सकाळी किंवा संध्याकाळी जवळ कुठेतरी फिरायला, चालायला जायचं… किती साधी गोष्ट! पण तरीही प्रत्येकीसाठी ही साधी गोष्ट नसतेच. आपल्याला आवडतं म्हणून, दिवसाची सुरुवात फ्रेश व्हावी म्हणून, दिवसभराचा थकवा जावा म्हणून अत्यंत व्यग्र दिनक्रमातून थोडासा वेळ आपल्यासाठी काढणं अनेकींना किती अवघड जातं. आणि त्यातूनही असं जायचं म्हटलं तरी असंख्य गोष्टींचा विचार करावा लागतो. आपण जातोय ती जागा सुरक्षित असेल ना, एखाद्या पार्कमध्ये जात असू तर तिथे टवाळखोर मवाली पुरुष तर नसतील? कपडे कुठले घालायचे? कपड्यांवरून उगाचच टिंगल व्हायला नको, हेडफोन घालून सलग चालता येईल का? एकटीला जाता येईल की कुणालातरी सोबत घेऊन जावं लागेल? असे अनेक प्रश्न अनेक ठिकाणच्या महिलांना पडतात. पण तामिळनाडूतील चेन्नईतील महिलांसाठी आता फिरणं, व्यायाम करणं किंवा अगदी मोकळेपणाने गप्पा मारणं अधिक सहज आणि सुरक्षित होणार आहे. कारण चेन्नईतील काही महापालिका आता महिलांप्रती जरा संवेदनशीलता दाखवू लागल्या आहेत. चेन्नईतील तंबाराममधील स्थानिक प्रशासनाने खास महिलांसाठी ‘पिंक पार्क’ उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाचे अनेकांनी स्वागत केले असले तरी अशा प्रकारे फक्त महिलांसाठी पिंक पार्क खरोखरंच उभारावेत का? असाही एक वादाचा मुद्दा समोर येत आहे.

तंबारामच्या महापालिकेने जवळपास १८ हजार चौ. फुट परिसरात आणि सव्वा कोटी रुपये उभारून फक्त महिलांसाठी ‘पिंक पार्क’ उभारण्याची घोषणा केली. ही कल्पना चांगली असली तरी त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांनाही उधाण आलंय. खास महिलांसाठी हा ‘पिंक पार्क’ येत्या चार महिन्यात तयार होईल असा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे.

खास आणि फक्त महिलांसाठीच्या या पार्कमध्ये चालण्यासाठी ट्रॅक्स, महिलांसाठी जीम, पार्कमध्ये ठिकठिकाणी बसण्यासाठी जागा, ज्येष्ठ महिलांना विरंगुळ्यासाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची साधनेही असणार आहेत. पण या पार्कचे सगळ्यांत मोठे आणि वेगळे वैशिष्ट्य असणार आहे ते म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेला देण्यात येणारे सर्वोच्च प्राधान्य. या पार्कमध्ये येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर (ICCC) ला जोडले जातील आणि त्याद्वारे २४ तास पार्कमधील संपूर्ण परिसरात लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच पोलिसांची गस्तही या परिसरात असेलच. सर्वसामान्य महिलांप्रमाणेच वृद्ध तसेच विशेष महिलांच्या गरजा लक्षात घेऊन पार्क बनवला जाईल असे सांगण्यात आले आहे. झोपाळा हा प्रत्येक महिलेचा वीक पॉईंट असतो. व्हीलचेअरवरील महिलांनाही सहज बसता येतील असे झोपाळे येथे बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अंध, ऑटिस्टिक आणि व्हीलचेअरवरील महिलांनाही आनंद घेता यावा म्हणून जमिनीला लागून असलेले मेरी-गो-राऊंड, वाळूत खेळण्याची जागा अशा सुविधांचा विचार केला जात आहे.

गेली अनेक वर्षे हा प्रकल्प प्रलंबित आहे. खरं तर चेन्नई महापालिकेने अनेक ठिकाणी उद्याने, पार्क उभारली आहेत. पण अनेकदा त्याचा टवाळखोर, दारुडे, गर्दुल्ले यांच्याकडून गैरवापर होत असल्याचंच समोर आलंय. महिला या ठिकाणी जाऊच शकत नाहीत. अशा प्रकारचे पिंक पार्क उभारले गेले तर महिलांना कोणत्याही त्रासाशिवाय रिलॅक्स करता येईल अशीही प्रतिक्रिया काही महिलांनी दिली आहे. पण मुळात अशा पार्क्सची गरज का उद्भवेत असाही अनेक महिलांचा सवाल आहे.

