भाग्यश्री फडके धर्माधिकारी
अलका डॉक्टरांकडे गेली असता तिने डॉक्टरांनाचं प्रश्न विचारला, ‘‘अहो डॉक्टर, मला सांगा रोग का होतात?’’ त्याच्या उत्तरादाखल अलकाला शरीर कसे कार्य करते हे डॉक्टर समजावून द्यायला लागले. “शरीरातील सर्व संस्था काम करण्यासाठी केमिस्ट्री म्हणजेच रसायने आपल्या आयुष्याचा आणि शरीराचा अविभाज्य भाग आहे. मागच्या भागात शरीरातील पेशी, उती, अवयव, संस्था कशा काम करतात ते आपण पाहिले. केमिस्ट्री शिवाय कुठलीही क्रिया होऊ शकत नाही. शरीरातही केमिस्ट्री असतेच की. आपल्या शरीराची योग्य केमिस्ट्री जुळली आणि समजून घेतली की आरोग्य चांगलं राहतं.”

कोणताही रासायनिक पदार्थ जर घेतला तर त्याच्या तीन स्थिती पाहायला मिळतात- घन, द्रव आणि वायू स्वरुपात. तसेच शरीरातदेखील रासायनिक पदार्थ तिन्ही स्वरुपात आपल्याला दिसून येतात. उदा. घन पदार्थ म्हणजे हाडे किंवा दात. अशांना विशिष्ट आकार व घनता असते. द्रव पदार्थ म्हणजे- रक्तातील प्लास्मा. यांना घनता असते; परंतु आकार मात्र पात्राचा घेतात. वायूरुपात जसे की- प्राणवायु वा कार्बन-डाय-ऑक्साइड यांना आकार वा घनतादेखील नसते. शरीरात आढळणारे घटक जसे- कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व त्यांचे कार्य आपण समजून घेऊ या आणि त्यांचा योग्य समतोल कसा राखायचा हेही लक्षात येईल.

कर्बोदके म्हणजे काय?

शर्करा, ग्लायकोजन, पिष्टमय पदार्थ आणि सेल्युलोज ही कर्बोदकांची काही उदाहरणे आहेत. आकाराने मोठे आणि वैविध्य असलेली कर्बोदके त्यांचे शरीरातले कार्यसुद्धा वैविध्यपूर्ण आहे. कर्बोदके शरीराच्या वस्तुमानाच्या २ ते ३% इतकीच असतात. कर्बोदके आपल्या चयापचय क्रियेसाठी लागणारी रासायनिक ऊर्जा पुरवतात. शरीर रचनेसाठी थोडीच कर्बोदके वापरली जातात. उदा. डिऑक्सिरायबोज ही एक प्रकारची शर्करा आहे जिच्या रचनेपासून जनुकीय माहितीचा स्त्रोत असलेला डीएनए बनतो. कर्बोदकांमध्ये कर्ब, हायड्रोजन आणि प्राणवायुचा समावेश असतो. कर्बोदकांचे त्यांच्या आकारमानानुसार तीन मुख्य गट असतात मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स. त्यातील मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स यांना साधी शर्करा म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा

मोनोसॅकराइड्स म्हणजे एक शर्करेचा रेणू असलेले आणि डायसॅकराइड्स म्हणजे दोन शर्करेचे रेणू असलेले आणि पॉलिसॅकराइड्स म्हणजे अनेक शर्करेचे रेणू एकमेकांशी जोडलेली संयुगे असतात. तीन कार्बन असणाऱ्या मोनोसॅकराइड्सना ‘ट्रायोज’ म्हणतात. चार कार्बन असणाऱ्या मोनोसॅकराइड्सना ‘टेट्रोज’ म्हणतात. पाच कार्बन असणाऱ्या मोनोसॅकराइड्सना पेंटोज, सहा आणि सातना अनुक्रमे- हेक्सोज आणि हेप्टोज म्हणतात. पेंटोजची उदा. म्हणजे- डिऑक्सिरायबोज आणि रायबोज. हे दोन्ही रेणू, जनुकीय माहिती साठवणारे डीएनए आणि आरएनएच्या निर्मितीत हातभार लावतात. हेक्सोजची उदा. म्हणजे- ग्लुकोज, फ्रक्टोज आणि गॅलॅक्टोज. आपण खाल्लेल्या अन्नातून शरीरात ग्लुकोज तयार होते. ग्लुकोज आपल्या शरीरातील उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. एटीपीच्या(ATP) म्हणजे उर्जेच्या निर्मितीला चालना देऊन पेशींना ऊर्जा पुरवते. फळांमधून आपल्याला फ्रक्टोज मिळते आणि दुग्धजन्य पदार्थांपासून गॅलॅक्टोज मिळते.

