करिअरच्या 'स्टायलिस्ट' संधी | Career as a makeup artist Job opportunities Training salary and scope nrp 97 | Loksatta

करिअरच्या ‘स्टायलिस्ट’ संधी

नव्या संकल्पनांचा सर्जनशील वापर करणाऱ्या मुलींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी या क्षेत्रात सहज मिळू शकतात.

make up stylist career

स्टायलिंग आणि मेकअप

भारतात लग्न समारंभ हा इव्हेंट म्हणूनच साजरा केला जातो. राजकुमारी आणि राजकुमारांच्या लग्न सोहळयांचे कथा कादंबरीत येणारे वर्णन, हे इव्हेंट कसे भव्यदिव्य असतील याचे चित्र डोळयासमोर उभे करते. राजा-महाराजांच्या घराण्यातील लग्न सोहळे कसे असू शकतात हे टीव्हीवरील विविध मालिकांनी दाखवून दिले आहे. राजे- महाराजे यांच्या घरच्या लग्न सोहळयांसारखेच लग्नसोहळे सर्वत्र साजरे होताना दिसतात. बिग फॅट इंडियन वेडिंग, असा एक वाक्प्रचार सुध्दा प्रचलित झाला आहे. या लग्नसोहळयामधला महत्वाचा भाग हा ब्रायडल मेकअप म्हणजेच वधुला सजवणे हा असतो.

लग्न ठरताक्षणीच ब्रायडल मेकअपचे नियोजन केले जाते. किंबहुना काही घरात त्याची तयारी आधीच करुन ठेवली जाते. ब्रायडल मेकअपमुळे वधुच्या असलेल्या – नसलेल्या सौंदर्यात चार चाँद, आठ सूर्य आणि सोळा तारे वगैरे शंभर टक्के लागतातच. ब्रायडल मेकअपची सेवा घेऊन वऱ्हाड्यांच्या समोर येणाऱ्या वधुकडे काही क्षण टक लावून बघणे क्रमप्राप्तच ठरते. ब्रायडल मेकअप आर्टिस्टचे हे कौशल्य असते. वधु राजकुमारीसारखी सजवली जाते. ब्रायडल मेकअपसाठी चांगला खर्च करण्याची तयारी असते.

ब्रायडल मेकअप हा अगदी अभिनेत्रीपासून सामान्य मुलीपर्यंत सगळ्यांच नववधूंचा केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रशिक्षित आणि नव्या संकल्पनांचा सर्जनशील वापर करणाऱ्या मुला-मुलींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सहजगत्या मिळू शकतात.

ब्रायडल मेकअपचे अभ्यासक्रम

ब्रायडल मेकअपचे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण १०वी किंवा १२वी उत्तीर्ण कोणत्याही उमेदवारास घेता येते. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत किती टक्के गुण मिळाले यापेक्षा तुमच्या सर्जनशीलतेची टक्केवारी किती? ते महत्त्वाचे असते. या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये ब्रायडल मेकअपचे विविध प्रकार, पारंपरिक, आधुनिक अथवा समकालीन पध्दती हे विषय शिकवले जातात.

हा अभ्यासक्रम करणाऱ्या व्यक्तिंना स्टायलिंगचे प्रशिक्षण मिळत असल्याने ते सेलिब्रिटी स्टायलिंग पासून कॉर्पोरेट्समधील उच्चपदस्थ व्यक्तिंचे स्टायलिंग करु शकतात. चित्रपट, टीव्ही, क्रीडापटू, कॉर्पोरेट बॉसेस, उ्द्योजक, उच्चपदस्थांचे कुटुंबीय, शेकडो मालिकांधील हजारो पात्रे, असंख्य रिॲलिटी शोमधील शेकडो स्पर्धक आणि परीक्षक आदींसाठी स्टायलिस्ट्सची गरज मोठी आहे. त्यामुळे या क्षेत्रात हिंमतीने आणि हिकमतीने शिरल्यास चांगल्या उत्पन्नासह लोकांच्या गळ्यातील ताईत बनता येणे शक्य आहे.

व्यक्तिमत्व फुलवण्याचे तंत्र

भारतात स्टायलिंग आणि मेकअपची ही चलती बघून अनेक आंतरराष्ट्रीय सलून कंपन्यां येथे शाखा उघडू लागल्या आहेत. या स्टायलिंग आणि मेकअपच्या अभ्यासक्रमात व्यक्तिमत्व फुलवण्याचे कौशल्यतंत्र समाविष्ट असल्याने या तज्ज्ञांची मागणी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. लॅक्मे ॲकॅडेमीने ब्रायडल मेकअप, ओकेजन मेकअप, फॅन्टसी मेकअप, हाय डेफिनेशन मेकअप, अल्टिमेट एअर ब्रश मेकअप असे ॲडव्हान्स्ड अभ्यासक्रम सुरु केले आहेत. शिवाय, डे ॲण्ड नाईट मेकअप, पार्टी मेकअप, एंगेजमेंट मेकअप, ओकेजन मेकअप, कॉर्पोरेट मेकअप, एव्हरी डे मेकअप असे मुलभूत अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

संपर्क- https://www.lakme-academy.com/

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-09-2022 at 08:00 IST
Next Story
बिनपाण्यानं करा… शॅम्पू!