“अक्षरा, मी बघतेय की सध्या तुझ्या मनात काही तरी खदखदतंय. काय झालं? विक्रांत नीट वागत नाही का? की घरचे काही बोलले?” जान्हवी, तिची मैत्रीण पोटतिडकीनं विचारत होती.
“अगं, खूप दिवसांपासून मी अस्वस्थ आहे. नुकतंच घडलेलं सांगते, परवा रात्री मी कधी नव्हे ते टीव्ही बघत होते, कारण माझा आवडता विषय होता, ‘डिस्कव्हरी चॅनल’वर. लगेच सासूबाई आल्या नि म्हणाल्या, “वर्षही नाही झालं लग्नाला आणि तू रात्रीची अशी इथे बाहेर का बसली आहेस? तो आत तुझी वाट बघत असेल ना?” मला ते ऐकून इतकं कसंनुसं झालं माहितेय? आमच्या दोघांच्या वैयक्तिक आणि अत्यंत खासगी विषयात यांनी लक्ष का घालावं? आम्ही आमचं बघून घेऊ ना! किती अवघडल्यासारखं झालं मला!”
“कमाल आहे तुझ्या सासूबाईंची!”
हेही वाचा…. मुलगीच ठरली प्रेरणास्थान…आई पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात
“अगं, त्यांनी मला असं बोलण्याची ही काही पहिली वेळ नाही काही. यापूर्वीदेखील त्यांनी अनेकदा असं काही तरी बोलून मला लाज आणलेली आहे. मला अनेकदा वाटलं, की फाटकन त्यांना उत्तर द्यावं, की तुम्हाला काय करायच्या आहेत असल्या चौकशा? पण मी पडते सून. उगाच काही बोलून घराचं तापमान का वाढवायचं म्हणून गप्प बसते. दोन महिन्यांपूर्वी आमच्या वॉशरूममध्ये गेल्या होत्या. उगाच बारकाईने आत वाळत घातलेले कपडे निरखत होत्या. मी नंतर विक्रांतला सांगितलं तर तो म्हणाला, ‘दुर्लक्ष कर.’ किती विचित्र आहे हे? एकदा आम्ही विक्रांतच्या मावशींकडे गेलो होतो. सगळं जग विचारतं तसं मावशीनं विचारलं, “काय गं तुमचं प्लॅनिंग वगैरे सुरू आहे का? तर याच म्हणाल्या, ‘यांच्यात फार काही होत नाही बहुतेक, मग प्लॅनिंगची काय गरज?’ काय बोलू.” अक्षरा चिडून सांगत होती.
“तू त्यांना सांग सरळ, की त्यांनी अशा विषयावर तुझ्याशी बोलू नये.”
“बोलले मी त्यांना. म्हटलं, ‘आई, प्लीज तुम्ही आमच्या खासगी संबंधाबद्दल बोलू नका. मला नाही आवडत.’ तर चक्क म्हणाल्या, ‘बाकी सगळ्या विषयांवर तुम्हाला मोकळेपणानं बोलता येतं मग याच्यात काय इतकं?’ तूच सांग जान्हवी, मित्रमैत्रिणीत बोलण्याचे विषय आणि घरात ज्येष्ठांशी बोलण्याचे विषय एकच असतात का? आपण मोठ्यांसोबत लैंगिक आयुष्याबद्दल नाहीच बोलू शकत. निदान मी तरी. तिथे मर्यादा आडवी येते.”
“तू विक्रांतला विश्वासात घेऊन सांग सगळं. तो समजून घेईल असं वाटतंय,” जान्हवी म्हणाली.
हेही वाचा… गर्भपातास संवैधानिक हक्काचा दर्जा देणारे फ्रांस हे पहिले राष्ट्र…
अखेर वेळात वेळ काढून अक्षरा नवऱ्याला म्हणजे विक्रांतला त्याच्या आवडीच्या ठिकाणी डिनरला घेऊन गेली. त्याचा मूड बघून तिनं त्याला काही बोलून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, “बिनधास्त बोल.” तेव्हा तिनं तिच्या मैत्रिणीच्या घरात हे असं असं घडत आहे, असं सांगून तिच्या आणि सासूबाईंमधले ते संवाद ऐकवले. तिची मैत्रीण खूप अस्वस्थ आहे, ती माझ्याकडे सल्ला मागतेय, काय सांगू? असंही विचारलं. विक्रांतला सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटलं. “पण तिच्या सासूबाईंना त्यांच्यामध्ये पडण्याची काहीच गरज नाही. परदेशात बघ कसं असतं. इतकं मोकळं वातावरण असूनदेखील कुणी इतरांच्या खासगी आयुष्यात डोकावत नाही. प्रायव्हसी जपतात ते लोक. तू सल्ला दे तिला, मैत्रिणीच्या नवऱ्यानं त्याच्या आईशी दोन वाक्यात, पण समजेल असं बोलावं. की आई, तुझी काळजी समजू शकतो, पण प्लीज आमची प्रायव्हसी आम्हाला मिळू दे. मग किती सोपं होईल नाही?” विक्रांत नेमकं तेच बोलला जे अक्षराला अपेक्षित होतं. मग हळूच तिनं त्याला सांगितलं, की हे मैत्रिणीकडे नाही तर आपल्याच घरात घडतंय. त्यामुळे ती खूप अस्वस्थ आहे. अक्षरा म्हणाली, “विक्रांत, रोज सकाळी आपल्या बेडरुममधून मी बाहेर आल्यावर त्या माझ्याकडे वरपासून खालपर्यंत बघतात ना, तेव्हा त्यांची नजर मला आरपार चिरून जाते. संपूर्ण शरीर स्कॅन केलं जातंय असं वाटतं. हे खूप जाचक आहे रे. प्लीज हेल्प!”
सुदैवानं अक्षराची अडचण विक्रांतला समजली आणि योग्य ती वेळ बघून तो आईशी बोलला. मैत्रिणींनो, आपण कुटुंबात वावरताना अनेकदा आपल्याला काही अप्रिय घटना किंवा अप्रिय संवादाला सामोरं जावं लागतं. तिथं आपली जगण्यातली सहजता पणाला लागते. अशा वेळी संबंध न तोडता त्यातून तोडगा काढण्याचं कसब आपल्याला शिकावं लागेल. आपण ते नक्कीच करू शकतो नाही?
adaparnadeshpande@gmail.com