ज्ञानदेव बाबाराव नजान
मी सायबर फॉरेन्सिक क्षेत्रात काम करत असताना एक गोष्ट नेहमी जाणवते की, गुन्हेगाराचा चेहरा, वय, शिक्षण किंवा देश काहीही असो… गुन्हेगारांची विकृत मानसिकता हीच धोकादायक असते. काही काळापूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर समोर आलेलं एक प्रकरण याचं जिवंत उदाहरण आहे. बांगलादेशचा एक तरुण मलेशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. खरं तर तो एक ‘भविष्य घडवणारा डॉक्टर’… पण वास्तव मात्र पूर्णपणे वेगळं होतं.
तो एका आंतरराष्ट्रीय ऑनलाइन बाल शोषण (child exploitation) नेटवर्कचा भाग होता आणि फक्त भाग नव्हता, तर तो ते चालवत होता. त्याने जगभरातील १०० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलांना लक्ष्य केलं. यात काही मुलं ११ वर्षांच्या आसपासची होती, म्हणजे अजून बालपणात असलेली. त्याची पद्धत अतिशय धोकादायक आणि विचार करायला लावणारी होती. त्याने Instagram आणि Snapchat वर बनावट अकाउंट्स तयार केली. कधी तो स्वतःला मुलगी म्हणून दाखवायचा, कधी मित्र म्हणून. सुरुवातीला साधी ओळख, मग मैत्री आणि नंतर हळूहळू विश्वास संपादन…
एकदा विश्वास बसला की, तो मुलांकडून वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ मिळवायचा. त्यानंतर त्याचाच वापर करून दबाव टाकणं, धमकावणं आणि आणखी सामग्री मागणं… हा त्याचा गुन्ह्याचा पॅटर्न होता. ही घटना इतकी गंभीर होती की शेवटी मलेशियातून त्याचं अमेरिकेत प्रत्यार्पित करण्यात आलं आणि त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांखाली खटले दाखल झाले.
पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. धोका फक्त WhatsApp, Instagram किंवा Snapchat पुरता मर्यादित नाही. आजकाल अनेक गेमिंग अॅप्लिकेशन्स आहेत- ज्यांचा मुख्य उद्देश गेम खेळणं असतो, पण त्यामध्ये चॅटिंगची सुविधादेखील दिलेली असते. बहुतेक वेळा लहान मुलं गेम खेळायला बसतात आणि त्या गेममध्ये चॅटिंग सुरू होतं. त्यांना वाटतं की समोरचा खेळाडू हा त्यांच्या वयाचा असेल. पण वास्तवात समोरचा कोण आहे याची काहीच खात्री नसते आणि अनेकदा ती प्रौढ व्यक्तीच असते.
गेम खेळताना सुरुवातीला साध्या गोष्टी लहान मुलांना सांगितल्या जातात. जेणेकरून त्या लहान मुलाचा पूर्ण विश्वास त्याच्यावरती बसेल. विश्वास संपादन करण्यासाठी पुढील काही गोष्टी सहजपणे सांगता येतात जसे की-
“तुझी बॅटरी लो आहे का?”
“मी तुला एक ट्रिक सांगतो, ज्याने तू गेममध्ये नवीन फीचर्स मिळवू शकतेस.”
लहान मुलांना या गोष्टीचं कुतूहल वाटतं की, यांना या गोष्टी कशा कळल्या? मग नवीन नवीन प्रश्न निर्माण होतात आणि त्यांना आपल्या मित्रांमध्येही स्वतः आपण हुशार झालो आहोत हे दाखवण्याकरता त्या ट्रिक शिकण्याची इच्छा प्राप्त होते. “याला कसं कळलं?”
इथूनच संवाद वाढतो. विश्वास निर्माण होतो.
पुढे ती व्यक्ती सांगते की. “हे खूप सोपं आहे, फक्त हे अॅप इन्स्टॉल कर.” आणि मुलं त्या सापळ्यात अडकतात. एकदा का त्यांनी अॅप इन्स्टॉल केलं आणि access दिला, की समोरच्या व्यक्तीसाठी त्यांना नियंत्रित करणं खूप सोपं होतं.
या सगळ्यामागे कोणते गुन्हे दडलेले असतात?
- ऑनलाइन ग्रूमिंग (Online Grooming)
- बाल लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्या (Child Sexual Abuse Material – CSAM)
- Live Streaming द्वारे शोषण
- सायबर गुंडगिरी व सायबर छळ (cyber abuse / cyber exploitation)
- मानवी तस्करी (Human Trafficking)
- आर्थिक शोषण (Financial Exploitation)
हे गुन्हे दिसायला वेगळे असले तरी त्यांची सुरुवात अनेकदा अशाच छोट्या “chat” पासून होते. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, धोका अनोळखी लोकांकडूनच येतो असं नाही. तो एखाद्या सुशिक्षित, चांगल्या दिसणाऱ्या प्रोफाइलच्या मागेही लपलेला असू शकतो. आजच्या डिजिटल युगात मुलं आणि महिलांसाठी सर्वात मोठा धोका म्हणजे विश्वास. कोणीतरी गोड बोलतं, आपुलकी दाखवतं, समान वयाचं भासवतं आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो. पण हा विश्वासच अनेकदा सापळा ठरतो.
पालकांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :
- मुलं कोणती अॅप्स वापरतात हे जाणून घ्या.
- त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स पूर्णपणे private ठेवा.
- अनोळखी व्यक्तीशी बोलू नये हे फक्त सांगू नका, उदाहरणांसह समजवून सांगा.
- स्क्रीन टाइम आणि डिजिटल ॲक्टीव्हीटीवर लक्ष ठेवा
- मुलांशी मित्र म्हणून संवाद ठेवा, तपास अधिकारी म्हणून नाही
महिलांसाठी :
- अनोळखी व्यक्तीशी वैयक्तिक माहिती शेअर करू नका
- व्हिडिओ कॉल, फोटो किंवा sensitive content शेअर करताना दोनदा विचार करा.
- “तू नाही दिलंस तर मी तुझं हे करीन” अशा प्रकारचा दबाव आला, तर लगेच संवाद थांबवा.
- अशा प्रसंगी घाबरून शांत बसू नका- report करणं खूप महत्त्वाचं आहे
आजचा खरा रावण दहा डोक्यांचा नाही… तो हजारो बनावट प्रोफाइल्सच्या रूपात आपल्या मोबाईलमध्येच लपलेला आहे.
प्रश्न एवढाच आहे की, आपण त्याला ओळखणार का, की त्याच्या जाळ्यात अडकणार?
डिजिटल जग टाळता येणार नाही, पण त्यात सुरक्षित राहणं नक्की आपल्या हातात आहे.
या लेखमालेच्या पुढील भागांमध्ये आपण प्रत्येक सायबर गुन्ह्याचा सखोल उलगडा करणार आहोत. प्रत्येक प्रकार समजून घेत, त्यामागील पद्धती आणि डावपेच ओळखणार आहोत, आणि त्यासोबत वास्तवातील उदाहरणांद्वारे त्याची गंभीरता अनुभवणार आहोत. जेणेकरून केवळ माहितीपुरते मर्यादित न राहता, खरी जागरूकता आणि सुरक्षिततेची सवय निर्माण होईल.
(सायबर फॉरेन्सिक विश्लेषक)
dnyandev.najan@yahoo.in
