नारळामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांमुळे त्याचा उपयोग आहाराबरोबरच औषध म्हणूनही केला जातो. मराठीत ‘नारळ’, हिंदीमध्ये ‘नारियल’, संस्कृतमध्ये ‘नारिकेल’, इंग्रजीत ‘कोकोनट’, तर शास्त्रीय भाषेत ‘कोकॉस न्युसिफेरा’ (Cocus Nucifera) या नावाने ओळखले जात असून, नारळवृक्ष ‘पामी’ या कुळातील आहे.

नारळाच्या वृक्षाचा प्रत्येक भाग उपयोगी असल्यामुळे त्याला ‘कल्पवृक्ष’ असेही म्हणतात. धार्मिक शास्त्रामध्ये नारळ हे पवित्र फळ मानले आहे. नारळ हा मूळचा इंडोमयाला या भागातील आहे. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीपासूनच भारतात नारळाची लागवड होत आहे. नारळाचा वृक्ष हा सरळ उंच वाढतो. त्याची पाने ही आकाराने मोठी पाम वृक्षासारखी असतात. नारळाचे झाड ८० ते २०० वर्षे टिकते. समुद्रकाठच्या रेताड भुसभुशीत जमिनीमध्ये नारळाची झाडे वाढतात.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
rangpanchami celebration
Health Special: रंगपंचमीला कोणते रंग वापराल? रंगांचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार नारळ हे मधुर गुणात्मक, पित्तशामक, शक्तिदायक, उत्साहवर्धक, मूत्रल, ज्चरघ्न म्हणून कार्य करते.

आधुनिक शास्त्रानुसार :

सोडिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्लोरिन, सल्फर, फॉस्फरस, लोह, तांबे, बायोटिन, रिबोफ्लेविन आणि ‘ब’ जीवनसत्त्व इत्यादी औषधी व सकस घटक आढळतात.

उपयोग :

१. नारळपाणी मधुर, शीतल गुणधर्माचे असल्यामुळे तहान शमविण्यासाठी, शरीरातील ताप कमी करण्यासाठी, अशक्तपणा दूर करण्यासाठी, लघवीची जळजळ थांबण्यासाठी, आम्लपित्तामुळे भडकलेली पोटातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीरात उत्साह निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे.

२. नारळपाणी शरीरास आवश्यक ते क्षार, प्रथिने, पिष्टमय पदार्थ पुरवत असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.

३. नारळपाणी जंतुनाशक असल्यामुळे आतड्यातील जंतूंचा नाश करते.

४. मूतखडा झाला असेल, तर किंवा लघवी थेंब थेंब होत असेल, तर नारळपाणी पिण्यास दिल्यास लघवी साफ होऊन खडा पडून जातो.

५. लहान बालकांना पोटामध्ये जंत झाले असतील तर रात्री झोपताना दोन चमचे खवलेले खोबरे खावून त्यावर एरंडेल तेल प्यावे. याने शौचावाटे जंत पडून जातात.

६. ओला नारळ हा आम्लपित्ताच्या तक्रारींवर उत्तम औषध आहे. खवलेला ओला नारळ खाल्ल्याने पोटातील आम्ले द्रवण्याची प्रक्रिया मंद होऊन रुग्णाला आराम वाटतो.

७. आम्लपित्त, अपचन, अल्सर, अतिसार, कॉलरा, मूळव्याध या व्याधींवर ओला नारळ फार उपयुक्त आहे. ओला नारळ खवून खाल्ल्यास रुग्णास आराम मिळतो. याच विकारांवर शहाळ्याचे पाणीसुद्धा उपयुक्त ठरते.

८. पोटात गुबारा धरणे, उलट्या, मळमळ होणे या विकारांवर शहाळ्याचे पाणी उपयुक्त ठरते.

९. कोरडा खोकला येत असेल, तर अर्धा कप नारळाचे दूध, गायीचे दूध अर्धा कप, चमचाभर मध, हळद अर्धा चमचा, चिमूटभर सुंठ पावडर एकत्र करून रोज रात्री प्यायल्यास घशात होणारी खबाडच दूर होऊन कोरडा खोकला दूर होतो.

१०. ताप आलेल्या रुग्णास शहाळ्याचे पाणी थोड्या थोड्या अंतराने प्यायला दिल्यास ताप कमी होऊन अशक्तपणा दूर होतो.

११. नारळाच्या वृक्षाच्या फुलोऱ्यास खाचा पाडून मधुर रस मिळविला जातो. याच मधुर रसाला निरा असे म्हणतात. यामध्ये शरीरास उपयुक्त असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. निरा जास्त शीतल, मधुर गुणात्मक असल्यामुळे हृदय, यकृत व मूत्रपिंड यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयोग होतो.

१२. पाळीमध्ये रक्तस्राव कमी होत असेल व त्या वेळी कंबर व पोटदुखी जाणवत असेल, तर वाळलेले खोबरे व खारीक खावी.

१३. डोक्यावरील केसांचे आरोग्य टिकविण्यासाठी व लांबसडक केसांसाठी शुद्ध खोबरेल तेल केसांच्या मुळाशी लावावे.

१४. केस रूक्ष होऊन तुटत असतील, तर नारळाच्या दुधाने केस धुवावेत. याने केस मऊ, मुलायम होतात.

१५. त्वचा रूक्ष व निस्तेज झाली असेल, तर खोबरेल तेलाने अंगाला मालीश करावे. याने त्वचा कोरियुक्त होते.

१६. नारळापासून बनविलेले तेल खाण्यासाठी, केसांना, त्वचेला लावण्यासाठी तसेच सुगंधी तेले, साबण बनविण्यासाठी वापरले जाते.

१७. नारिकेल लवण औषध आम्लपित्तासाठी उपयुक्त आहे. नारळ पूर्ण सोलून त्याच्या डोळ्यांमधून सैंधव लवण गच्च भरून डोळे पूर्ण बंद करावेत, त्यानंतर तो नारळ भाजून घ्यावा. आत तयार झालेला मगज म्हणजेच नारिकेल लवण होय.

१८. ब्राह्मी, माका, शंखपुष्पी, वडाच्या पारंब्या, बिटाची पाने, जास्वंद व खोबरेल तेल यांपासून सुगंधी व केशवर्धक तेल बनविता येते.

१९. ओला नारळ किसून तो रोज ताज्या कोशिंबिरीबरोबर वापरावा. यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व, प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्य उत्तम राहते.

२०. हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरॉसिस) वाढला असेल, तर खोबरे, खारीक, बदाम, काजू यांचे लाडू करून खावेत.

२१. रोगप्रतिकारक शक्ती वाढून आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज ओला नारळ व चार-पाच खजूर खावे. यामध्ये असणाऱ्या कॅल्शिअम व लोह घटकांमुळे शरीर सुदृढ बनते.

२२. दात व हिरड्या मजबूत राहण्यासाठी रोज ओला नारळ चावून चावून खावा.

सावधानता :

नारळ व सुक्या खोबऱ्यामध्ये मेदाम्ले भरपूर प्रमाणात असल्याने अति स्थूल रुग्णांनी त्याचा वापर आहारामध्ये प्रमाणातच करावा.

(dr.sharda.mahandule@gmail.com)