आज भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिऩ स्वातंत्र्य म्हणजे या देशात स्त्री -पुरुष दोघांनाही स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे स्त्री पुरुष समानता! याबद्दलच्या घोषणा खूप काही केल्या जातात. स्री आणि पुरुष म्हणजे संसाररूपी गाड्यांची दोन चाकं आहेत; एकाशिवाय दुसरे अपूर्णच जणू. पण हे सगळं म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. त्यामुळेच आजही अनेकदा महिलांना भेदभावाला सामोर जावे लागते हे आहे कडवट वास्तव!

अनेक व्यवसाय- उद्योग क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते. यात मराठी चित्रपटसृष्टीपासून ते थेट बॉलिवूड, हॉलिवूडपर्यंत सर्वत्र हेच चित्र आहे. पण आता सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री याबद्दल उघडपणे भाष्य करू लागल्या आहेत. सिनेसृष्टीत पुरूष कलाकारांच्याच तोडीस तोड काम महिलाही करतात. विशेष म्हणजे अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींचा स्क्रीन टाइम हा अधिक असतो. पुरुषांच्या तुलनेत त्या पडद्यावर फार जास्त काळ झळकत असतात. पण अधिकचा वावर असूनही महिलांना मानधन मात्र कमी दिलं जातं, अशा तक्रारींमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होते आहे.

Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
sanjay raut raj thackeray amit shah
“राज ठाकरेंची खंत फक्त मलाच माहिती”, अमित शाहांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टिप्पणी; ‘त्या’ व्हिडीओचा केला उल्लेख

या भेदभावामुळेच आपला समाज पुरुषप्रधानच असल्याचे लक्षात येते. यात शहरी- ग्रामीण असा कोणताही भेद नाही. अन्याय सर्वत्र सारखाच आहे. हल्ली सिनेसृष्टीची मानसिकता बदलण्यास सुरूवात झालेली असली, तरी सर्वत्र हा बदल झालेला नाही. त्यांना मेहनतीनुसार आणि स्क्रीन टाइमनुसार मेहनताना मिळावा, अशी मागणी वारंवार केली जाते. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी यावर भाष्य केले आहे.

सई ताम्हणकर

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. काही महिन्यांपूर्वी तिनेही सिनेसृष्टीत पुरुषांच्या तुलनेत महिला कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबाबत भाष्य केले होते. इतर ठिकाणी माहिती नाही, पण मराठी सिनेसृष्टीत महिला कलाकारांना समान अधिकार दिले जात नाहीत. आजही महिला कलाकारांना पुरुष कलाकारांपेक्षा कमी मानधन मिळते, असे सईने एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते.

अनेकदा बोलूनही काहीच उपयोग झाला नाही. याप्रकरणी पुन्हा एकदा आवाज उठवणार आहे. यावर काही ना काही तोडगा नक्कीच निघेल. पण मराठी इंडस्ट्रीतील सर्व महिला कलाकार एकत्र आल्यास या मुद्द्यावर लढणे सोपे होऊ शकते. त्यामुळे या मुद्द्यावर सर्व अभिनेत्रींनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही सईने सांगितले.

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांकाने अनफिनिश्ड या तिच्या आत्मवृत्तात याबद्दल लिहिले आहे. ती म्हणते, एखाद्या चित्रपटांसाठी अभिनेत्रींना मिळणारे मानधन नाममात्र असते. दरवर्षी हेच जाणवते. विशेषत: जेव्हा तुम्ही मोठ-मोठ्या कलाकारांसोबत काम करता तेव्हा ते भारतातील असो किंवा अमेरिकेतील त्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना फक्त काही ठराविक रक्कमच दिली जाते. अभिनेत्रींसाठी एवढेच बजेट आहे आणि त्यापुढे जाऊ शकत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे महिला कलाकारांकडे काम करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.

कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कंगना नेहमीच बॉलिवूडमधील विविध मुद्द्यांवर भाष्य करत असते. ती म्हणते, “एखाद्या अभिनेत्याचे मानधन हे त्याने केलेल्या कामाच्या रकमेवर निश्चित व्हायला हवे. त्याच्यासाठी लिंग हे मापदंड ठरु शकत नाही.”

आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट ही चांगलीच चर्चेत आहे. आलियाला सिनेसृष्टीतील कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल अलीकडेच एक्स्प्रेस इ-अड्डा मध्ये प्रश्न विचारण्यात आला. “एखाद्या कलाकारांचं मानधन आणि चित्रपटाचं बजेट यांच्यामध्ये संतुलन असायला हवं. पण कुठल्या कलाकारानं किती मानधन घ्यावं हे मी कसं ठरवणार? कारण मी अजून खूप लहान आहे.”, असे आलिया भट्ट म्हणाली होती.

ती पुढे म्हणाली, “एखादा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अनेक कलाकारांनी आपलं मानधन परत केलं आहे. मला असे अनेक प्रसंग मला माहीत आहेत. कलाकार फक्त प्रचंड मानधन घेतात असं नाही तर चित्रपट अयशस्वी झाला तर ते परतही करतात.”

दीपिका पदुकोण

सध्याच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी दीपिकाने मानधनाच्या मुद्द्यावरुन एका चित्रपटाला नकार दिला होता. त्याबद्दल ती म्हणते, मला माझ्या ट्रॅक रेकॉर्डची आणि माझ्या किंमतीची जाणीव आहे. माझे चित्रपट माझ्या सहकलाकारांपेक्षा अधिक चालतात. त्यामुळे लिंगनिहाय मानधन घेण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी अनेकदा अशाप्रकारे भेदभाव करणारे चित्रपट करण्यास नकार देते, कारण ते माझ्यावर अन्याय करतात.

मानधनात तफावत

सिनेसृष्टीत पुरुष कलाकारांच्या तुलनेत महिला कलाकारांचे मानधन कायमच चर्चेचा विषय असतो. समजा, एखाद्या चित्रपटासाठी पुरुष कलाकाराला ७० ते ८० लाख रुपये मिळत असतील, तर महिला कलाकाराला फक्त १० ते १५ लाख इतकेच पैसे मिळतात. इतर सहाय्यक कलाकार, विरोधी भूमिका साकारणारे कलाकार यांचीही हीच अवस्था असते. यातील महिला कलाकारांना फारच कमी मानधन मिळते. फक्त मानधनच नव्हे तर पुरुष कलाकारांना मिळणाऱ्या सुविधांबद्दलही भेदभाव जाणवतो. एखाद्या अभिनेत्रीचा स्क्रीन टाईम, तिला मिळणाऱ्या सुविधा आणि त्या तुलनेत पुरुषांना मिळणाऱ्या सुविधा या कायमच चर्चेचा विषय ठरत असतात.

अनेक आघाडीच्या नायिका याबद्दल उघडपणे बोलत असल्याने पुढील काही वर्षांत यातील तफावत कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
येणाऱ्या काळात कदाचित स्री- पुरूष कलावंतांच्या मानधनाचे निकषही ठरतील. हे होईल तेव्हा होईल पण सध्या तरी आपण भेदभावाचेच जीवन जगतोय अशी भावना अभिनेत्रींच्या मनात तीव्र होते आहे