाम, कामगार म्हणून कामावर पाठविण्यात आले. काहींना एकल पालकत्वामुळे आलेला ताण, आर्थिक परिस्थिती, शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नसणे… तसेच मुलगी चार भिंतीच्या आतच बरी… अशा कारणांमुळे काही जण आजही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचे संस्थेच्या माया खोडवे सांगगतात. यामध्ये कित्येक मुली केवळ शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नाही म्हणूनही कुठलीतरी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर घरी बसल्या आहेत. हीच स्थिती शहरातील झोपडपट्टी परिसरातही दिसून येते. वस्ती परिसरातील वातावरण मुळात गढुळ. मुलींची सुरक्षा ही आई-वडिलांसाठी चिंतेची बाब, त्यात शिक्षणासाठी पैसा ही चैन त्यांना परवडण्यासारखी नाही. ओळखीपाळखीतून जुने शैक्षणिक साहित्य, उधारउसनवारीत शैक्षणिक शुल्क मिळते तोपर्यंत शाळा सुरू राहते. परंतु ही मदत थांबली की शिक्षण थांबते हा आजवरचा अनुभव…
या पार्श्वभूमीवर श्रमजीवी महिला संस्थेने एक वर्षापूर्वी ‘बुक क्लब’ हा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून नाशिकमधील वस्ती परिसरातील काही मुली तसेच आदिवासी बहुल हरसूल परिसरातील कडवळीपाडा, घनशेत, खर्डेपाडा, बोर्डेपाडा, पळशी, आगपिटी, गावंद या ठिकाणी १० ते १८ वयोगटातील २०० हून अधिक मुली या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या. यामध्ये घरकामगार, कचरा वेचक, असंघटित क्षेत्रातील कष्टकरी एकल महिलांच्या मुलींचा समावेश आहे.
आठवी, नववीपर्यंत कशातरी शिकणाऱ्या मुलींना महाविद्यालयीन शिक्षण कठीण वाटत होते. परंतु या संस्थेने मदतीचा हात दिल्याने पैशांअभावी महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग अडलेल्या आठ मुली यंदा अकरावीत प्रवेश घेत आहेत. दुसरीकडे, गावातील १० ते १८ वयोगटातील मुलींसाठी कौशल्य विकास योजना राबवली जात आहे. याद्वारे वाचन, गणित, इंग्रजी यावर भर देण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला कौशल्य वाढीसाठी प्रयत्न होत आहे. या काळात संस्थेच्या वतीने वह्या, पुस्तके यासह अन्य शैक्षणिक साहित्य दिले जात आहे.
गावातील लोकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व रुजावे, यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. हरसुलमधील आठ मुली दहावी उत्तीर्ण झाल्या. मात्र दहावीचे शैक्षणिक शुल्क तसेच पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च ज्यांना परवडणारा नव्हता, अशा आठ मुलींचे थकित शुल्क भरत या मुलींना अकरावी प्रवेशासाठी मार्ग खुला केला आहे. याशिवाय २० मुली या शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आहे. ‘‘शिक्षण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, पण पैसा नसल्याने शिक्षणाची गाडी अडून राहिली हाेती, पण आता बुक क्लबमुळे अकरावी प्रवेश घेता येईल आणि पुढच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होईलश्’’ असं या मुली सांगतात.