ज्ञानदेव बाबाराव नजान

रोहिणी आणि तिचे पती नोकरीच्या निमित्ताने पुण्याहून बेंगळुरूला स्थलांतरित झाले. दोघांचे उत्पन्न चांगले होते. घरकर्ज आणि इतर खर्च सांभाळताना रोहिणी गुंतवणुकीचे पर्याय शोधत होती. सोशल मीडियावर तिला एका व्यक्तीने तिला क्रिप्टो गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. रोहिणीला तांत्रिक माहिती पूर्णपणे समजली नव्हती, तरीही तिने त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अ‍ॅप इन्स्टॉल केले आणि सुमारे पाच ते सहा लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. बदल्यात तिला कोणतीही क्रिप्टोकरन्सी मिळाली नाही. काही दिवसांनी तिच्या लक्षात आले की ती फसवणुकीची शिकार झाली आहे. दुर्दैवाने, तक्रार नोंदवण्यासाठी तिने जवळपास एक महिना उशीर केला. तोपर्यंत रक्कम विविध खात्यांमधून फिरवून काढण्यात आली होती. परिणामी तिची संपूर्ण गुंतवणूक बुडाली.

सायबर गुन्ह्यांचा मोठा धोका याच ठिकाणी निर्माण होतो. क्रिप्टो व्यवहारांची साखळी तांत्रिकदृष्ट्या ट्रॅक करता येते, पण प्रत्यक्ष व्यक्तीपर्यंत पोहोचणे अत्यंत क्लिष्ट असते. समजा, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला क्रिप्टो विक्रीचे आमिष दाखवले. तुम्ही त्याला भारतीय रुपयांत पैसे ट्रान्सफर केले. ती व्यक्ती अनेक बनावट बँक खात्यांचा वापर करून रक्कम स्वीकारते आणि बदल्यात क्रिप्टो पाठवते किंवा काही वेळा अजिबात पाठवत नाही. अशा वेळी त्या वॉलेटचा खरा मालक कोण आहे, हे शोधणे अवघड होते.

शेअर मार्केट आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात सायबर गुन्हेगारांनी आता आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. मागील भागात आपण आभासी चलनाचा (Cryptocurrency) संदर्भ पाहिला होता. रोहिणीच्या फसवणुकीच्या निमित्ताने आपण आता आभासी चलनाबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. ते नेमकं काय आहे, कसं काम करतं, भारतातील त्याची कायदेशीर स्थिती काय आहे आणि त्यामध्ये होणाऱ्या सायबर फसवणुकीचे प्रकार कोणते आहेत.

आभासी चलन म्हणजे डिजिटल स्वरूपातील पैसा. तो ना कागदी असतो, ना नाण्यांच्या स्वरूपात. तो फक्त संगणक, मोबाईल किंवा डिजिटल वॉलेटमध्ये साठवला जातो. २००९ मध्ये Bitcoin या पहिल्या क्रिप्टोकरन्सीचा उदय झाला आणि त्यानंतर हजारो क्रिप्टो कॉइन्स बाजारात आले. आज जगभरात १००० पेक्षा अधिक क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात आहेत. त्यापैकी BitCoin, Ethereum, Litecoin, Ripple इत्यादी काही लोकप्रिय नावे आहेत.

आपण जसे PhonePe किंवा Google Pay वापरतो, त्यावेळी व्यवहार बँकेच्या अधिकृत प्रणालीद्वारे होतात आणि त्यावर सरकार व बँकेचे नियंत्रण असते. मात्र क्रिप्टोकरन्सी व्यवहार हे बँकिंग प्रणालीपासून स्वतंत्र असतात. ते ब्लॉकचेन (Blockchain) या तंत्रज्ञानावर आधारित असतात. हे तंत्रज्ञान अत्यंत सखोल आणि तांत्रिक आहे. परंतु सोप्या भाषेत सांगायचे तर प्रत्येक व्यवहाराची नोंद डिजिटल साखळीमध्ये सुरक्षितरित्या जतन केली जाते.

क्रिप्टोकरन्सी खरेदी, विक्री किंवा साठवण्यासाठी विशिष्ट अ‍ॅप्लिकेशन किंवा डिजिटल वॉलेटची आवश्यकता असते. ही अ‍ॅप्स अधिकृत प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात. अनोळखी वेबसाइट, व्हॉट्सअ‍ॅप लिंक किंवा सोशल मीडियावरील लिंकवरून अ‍ॅप डाउनलोड करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.

एकदा अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर वापरकर्त्याला एक डिजिटल वॉलेट तयार करावे लागते. त्या वॉलेटला एक अद्वितीय (unique) डिजिटल अ‍ॅड्रेस मिळतो. व्यवहार करताना नाव, पत्ता यांसारखी वैयक्तिक माहिती दिसत नाही. फक्त वॉलेट अ‍ॅड्रेस दिसतो. Binance, Trust Wallet, Coinbase यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अशी वॉलेट्स उपलब्ध असतात.

भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीवर पूर्ण बंदी नाही. मात्र ती अधिकृत चलन (legal tender) नाही. म्हणजेच आपण व्यवहार करू शकता, पण तो आपल्या जोखमीवर. भारत सरकारने क्रिप्टो व्यवहारांवरील नफ्यावर ३०% कर (Income Tax) आणि प्रत्येक व्यवहारावर १% TDS लागू केला आहे. त्यामुळे हा व्यवहार कायदेशीर चौकटीत असला तरी तो पूर्णपणे नियंत्रित नाही.

रोहिणीचे उदाहरण फक्त सामान्य लोकांपुरते मर्यादित नाही. आयटी तज्ज्ञ, शासकीय कर्मचारी, अगदी राजकीय क्षेत्रातील व्यक्तीही अशा सायबर फसवणुकीला बळी पडले आहेत. आपण सुशिक्षित आहोत, तांत्रिक माहिती आहे, म्हणून आपण कधीच फसू शकत नाही, हा गैरसमज आहे. लोभ, भीती, घाई किंवा भावनिक निर्णय यामुळेच बहुतेक वेळा चुका होतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, क्रिप्टोकरन्सीला शेअर बाजारासारखा मजबूत नियामक आधार नाही. शेअर बाजारासाठी Securities and Exchange Board of India (SEBI), बँकांसाठी Reserve Bank of India (RBI), विमा क्षेत्रासाठी Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) यांसारख्या संस्था आहेत. परंतु क्रिप्टोकरन्सीसाठी असा ठोस, सर्वसमावेशक नियामक आधार उपलब्ध नाही.

म्हणूनच कष्टाची कमाई गुंतवताना सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून, अवास्तव परताव्याच्या आमिषाला बळी पडून किंवा अपूर्ण माहितीतून गुंतवणूक करू नका. अधिकृत अ‍ॅप्सच वापरा, व्यवहारांची पडताळणी करा आणि शंका असल्यास त्वरित तक्रार नोंदवा.

डिजिटल जगात संधी मोठ्या आहेत, पण धोकेही तितकेच गंभीर आहेत. म्हणूनच प्रत्येक व्यवहारात जागरूकता, संयम आणि चौकस बुद्धी वापरणे हीच खरी सुरक्षित गुंतवणूक आहे.

(सायबर फॉरेन्सिक विश्लेषक)

dnyandev.najan@yahoo.in