डॉक्टर सांगू लागले, “डायसॅकराइड्स ही दोन मोनोसॅकराइड्सच्या संयोगातून तयार होतात. उदा. मोनोसॅकराइड्सचे दोन रेणू ग्लुकोज आणि फ्रक्टोज यांच्या मध्ये संयोग होऊन मोठा रेणू सुक्रोज (साखर) तयार होते. ग्लुकोज आणि फ्रक्टोज दोन्हीच्या रेण्वीय रचना पाहिल्या तर लक्षात येते की दोन्ही रेण्वीय रचना सारख्या आहेत. फक्त त्यांच्या कार्बन आणि प्राणवायु यांच्या जागेंत बदल झालाय. त्यामुळे गंमत होते ती म्हणजे त्यांचे गुणधर्म बदलतात. पाण्याच्या संपर्कात आल्याने डायसॅकराइड्स रेणूंचे विघटन होऊन दोन लहान ग्लुकोज आणि फ्रक्टोज रेणूंमध्ये पुन्हा रुपांतर होऊ शकते.

पॉलिसॅकराइड्समध्ये दहा ते शंभरपर्यंत मोनोसॅकराइड्स रासायनिक क्रियेने एकत्र जोडलेले असतात. पॉलिसॅकराइड्स साखेरेप्रमाणे पाण्यात विरघळत नाहीत आणि चवीलाही गोड लागत नाहीत. आपल्या शरीरातील मुख्य पॉलिसॅकराइड्स आहे ‘ग्लायकोजेन’ जे अनेक ग्लुकोज रेणूं पासून बनलेले असते. यात ग्लुकोजचे रेणू एकमेकांना साखळी सारखी जोडलेले असतात. आपल्या यकृतामध्ये आणि स्नायूंमध्ये काही मर्यादित प्रमाणात कर्बोदकांचा साठा ग्लायकोजेनच्या स्वरुपात साठवलेला असतो. वनस्पती ग्लुकोजपासून पिष्टमय पदार्थ तयार करतात, पिष्टमय पदार्थही एक प्रकारचे पॉलिसॅकराइड्सचं आहे. पास्ता, बटाटा यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात आणि ते आहाराचा एक मोठा भाग आहेत. डायसॅकराइड्सप्रमाणे पॉलिसॅकराइड्सचे ही विघटन होऊन मोनोसॅकराइड्समध्ये रुपांतर होऊ शकते. उदा. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी घटते तेव्हा यकृताच्या पेशी ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर करतात आणि रक्तामध्ये सोडतात. अशारितीने पेशींना ग्लुकोज उपलब्ध होते आणि त्याचे विघटन करून शरीरातील सर्व पेशी ऊर्जा तयार करतात. सेल्युलोज हे अजून एक पॉलिसॅकराइड्स वनस्पती निर्माण करतात, जे आपल्याला पचवता येत नाही; परंतु त्याच्या चोथ्यामुळे मलनिस्सारण सुकर होते.

अलकाला प्रश्न पडला, “डॉक्टर, स्निग्ध पदार्थ/ लिपिड्स म्हणजे काय?”