फक्त महिलांसाठी पार्क ही संकल्पना जरी आधुनिक वाटत असली, तरी मुळात सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणून महिलांना अगदी सध्याच्या काळातही अशा स्वतंत्र पार्कची गरज भासते हे कितपत योग्य आहे असाही सवाल काही महिला विचारत आहेत. महिला कोणत्याही दडपणाशिवाय, भीतीशिवाय, त्रासाशिवाय शांतपणे वाचत बसतील, व्यायाम करतील, गप्पा मारत बसतील, आपल्या मैत्रीणींबरोबर रिलॅक्स होऊ शकतील अशी जागा निर्माण करणे ही चांगली संकल्पना आहे. तरीही सर्वांसाठी म्हणून असलेल्या विरगुंळ्याच्या जागांवर म्हणजे उद्याने, पार्क अशा ठिकाणी महिलांना खरोखरंच सुरक्षित वाटते का हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच बहुतांश वेळा द्यावे लागते. खरं तर पार्क किंवा उद्याने या जागा सर्वांसाठी असतात. पण त्या आपल्यासाठी नाहीतच असाच महिलांचा समज आहे. अगदी मोठ्या शहरांतील महिलाही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर अशा ठिकाणी जाणे टाळतात. सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जाणाऱ्या किंवा व्यायामासाठी जाणाऱ्या अनेक महिलांना पाठलाग करणे, चिडवणे, टिंगलटवाळी असे अनुभव येतात. कित्येकदा चालण्याच्या ट्रॅकवर पुरुषांचे ग्रुप्स अशा पध्दतीने चालतात की महिलांना चालताच येऊ नये, बसण्याच्या जागेवरही काहीवेळेस कब्जा करून बसलेले असतात. व्यायामासाठी जाणाऱ्या महिलांना तर अनेकदा विचित्र नजरांचा सामना करावा लागतो. अशा अनुभवांनंतर बऱ्याच महिलांनी बाहेर जाणं बंद केलं आहे. आपापल्या सोसायटीत ठराविक वेळेस काही महिला एकत्र चालताना किंवा व्यायाम करताना,गप्पा मारताना दिसतात. व्यायामही घरातच केला जातो. ‘शक्यतो बाहेर नको,’ अशीच अनेकांची भूमिका आहे.

सुरक्षितता महत्त्वाची अशा नावाखाली या छोट्या छोट्या गोष्टी घडत असल्या तरी त्याचे परिणाम मात्र महिलांच्या आरोग्यावरही होताना दिसतात. शारीरिक, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने तर हे वाईट आहेच, पण समाजात मिसळण्याचा महिलांचा हक्कही नकळत सुरक्षिततेच्या नावाखाली डावलला जातो. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही भीतीशिवाय वावरणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, पण सुरक्षिततेच्या नावाखाली तो कित्येक वर्षे डावलला जातो. ऑफिसच्या कामाचा ताण, घरातल्या न संपणाऱ्या जबाबदाऱ्या, कुटुंबातील प्रत्येकाची काळजी यामध्ये महिला सतत भरडल्या जातात त्यांच्यासाठी ‘मी टाईम’ नसतोच. या सगळयांतून बाहेर पडण्यासाठी आपल्या ग्रुप किंवा मैत्रीणींबरोबरचा एक फेरफटका, थोडासा व्यायाम एनर्जी बूस्टर ठरतो. कदाचित अशा प्रकारचे ‘पिंक पार्क’ उभारले गेले तर कोणत्याही दडपणाशिवाय महिलांना चालता येईल, ज्येष्ठ महिलांना आपल्या मैत्रीणींबरोबर विरंगुळ्याचे क्षण घालवता येतील, कामावर जाण्यापूर्वी किंवा कामावरून थकून आल्यावर व्यायामासाठी वेळ देता येईल हेदेखील मुद्दे आहेतच.

‘पिंक पार्क’ या संकल्पनेचे स्वागत केले जात असले तरीही शहरांमध्ये अशा प्रकारचे अनेक पिंक पार्क उभारणे महत्त्वाचे आहे की, शहरांतील सार्वजनिक जागा महिलांनाही आपल्याशा वाटतील अशा प्रकारे सुरक्षित बनवणे महत्त्वाचे आहे यावर विचार व्हायला हवा.