-वनिता पाटील

वयोवृद्ध आई आणि खाली वाकून तिच्या बुटांची लेस बांधणारा तिचा मुलगा हे दृश्य काही दुर्मिळ नाही.

आपल्या अंध आईवडिलांना कावड करून तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या श्रावणबाळाची गोष्ट सांगणाऱ्या भारतात तर आईची या ना त्या प्रकारे सेवा करणारा तिचा मुलगा हे अगदी कुठेही दिसणारं दृश्य.

पण तो मुलगा राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी असते तेव्हा…?

तेव्हा आईच्या बुटाची लेस बांधणाऱ्या राहुल गांधींचं छायाचित्र प्रचंड व्हायरल होतं. अगदी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वडिलांच्या पायात बूट घालण्यासाठी धावणाऱ्या सुप्रिया सुळे यांचं छायाचित्र व्हायरल झालं होतं तसंच.

यात कुणाला कदाचित फारसं वेगळं जाणवणारही नाही. तसं ते नाहीदेखील. पण तरीही त्यात काहीतरी खास आहे.
ते आहे आई आणि मुलाचं नातं… आई आणि मुलाचं प्रेम… जिव्हाळा

एरवी आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्यात ते जाणवणारही नाही इतक्या तरलपणे असतंच असतं. वेगवेगळ्या माध्यमांमधून साबणापासून मोबाइल फोनपर्यंत अनेक गोष्टी विकणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातींनी तर या प्रेमाचं केव्हाच वस्तुकरण करून टाकलं आहे. तरीही त्यातलं जिवंतपण, त्यातलं जैविकपण काही त्यांना विकता आलेलं नाही.

त्यामुळेच त्या पलीकडे जाणारं मायलेकाच्या किंवा बापलेकीच्या प्रेमाचं जिवंत, सळसळतं आणि लोभस रुपडं कधीतरी दिसतं तेव्हा ते चर्चेचा विषय ठरतं.

कुणाच्या तरी प्रेमात पडून, आपला देश सोडून आलेली त्याची आई आणि तिला ज्या काळझडपेची जणू सतत चाहूल लागत होती, ती कोसळून तिच्या स्वप्नांच्या झालेल्या चिंधड्या… त्यानंतर तिच्या वाट्याला आलेला कमालीचा विखार, कमालीचा तिरस्कार… तिची दोन चिमुरडी आणि ती… एवढे तिघेच एकमेकांना आणि खांद्यावर आलेली एका पक्षाची इतिहासदत्त जबाबदारी.

त्याच्याही वाट्याला काही कमी विखार आणि तिरस्कार आला नाही… पावलोपावली त्याला हिणवलं गेलं. त्याच्या मर्यादा, त्याच्या चुका गुणिले हजार करून पुन्हा पुन्हा दाखवल्या गेल्या. त्याला पप्पू ठरवलं गेलं आणि त्याच्या आईला तर…

या सगळ्या विखाराच्या निखाऱ्यांवरून त्याची पदयात्रा सुरू आहे. सगळीकडे विद्वेष भरलेला असताना त्याला प्रेमाने भारत जोडायचा आहे. ही त्याची राजकीय खेळीदेखील असेल. ती शक्यता नाकारता येत नाही. पण धर्मच नव्हे तर पक्षापक्षांमध्ये, माणसामाणसांमध्ये फूट पाडायचे प्रयत्न होत असताना द्वेष अनुभवलेला कुणीतरी प्रेमाची भाषा करतोय, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत देशभरातल्या लोकांना जोडू पाहतोय हे काय कमी महत्त्वाचं आहे?

आपल्या वडिलांच्या खुन्यांना माफ करून टाकणाऱ्याच्या प्रेमात ती ताकद असूच शकते.

ती जितकी स्वत:च्या आईबद्दल असू शकते, तितकीच इथल्या सामान्य माणसाबद्दलही असू शकते.

ती जितकी इथल्या सामान्य माणसाबद्दल असू शकते, तितकीच स्वत:च्या आईबद्दलही असू शकते.

गोळ्यांनी शरीराची चाळण झालेली आजी त्याने अगदी लहानपणी पाहिली आहे.
अगदी कोवळ्या वयात वडिलांच्या शरीराच्या चिंधड्या झालेल्या पाहिल्या आहेत.
त्यानंतरच्या कठीण काळात खंबीरपणे उभी राहिलेली आई पाहिली आहे. तीच त्याची ताकद आहे.

म्हणूनच खाली वाकून आईच्या बुटाची लेस बांधत जणू तो जगाला सांगतो आहे,
मला पप्पू म्हणा, माझी चेष्टा, टिंगलटवाळी करा, काहीही करा…
मला काही फरक पडत नाही, कारण…
मेरे पास माँ हैं…