“अपूर्वा, अगं तुम्ही अभ्यासासाठी एकत्र आलात ना?… परीक्षा अगदी जवळ आली आहे. बारावीचं वर्षं आहे. आता जरा सिरीयस व्हा.”
“आई, अगं आमचं सर्व प्लानिंग झालं आहे. थोडा वेळ ब्रेक घेऊन आम्ही चिल मारतो आणि मग पुन्हा सुरू करतो. तू टेन्शन घेऊ नकोस.”
अपूर्वाच्या मैत्रिणी घरी अभ्यासासाठी आल्या होत्या. मुलांची बारावी म्हणजे खरंतर मुलांपेक्षा आईवडिलांनाच टेन्शन. आसावरी सुट्टी घेऊन अपूर्वासाठी घरी थांबली होती. मुलींसाठी चहा आणि स्नॅक्स घेऊन ती खोलीत गेली तेव्हा मुली सायन्सच्या ‘डायग्राम’ काढण्यात मग्न होत्या. त्यांनी अगदी प्रामाणिकपणे फोन बाजूला ठेवले होते. तेवढ्यात सानियाचा फोन वाजला. ती आसावरीला म्हणाली, “काकू, प्लीज कुणाचा फोन आहे बघता का?” आसावरीनं हातातल्या कपबश्या बाजूला ठेवून फोन बघितला, तर स्क्रीनवर ‘डायन’ असं दिसत होतं. सानियाला सांगताच ती पटकन म्हणाली, “काकू, फोन उचलू नका. फक्त साउंड म्यूट करा.” आसावरीनं आवाज बंद केला आणि स्क्रीन बघून ती म्हणाली, “सानिया अग डायनचे ८ मिसकॉल आणि हिटलरचे १२ मिसकॉल दिसत आहेत… कोण आहेत हे? आणि तू त्यांचा फोन का घेत नाहीस? तुला कोणी त्रास देतंय का?…” आसावरी हे बोलल्यावर मुलींमध्ये चांगलाच हशा पिकला. आसावरी गोंधळूनच गेली. शेवटी न राहावून अपूर्वा म्हणाली, “अगं, तिच्या मम्मा आणि पप्पाचा फोन येतोय.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : मैत्रिणींनो सोन्यात गुंतवणूक करताय?… मग हे माहिती हवंच

“काय हे सानिया! आईवडिलांचा फोन असं कोणी डायन आणि हिटलर म्हणून सेव्ह करतं का?” खरंतर आसावरीला तिच्या या वागण्याचा खूपच राग आला होता. “काकू, अहो ते दोघंही तसंच वागतात. पप्पा घरात सतत हुकूम सोडत असतात. ते ऑफिसमध्ये बॉस आहेत, त्यांना तिथं तसंच वागावं लागतं. पण घरातही ते तसंच वागतात. सर्व गोष्टी त्यांच्याच इच्छेप्रमाणे व्हायला हव्यात असं त्यांना वाटतं. आता माझंच बघा ना, मला सायन्समध्ये आजिबात इंटरेस्ट नव्हता पण त्यांनी मला अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतली. त्यात मला ‘पीसीएमबी’ आजिबात घ्यायचं नव्हतं पण जबरदस्तीनं बायोलॉजी घ्यावं लागलं. मी कुठे जायचं, कुठे नाही, काय खायचं, काय नाही, कधी झोपायचं, कधी उठायचं हे सगळं तेच ठरवतात. ही हिटलरशाही नाही तर काय आहे? माझी मम्मा पण तशीच आहे. सारखी घरात कटकट करते. एक तर तिला माझ्याकडे लक्ष द्यायला आजिबात वेळ नाहीये. म्हणून सतत फोनवर मी कुठे आहे, मी काय करते आहे, हे ऑफिसमधून विचारत राहते. रात्री सर्वजण घरात असलो, तरी एकतर त्या दोघांचं फोनवर काहितरी बोलणं सुरू असतं, नाहीतर दोघांची भांडणं चालू असतात. मी डॉक्टर व्हावं अशी पप्पाची इच्छा आहे, तर इंजिनिअर होऊन परदेशात जावं अशी मम्माची इच्छा आहे. माझ्यावरून घरात सारखी कटकट चालूच असते. माझी बारावीची परीक्षा एवढी जवळ आली आहे, पण दोघांनाही माझ्यासाठी वेळ काढता येत नाही. ढीगभर अपेक्षा फक्त माझ्याकडून ठेवतात, पण मला नक्की काय हवंय याचा विचार दोघंही करत नाहीत. किमान परीक्षेच्या कालावधीत तरी घरात शांतता हवी असते, पण आजच दोघांचं खूप भांडण झालं, विषय होता माझ्या बारावीनंतर मी कोणत्या ‘सीईटी’ द्यायच्या. दोघंही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते. माझं बाहुलं करून टाकलंय दोघांनी. ते सांगतील तसं मी वळायचं आणि त्यात दोघांचं एकमत कधीच नसतं. मी मम्माच ऐकावं, की पप्पांचं, या बाबतीत मी नेहमीच कन्फ्युज्ड असते. मला काय वाटतं याचा विचारच करत नाहीत ते. आता काकू तुम्हीच सांगा, मी या नावांनी त्यांचा नंबर सेव्ह केला तर माझं काय चुकलं? आज तर मी त्यांना न सांगताच तुमच्याकडे अभ्यासाला आली आहे. म्हणूनच आता मी कुठे आहे हे पाहण्यासाठी फोन करत असतील.”

