अनुजा कर्णिक मोहिले
या लेखमालेत आपण स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ऋतुप्राप्तीपासून सुरू झालेल्या या प्रवासात आपण मुलींची वाढ, पोषण, बदलती जीवनशैली, हार्मोन्स आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आव्हानांबद्दल चर्चा केली. आज या प्रवासातील आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊ या- ‘मातृत्व’.

गर्भधारणा हा केवळ नऊ महिन्यांचा काळ नाही; ती अनेक वर्षांच्या पोषण, सवयी आणि आरोग्याची पुढची पायरी आहे. एखादी स्त्री गरोदर राहिल्यानंतर तिच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं जातं. पण त्या आधी तिच्या शरीराने या प्रवासासाठी किती तयारी केली होती, हा प्रश्न अनेकदा विचारलाच जात नाही. खरं तर निरोगी गर्भधारणेची तयारी लग्नानंतर नव्हे, तर मुलीच्या ताटात वाढलेल्या प्रत्येक घासाबरोबर सुरू होत असते.

किशोरवय हा केवळ उंची आणि वजन वाढण्याचा काळ नसतो; तो भविष्यासाठी शरीरात पोषणाची गुंतवणूक होण्याचाही काळ असतो. ICMR-NIN च्या आहार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या वयात संतुलित आहार, विविध अन्नगटांचा समावेश, पुरेसं प्रथिन, लोह, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 (आवश्यकतेनुसार), तसेच नियमित शारीरिक हालचालीवर भर देण्यात आला आहे. लोहाची कमतरता केवळ रक्ताल्पतेपुरती मर्यादित नसून पुढील गर्भधारणेच्या तयारीवरही परिणाम करू शकते. कॅल्शियम आणि प्रथिनं शरीराची वाढ, हाडांचं आरोग्य आणि पुढील आयुष्यातील गरजांसाठी महत्त्वाची असतात. त्यामुळे मुलीच्या ताटात आज वाढलेलं अन्न हे केवळ तिची आजची भूक भागवत नसतं; ते तिच्या उद्याच्या आरोग्याची आणि भविष्यातील मातृत्वाचीही गुंतवणूक करत असतं.

गर्भधारणेदरम्यान आईचं शरीर एका नव्या जीवाला वाढवत असतं; पण त्याच वेळी स्वतःच्याही शरीरात मोठे बदल घडवत असतं. वाढलेलं रक्तप्रमाण, अपऱ्याची निर्मिती, गर्भाशयाची वाढ, हार्मोनल बदल आणि पुढे स्तनपानाची तयारी… या सर्वांसाठी शरीराला अतिरिक्त पोषणाची गरज असते. म्हणूनच गर्भधारणा म्हणजे ‘दोन जणांसाठी खाणं’ नव्हे; तर अधिक पोषणमूल्य असलेला संतुलित आहार घेणं होय. ICMR-NIN नियमित जेवण, पुरेसं प्रथिन, कडधान्यं, डाळी, दूध किंवा त्याचे पर्याय, अंडी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं आणि पुरेसं पाणी यांचा समावेश करण्याचा सल्ला देते. आईचं पोषण तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतंच; त्याचाच सकारात्मक परिणाम गर्भाच्या वाढीवरही होतो.

बाळाच्या जन्मानंतरही हा पोषणाचा प्रवास संपत नाही. स्तनपान हा त्याचाच पुढचा टप्पा असतो. WHO आणि UNICEF पहिल्या सहा महिन्यांसाठी केवळ स्तनपानाची शिफारस करतात. परंतु स्तनपान ही केवळ बाळाला दूध देण्याची प्रक्रिया नसून आईच्या शरीरासाठीही मोठी जैविक गुंतवणूक असते. गर्भधारणा आणि स्तनपान म्हणजे शरीराने अनेक वर्षे जपून ठेवलेल्या या पोषणगुंतवणुकीचा वापर. त्यामुळे या काळात पुरेसं प्रथिन, कॅल्शियम, लोह, द्रवपदार्थ आणि संतुलित आहार आवश्यक ठरतो. बाळाला पोषण देताना आईच्या शरीरालाही स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी पोषणाची गरज असते.

याच ठिकाणी अनेकदा एक महत्त्वाची चूक घडते. नवजात बाळाच्या काळजीत आईचं स्वतःचं जेवण, झोप आणि विश्रांती मागे पडतात. त्यातच काही महिलांवर प्रसूतीनंतर लवकर वजन कमी करण्याचा सामाजिक दबाव असतो. काहीजणी मुद्दाम कमी खाणं सुरू करतात, तर काहीजणी स्तनपानामुळे शरीराचा आकार बदलू नये म्हणून आहारावर बंधनं आणतात. अशा वेळी शरीराने अनेक वर्षांत केलेल्या या पोषणगुंतवणुकीची भर पुन्हा पडत नाही. संशोधनामध्ये यालाच maternal depletion असं म्हटलं जातं. म्हणजेच गर्भधारणा आणि स्तनपानानंतर शरीराला आवश्यक असलेली पोषणभरपाई न झाल्यास थकवा, अशक्तपणा, स्नायूंची कमजोरी, केस गळणं किंवा दीर्घकाळ ऊर्जा कमी जाणवणं यांसारख्या समस्या दिसू शकतात.

प्रसूतीनंतर दिले जाणारे मेथी, अळीव, डिंक, सुकामेवा किंवा इतर पारंपरिक पदार्थ यांना अनेकदा ‘वजन वाढवणारे’ म्हणून पाहिलं जातं. प्रत्यक्षात प्रश्न पदार्थांचा नसून त्यांचं प्रमाण, एकूण आहाराचं संतुलन आणि आईच्या गरजांचा असतो. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून हे पदार्थ ऊर्जा, प्रथिनं, चांगली चरबी आणि काही महत्त्वाची पोषकतत्त्वं देऊ शकतात. त्याचप्रमाणे स्तनपानामुळे शरीराचा आकार कायमस्वरूपी बिघडतो ही समजूतही वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. शरीरातील बदलांवर गर्भधारणा, आनुवंशिकता, वजनातील बदल, जीवनशैली आणि प्रसूतीनंतरची पुनर्प्राप्ती या अनेक घटकांचा प्रभाव असतो.

मातृत्व ही केवळ जैविक प्रक्रिया नाही; ती सामाजिक प्रक्रियाही आहे. आईच्या ताटात पौष्टिक अन्न पोहोचणं, तिला पुरेशी विश्रांती मिळणं, घरातील जबाबदाऱ्या वाटून घेणं आणि भावनिक आधार मिळणं यासाठी संपूर्ण कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असते. निरोगी आई ही केवळ तिची वैयक्तिक जबाबदारी नसून कुटुंबाची आणि समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे.

ऋतुप्राप्तीपासून मातृत्वापर्यंतचा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो- स्त्रीचं आरोग्य कोणत्याही एका टप्प्यावर घडत नाही. ते आयुष्यभर घडत राहतं. आणि त्या प्रवासात योग्य पोषण, योग्य सवयी आणि योग्य आधारव्यवस्था हीच तिची खरी ताकद ठरते.

(महिला व बालपोषण तज्ज्ञ)

aahaartadnya1605@gmail.com