मी जर ताजी फळे – भाज्या खाल्ल्या असतील तर माझ्या मुलांनादेखील ती मिळाली पाहिजे, या उद्देशाने सुरू झालेल्या छोट्याशा व्यवसायाचे रुपांतर एका मोठ्या वृक्षात झालेले आहे, हैदराबाद येथे राहणाऱ्या चंदना गडे या गृहिणीचा गृहिणी ते उद्योजिका या प्रवासाविषयी.

 ‘पालक’ या वर्गात प्रवेश केला की, बऱ्याचदा आपल्या राहिलेल्या इच्छांची पूर्ती ही आपल्या पाल्याकडून पूर्ण करवून घेण्याचा प्रयत्न असतो. किंवा ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत, त्या-त्या गोष्टी त्यांना देण्याचा मानस असतो.

मग अशावेळी लहानपणी आम्ही छान घरच्या शेतातल्या हिरव्यागार पालेभाज्या, ताजी फळे खाऊन मोठे झालो आणि अशीच ही ताजी फळे-भाज्या आपल्या मुलांनादेखील मिळावी, असं स्वप्न जर कुणी पालक पाहत असतील तर आपण निश्चितपणे त्यांना मुर्खात काढू. परंतु हैदराबादमध्ये रहाणाऱ्या चंदनाने हा विचार नुसताच मनात ठेवला नाही तर त्यावर योग्य ती अंमलबजावणी करीत गृहिणीपासून ते उद्योजिकेपर्यंतचा प्रवास गाठला.

तेलंगणा जिल्ह्यातील खम्मंना गावातील एका शेतकरी कुटुंबात वाढलेली चंदना.चार चौघांसारखे आयुष्य जगत असताना लग्न होऊन हैदराबाद येथे पतीबरोबर राहू लागली.पुढे २०१४ मध्ये जेव्हा तिला मुलगी झाली,तेव्हा आई बनल्याबरोबर मुलीसाठी अमुक करायचं आहे ,तिला तमुक गोष्टी मिळायला पाहिजे,असे विचार इतर आयांप्रमाणे तिच्यादेखील मनात येऊ लागले.

यावेळी तिला एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली की, तिच्यासाठी आपण जो काही भाजीपाला अथवा फळं विकत आणतोय, तो जराही ‘ताजा’ या गटात येतच नाही. ते आकाराने मोठी असली तरी त्यावर विविध प्रकारच्या किटकनाशकांची फवारणी केलेली असते, ती रासायनिकदृष्ट्या पिकविलेली असतात. त्यामुळे त्यातून ना कुठले पोषण मूल्य मिळते ना त्याची खरी चव पोहोचते.

आणि मी जर लहानपणी घरच्या ताज्या फळे-भाज्या खाल्ल्या असतील तर माझ्या मुलीलादेखील त्या मिळाल्या पाहिजेत, हा विचार तिला सतावू लागला. तेव्हा तिने आपल्या घरातच भाजीपाला उगविण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन, आपल्या दहा बाय चारच्या बाल्कनीत पालक, कोथिंबीर, पुदीना यांसारख्या भाज्या लावल्या.

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तिने इतर भाज्या व फळे लावण्याचा विचार केला. उत्तम देशी पद्धतीचे बी-बियाणे घेण्यासाठी ती आणि तिचा इंजिनीअर नवरा हैदराबाद येथील बाजारपेठेत हिंडले.काही शेतकऱ्यांनादेखील भेटले. सगळीकडे हायब्रीड पद्धतीचे बियाणे उपलब्ध होते. तेव्हा देशी पद्धतीचे बियाणे बाजारात कुठेच उपलब्ध नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही ऑन-लाईन बाजारपेठेतदेखील शोध घेतला, पण त्यांचा दर्जा तितकासा चांगला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आता स्वत: चंदनाने चांगल्या दर्जाच्या देशी पद्धतीच्या बियाणांची निर्मिती करायचे ठरविले. यासाठी ती तिच्या गावी आली. तिथल्या काही शेतकऱ्यांची व बियाणे पुरविणाऱ्या लोकांची भेट घेतली. यावेळी तिला काही शेतकरी देशी पद्धतीचे बियाणे तयार करीत असतात,हे तिच्या लक्षात आले. मग पालक, लिची आणि इतर काही भाज्यांची लागवड तिने आपल्या हैदराबाद येथील घरात व आणखी एक छोटी जागा घेऊन त्या ठिकाणी लागवड केली.काही महिन्यातच याचा उत्तम परिणाम पाहायला मिळाला.

तिला अपेक्षित असलेल्या चवीच्या,रंगांच्या-ढंगांच्या भाज्या-फळे तयार होऊ लागल्या. उत्तम बियाणे, त्याच्या वाढीसाठी लागणारे शेणखत, ग्रो-बॅग त्याचबरोबर पुरेसा सूर्यप्रकाश-पाणी या गोष्टी मिळाल्या तर शहरात देखील ताजी फळे-भाज्या पिकविण सहज शक्य आहे, हे तिला जाणविले. यातूनच तिने २०१६ मध्ये आपल्या नवऱ्याच्या सहकार्याने ‘सीड-बास्केट’ या व्यवसायची निर्मिती केली. यात विविध भाज्या, फळे, फुले यांचे देशी बियाणे, शेणखत, ग्रो-बॅग्ज याच बरोबर घरातील शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या गोष्टी या बास्केट अंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या.

मेथी, ब्रोकोली, कोहळा, दुधी, लाल राजगिरा, अल्पाईन स्ट्राबेरी, पिवळ्या रंगाचे चेरी टोमॅटो, लाल भेंडी, बीट अशा अनेक विविध भाज्यांची देशी पद्धतीची बियाणे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

व्यवसाय सुरू केला तेव्हा सुरुवातीला महिन्याला दोनच ऑर्डर मिळायच्या. पण बियाणांचा येणारा अपेक्षित परिणाम पहिल्या नंतर, आता महिन्याला हजारहून अधिक ऑर्डर मिळत आहेत. फक्त हैदराबाद शहरातून नव्हे तर कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, तामिळनाडू अशा विविध राज्यातून यांच्या बियाणांना मागणी असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंदनाची आणखी एक खासियत म्हणजे उत्तम बियाणे पुरविण्याबरोबर ती एक माहितीपत्रकदेखील उपलब्ध करून देते, ज्यात माती कशी तयार करावी, कोणती कुंडी वापरावी, नैसर्गिकरीत्या किटकनाशकांची फवारणी, बी पेरण्याचा उत्तम काळ, कोणत्या खतांचा वापर या सर्व प्राथमिक परंतु आवश्यक अशा गोष्टींची माहिती यात दिली आहे. छोट्या गोष्टीपासून सुरू केलेल्या या व्यवसायाची उलाढाल आज ५० लाखांच्या घरात पोहोचली आहे. स्वत:च्या मुलांना ताजी फळे-भाज्या मिळवीत, या उद्देशाने सुरू केलेला हा व्यवसाय आज देशातल्या कित्येक घरांची ही गरज पूर्ण करणाऱ्या चंदनाचा प्रवास तिच्या नावाप्रमाणे आपला दरवळ पसरवित आहे,ही खरोखरीच कौतुकास्पद बाब आहे.