कानाला इजा न होऊ देताही घालता येतात जड कानातली! | Ceremonies Heavy earrings wearing in ear women among jewels chatura article ysh 95 | Loksatta

कानाला इजा न होऊ देताही घालता येतात जड कानातली!

समारंभांसाठी घातल्या जाणाऱ्या दागिन्यांमधली कानातली पुष्कळदा खूप जड असतात. ती कानात घातल्यावर इजा होऊ नये यावरही काही उपाय आहेत…

deepika padukone
कानाला इजा न होऊ देताही घालता येतात जड कानातली!

लग्नांचा ‘सीझन’ आता जवळपास सुरूच झाला आहे. या मोसमात नटण्या-मिरवण्यासाठी अगदी स्वत:चंच लग्न असायला हवं असं नाही! मित्रांच्या, नातेवाईकांच्या लग्नसमारंभात उपस्थित राहताना भरपूर नटायला बहुतेक सर्वच ‘चतुरां’ना आवडतं. अशा वेळी साडी, चुडिदार किंवा घागऱ्याबरोबर गळ्यात व कानात आर्टिफिशियल दागिन्यांचा सेट घालणं खूप पसंत केलं जातं. या सेटस् मधली कानातली मोठी आणि जड जड असतात. ती घालायची आवड तर खूप असते, पण खूप वेळ असं जड कानातलं घातल्यावर कानाच्या पाळीला ज्या वेदना होतात किंवा या वजनामुळे कानाच्या पाळ्या सैल पडून लोंबतील अशी भीतीही वाटते. अशा वेळी काय करावं?… फॅशनप्रेमी मंडळींनी यावर काही उपाय शोधले आहेत.

सेलिब्रिटींच्या ‘साडी ड्रेपिंग एक्सपर्ट’ समजल्या जाणाऱ्या डॉली जैन यांनी आपल्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये जड कानातली घालताना ‘वॉटरप्रूफ बँडेड’ पट्टीचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. आपण बोट कापल्यावर जी साधी बँडेज पट्टी लावतो, तीच ही पट्टी आहे. अगदी पाच रुपयांपासून ती कोणत्याही मेडिकलच्या दुकानात मिळते. या उपायात बँडेड पट्टीचा एका बाजूचा लहानसा तुकडा कापून घेतात. (बँडेडच्या मध्ये असलेला जखमेवर लावायचा भाग यात येऊ देऊ नका. एका बाजूचा चिकटवायचा तुकडाच कापून घ्या.) कापून घेतलेला तुकडा कानाच्या पाळीच्या मागच्या बाजूला- म्हणजे आपण जिथे कानातलं घालतो त्या छिद्राच्या मागच्या बाजूला चिकटवा. आता नेहमीप्रमाणे कानातलं घाला. कानातल्याची मागची दांडी बँडेडच्या चिकटवलेल्या तुड्यातून आरपार जाऊ द्या आणि मागून फिरकी लावून टाका. कानातले कोणतेही जड टॉप्स या प्रकारे घालता येतील. तसंच मोठ्या आकाराची लोंबती कानातलीही या उपायासह अधिक ‘कंफर्टेबली’ घालता येतील. यात होतं असं, की कानाच्या पाळीच्या मागे चिकटवलेली बँडेड पट्टी कानातल्याचं बरचसं वजन तोलून घरते आणि कानाच्या पाळीवर कमी ताण येतो.

काही लोकांच्या कानाच्या पाळीचं छिद्र वर्षानुवर्षं कानातली घालून घालून मोठं झालेलं असतं किंवा कानाच्या पाळ्या लोंबू लागलेल्या असतात. विशेषत: वय वाढत जातं, तसा काही स्त्रियांना याचा सामना करावा लागतो. कदाचित अशा मैत्रिणींना आणि आजी लोकांना कानातलं घालताना बँडेड पट्टीच्या हॅकचा चांगला उपयोग होऊ शकेल, कारण या पट्टीमुळे कानाच्या छिद्राला आणि पाळीला ‘सपोर्ट’ मिळतो.

तान्या सिंग या प्रसिद्ध इन्स्टा फॅशन ब्लॉगरनं जड कानातल्यांमुळे कानाच्या पाळ्यांना वेदना होऊ नये म्हणून ‘लॉक्स २ % जेली’ हे जेल वापरण्याचा सल्ला आपल्या एका रीलमध्ये दिला आहे. ‘लॉक्स २ % जेली’ हेही मेडिकल दुकानात मिळणारं एक लोकल ॲनास्थेटिक जेल आहे. हे थोडंसं जेल बोटावर घेऊन ते कानाच्या छिद्रावर आणि छिद्राच्या मागे लावलं जातं. जेलमुळे त्या भागातल्या त्वचेला ठरावीक काळापर्यंत वेदना जाणवत नाहीत. शिवाय जेलमुळे कानाच्या छिद्रातून कानातल्याचा हूक किंवा दांडी आरपार जाण्यासही मदत होते. तुम्ही गर्भवती असाल किंवा बाळाला सन्यपान करत असाल, तर मात्र ही ‘हॅक’ वापरू नका, असा सल्लाही तान्यानं तिच्या रीलमध्ये दिला आहे.

काही जण कोणतंही ‘नंबिंग’ जेल लावण्यापेक्षा साधं खोबरेल तेल किंवा पेट्रोलियम जेली कानाच्या पाळीला लावणं पसंत करतात. त्यानंही काही प्रमाणात फायदा होतो. कानातल्यांच्या हूक वा दांडीनं कानाच्या पाळीला ‘इरिटेशन’ होत असेल, तर तेल वा पेट्रोलियम जेलीमुळे ते टाळता येतं, शिवाय तिथे बारीक जखम झाल्यास हा उपाय चांगला.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 15:12 IST
Next Story
आहारवेद : पोषक गुणधर्मांचा पडवळ