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : परीक्षा आणि पॅनिकी

सानियाची बाजूही योग्य होतीच. पालकांनी आपले विचार मुलांवर लादून चालतच नाही. त्यांच्या विचारांचा, भावनांचा आदर नक्कीच केला पाहिजे. बऱ्याच वेळा मुलांना आपण नक्की पुढे काय करावं याचं ज्ञान नसतं. किंवा आपले मित्रमैत्रिणी जे करतात तेच आपल्याला करायचं आहे असं त्यांना वाटत असतं. पण अशा वेळी पालकांनी आपल्या मुलाचा कल बघून त्याला विविध मार्ग सुचवावेत आणि त्याचं महत्त्वही समजावून सांगावं म्हणजे त्यांना योग्य दिशेकडे नेता येईल. मुलांसमोर बोलताना पालकांचं एकमत होणं आवश्यक आहे आणि ते होत नसेल तरीही एकमेकांचा मुद्दा खोडून काढून वाद करण्यापेक्षा मुलाच्या दृष्टीनं काय योग्य आहे याचा विचार करायला हवा. मुलांसमोर झालेल्या वादामुळे मुलं बऱ्याच वेळा कोमेजून जातात. त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो. पण काही वेळेस मात्र मुलं स्मार्ट होतात आणि त्याचा फायदा घेऊन दोन्ही पालकांना फसवत राहतात. म्हणूनच आपले मतभेद शक्यतो मुलांसमोर नकोच, याची काळजी घेणं गरजेचं आहे.

आणखी वाचा : तुम्हीही सुपरमॉम सिंड्रोमच्या शिकार झाला आहात का?

आसावरीचं आत्मचिंतन चालू होतं, पण त्याचवेळी तिनं सानियालाही समजावून सांगितलं, “सानिया, त्यांना फोन करून तू इथं असल्याचं सांग बरं! ते दोघंही काळजी करत असतील. त्या दोघांच्या वागण्याचा तुला त्रास होत असला, तरी ते तुझ्या भल्याचाच विचार करत आहेत. काही गोष्टी पटल्या नाहीत, तरीही त्यांचा राग राग न करता त्यांचा आदर ठेवणं गरजेचं आहे. आपल्या संस्कारातूनच आपलं प्रतिबिंब दिसत असतं. त्यांना दोघांनाही तुझं म्हणणं नक्की पटेल. तूही बोल त्यांच्याशी…” आता सानियालाही आसावरीचं म्हणणं पटलं होतं. ती मम्माला फोन लावण्यासाठी उठलीच…
smitajoshi606@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dayan hitlar and so on to mummy and daddy why son or daughter thinks so parents must understand vp
First published on: 20-01-2023 at 17:15 IST