डॉक्टर सांगू लागले, “आपल्या शरीरात १८-२५% वस्तुमान स्निग्ध पदार्थ व्यापून असतात. स्निग्ध पदार्थांमध्येसुद्धा कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायु असतो. स्निग्ध पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत याचे कारण त्यांच्या रसायनात दडले आहे. स्निग्ध पदार्थांमध्ये मेदाम्ल, ट्रायग्लिसराइड्स (चरबी आणि तेलं), फॉस्फोलिपिड्स (फॉस्फोरस असलेले स्निग्ध पदार्थ), स्टेरॉइड्स (कार्बन अणूंच्या वलयाकार (ring) रचनेपासून बनलेले स्निग्ध पदार्थ), इकोसानॉइड्स (२० कार्बन असलेले स्निग्ध पदार्थ), तसेच चरबी-विद्राव्य जीवनसत्त्वे (अ,ड,इ,के) आणि लिपोप्रोटीन यांचा समावेश आहे.

शरीरातील स्निग्ध पदार्थांचे प्रकार

मेदाम्ल हे ट्रायग्लिसराइड्स आणि फॉस्फोलिपिड्सची निर्मिती करण्यासाठी उपयोगात येतात. तसेच ऊर्जा निर्मितीसाठी देखील कारणीभूत ठरतात. ट्रायग्लिसराइड्स (चरबी व तैल) स्नायू व हाडांचे संरक्षण करण्यासाठी, वंगण म्हणून तसेच उर्जेचा साठा करण्यासाठी आवश्यक असतात. फॉस्फोलिपिड्स हा पेशी पटलातील प्रमुख मेद घटक आहे.
स्टेरॉइड्सचे पाच उपप्रकार मोडतात. कोलेस्टेरॉल हा प्राण्यांच्या पेशीतला सर्वात लहान घटक आहे. ड जीवनसत्त्व, पित्त क्षार, संप्रेरके तयार करण्यासाठी कोलेस्टेरॉल गरजेचे असते. पित्त क्षार अन्नाच्या पचनासाठी आणि अन्नातील मेद, स्निग्ध पदार्थ शोषून घेण्यासाठी उपयोगी असतात. ड जीवनसत्त्व शरीरातील कॅल्शियमची पातळी नियंत्रित करते आणि कॅल्शियम हाडांची वाढ व झीज भरून काढण्यासाठी गरजेचे असते. संप्रेरके यांमुळे चयापचय क्रिया आणि ताण रोखून धरण्याची क्षमता विकसित होते तसेच क्षार आणि पाण्याचे संतुलन राखण्यासाठी गरजेचे असते. लैंगिक संप्रेरके प्रजो‍त्पादनासाठी गरजेची असतात.

इकोसानॉइड्स हे रोगप्रतिकारशक्ती, रक्त गोठवणे, पोटातील आम्ल तयार होणे, स्निग्ध पदार्थांचे विघटन, स्नायूंचे आकुंचन होण्यासाठी मदत करतात. इतर स्निग्ध पदार्थ जसे, कॅरोटीन- अ जीवनसत्त्व तयार करण्यासाठी तसेच इ जीवनसत्त्व जखम भरून येण्यासाठी, मज्जा संस्थेचे सुरळीत कार्य होण्यासाठी, आणि अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. के जीवनसत्त्व रक्त गोठवून ठेवण्यासाठी मदत करते. तसेच लायपोप्रोटीन मेदाचे रक्तामध्ये वहन करतात, या शिवाय ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉल उतींपर्यंत नेतात आणि अतिरिक्त कोलेस्टेरॉल रक्तातून काढून टाकतात. असे सर्वांगीण कामगिरी असलेले स्निग्ध पदार्थ आहारातून कधीही डावलू नयेत. माफक प्रमाणात तेही असलेच पाहिजेत. आपले आरोग्य जपण्यासाठी कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांचा समतोल आवश्यकचं आहे. हे ऐकून अलकाचे थोडे समाधान झाले. डॉक्टर म्हणाले “पुढच्या भागात आपण प्रथिने आणि इतर उपयुक्त घटक समजून घेऊ”