डॉ. राधिका प्रशांत हेडाऊ

बाळाच्या पोषणाची गोष्ट जन्माबरोबर संपत नाहीत. गर्भातील नऊ महिने त्याची मुळे घडवतात; मात्र त्यानंतरचे महिने आणि वर्षे हे मूल किती सक्षमपणे वाढेल, शिकेल आणि फुलेल हे ठरवतात. गर्भधारणेपासून दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचे पहिले १,००० दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात मेंदू, रोगप्रतिकारक यंत्रणा आणि चयापचय प्रक्रिया वेगाने विकसित होतात. मात्र पोषण आणि संगोपनाची ही गरज बालपण व किशोरावस्थेतही कायम राहते.

भारताने बालपोषणाच्या बाबतीत प्रगती केली असली तरी आव्हान अजूनही मोठे आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ (२०१९–२१) नुसार, पाच वर्षांखालील ३५.५ टक्के मुलांची वाढ खुंटलेली होती, १९.३ टक्के मुले उंचीच्या मानाने कमी वजनाची, तर ३२.१ टक्के मुले वयाच्या मानाने कमी वजनाची होती. सहा ते ५९ महिन्यांच्या जवळपास दोन-तृतीयांश मुलांमध्ये रक्तक्षय आढळला. त्यामुळे केवळ गर्भावस्थेतील पोषण मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पुरेसे ठरत नाही.

जन्मानंतर बाळाचे पहिले पोषण म्हणजे स्तनपान. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या शिफारशीनुसार जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करावे. पहिले सहा महिने बाळाला पाणी, मध किंवा दुसरे कोणतेही खाद्य-पेय न देता केवळ स्तनपान द्यावे. त्यानंतर पूरक आहारासह स्तनपान दोन वर्षे किंवा त्यापुढेही सुरू ठेवावे. स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी मानता कामा नये. योग्य समुपदेशन, मातृत्व रजा, स्तनपानास अनुकूल कार्यस्थळे आणि कुटुंबाचे सहकार्य आवश्यक आहे.

सहा महिने पूर्ण झाल्यावर स्तनपान सुरू ठेवत पूरक आहार सुरू करावा. सुरुवातीला दोन-तीन चमचे मऊ आणि घट्ट अन्न दिवसातून दोन-तीन वेळा द्यावे. वयानुसार त्याचे प्रमाण, वारंवारता आणि पोत हळूहळू वाढवावा. अन्न चमच्यावर टिकले पाहिजे; ते पातळ होऊन ओघळू नये. मऊ केलेला डाळ-भात किंवा खिचडी, घट्ट नाचणी अथवा भरडधान्याची खीर, कुस्करलेल्या भाज्या व फळे, दही, पनीर किंवा पूर्ण शिजवलेले अंडे हे चांगले पर्याय ठरू शकतात. योग्य असल्यास थोडे तेल, तूप किंवा शेंगदाणे अथवा तिळाची बारीक पूड घालून आहारातील ऊर्जा आणि पोषकतत्त्वे वाढवता येतात. बाळाला बाटलीऐवजी स्वच्छ वाटी आणि चमच्याने भरवावे. त्याच्या डोळ्यांच्या पातळीवर बसून भूक आणि पोट भरल्याचे संकेत ओळखावेत. विकासाच्या टप्प्यानुसार स्वतः हाताने खाण्याची संधी द्यावी. जबरदस्तीने किंवा मोबाईल-टीव्ही दाखवत खाऊ घालणे टाळावे.

आहारातील विविधता हा पूरक आहाराचा गाभा आहे. सहा ते २३ महिन्यांच्या मुलांना दररोज आठ मान्यताप्राप्त अन्नगटांपैकी किमान पाच गटांतील पदार्थ मिळायला हवेत. परवडणाऱ्या भारतीय ताटात धान्य किंवा भरडधान्य, डाळी-कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ, हंगामी भाज्या व फळे आणि आहारपद्धतीनुसार अंडे, मासे किंवा मांस यांचा समावेश करता येतो. लोहयुक्त पदार्थांसोबत पेरू, आवळा, संत्री किंवा टोमॅटोसारखे जीवनसत्त्व ‘क’युक्त पदार्थ दिल्यास लोहाचे शोषण सुधारते. गिळताना अडकण्याचा धोका असल्यामुळे लहान मुलांना अख्खे शेंगदाणे किंवा सुकामेवा देऊ नये.

आरोग्यदायी चवींची ओळख बालपणातच घडते. अतिरिक्त साखर किंवा जास्त मीठ न घातलेले घरगुती पदार्थ वारंवार दिल्यास मुले विविध चवी स्वीकारायला शिकतात. पुढे कुटुंबासोबतचे जेवण, पोषण शिक्षण आणि सक्रिय खेळ या सवयी किशोरावस्था व प्रौढावस्थेपर्यंत नेऊ शकतात. पोषणाबरोबरच सुरक्षित पाणी, हातांची स्वच्छता, स्वच्छ भांडी, लसीकरण, आवश्यकतेनुसार जंतनाशक औषध, पुरेशी झोप, खेळ आणि प्रेमळ संवादही महत्त्वाचे आहेत. अंगणवाडी किंवा आरोग्य केंद्रात नियमित वाढ मोजल्यास वाढ मंदावल्याचे लवकर ओळखता येते. या प्रक्रियेचा उद्देश कुटुंबाला योग्य मार्गदर्शन देणे असावा- आईला दोष देणे नव्हे.

प्रसूतीनंतर आईच्या गरजा संपत नाहीत. संतुलित आहार, डॉक्टरांच्या सल्ल्याने सूक्ष्मपोषक पूरक आहार, विश्रांती, मानसिक आधार आणि शरीराला सावरण्यासाठी पुरेसा वेळ यामुळे आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित राहते. मुलींना गर्भधारणेपूर्वीपासून चांगले पोषण मिळणेही आवश्यक आहे. रक्तक्षयग्रस्त किशोरी शरीरातील पोषकतत्त्वांचे अपुरे साठे घेऊन मातृत्वात प्रवेश करू शकते. त्यामुळे किशोरवयीन मुलींच्या पोषणातील गुंतवणूक ही पुढील पिढीसाठीची गुंतवणूक आहे.

‘जागतिक अन्नसुरक्षा आणि पोषणस्थिती अहवाल २०२६’नुसार जगातील सुमारे २.७ अब्ज, म्हणजेच २७० कोटी लोकांना आरोग्यदायी आहार परवडत नाही. युनिसेफनेही मुलांवर कमी पोषणमूल्य असलेल्या पदार्थांच्या आक्रमक जाहिरातींचा वाढता प्रभाव अधोरेखित केला आहे. म्हणून केवळ पोषणविषयक ज्ञान पुरेसे नाही. कुटुंबांना परवडणारे विविध अन्नपदार्थ, सक्षम अंगणवाडी व आरोग्यसेवा, स्तनपानासाठी पोषक वातावरण, आरोग्यदायी शालेय आहार आणि मुलांना लक्ष्य करणाऱ्या अपायकारक खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर नियंत्रण आवश्यक आहे.

पोषणाची मुळे जन्मापूर्वी रुजतात; मात्र पंख जन्मानंतर घडतात- प्रत्येक आहारातून, प्रत्येक संवेदनशील प्रतिसादातून आणि प्रत्येक सक्षम धोरणातून. सुदृढ आणि सुपोषित मूल घडविणे ही केवळ एका आईची जबाबदारी नाही; ते कुटुंब, समुदाय, बाजारव्यवस्था आणि संपूर्ण राष्ट्राने मिळून पूर्ण करायचे सामूहिक वचन आहे.
(लेखिका पोषणतज्ज्ञ व सिंबायोसिस स्कूल ऑफ कुलिनरी आर्ट्स अँड न्यूट्रिशनल सायन्सेस येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)
radhikaphedaoo@gmail.com