एखादी तरुणी डोंगराळ भागातील रस्त्यावर सायकल चालवत, दिवसभराच्या थकव्याशी झुंज देत, संध्याकाळच्या वेळेस फक्त दोन तासांसाठी कुस्तीच्या मॅटवर सराव करते तेव्हा त्या दृश्यातून आयुष्याची खरी लढाई दिसते. असामच्या गोलाघाट जिल्ह्यातील छोट्याशा अशा दिनेशपूर गावातून उगवलेल्या देबी डायमारीची कहाणी अशीच एक प्रेरणादायी लढाई आहे. देबी डायमारी, २८ वर्षांची बोडो जमातीतील या तरूणीने खेलो इंडिया ट्राइबल गेम्स २०२६ मध्ये महिलांच्या ६२ किलो वर्गात रौप्यपदक जिंकले आहे. मात्र, या पदकापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. वयाच्या सातव्या वर्षीच तिच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यामुळे देबीला आपल्या काका- काकींच्या आश्रयात राहावे लागले. काकांच्या घरची आर्थिक स्थिती इतकी हलाखीची होती की, रोजच्या जगण्यासाठीच संघर्ष करावा लागत असे. परंतु या परिस्थितीतही तिची खेळाविषयीची ओढ वाढत गेली.
सुरुवातीला देबी पॉवरलिफ्टिंग आणि आर्म रेसलिंगमध्ये आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत होती. . पण खऱ्या अर्थाने तिचे आयुष्य २०२२ मध्ये बदलले, जेव्हा तिची भेट आसाम संघाचे प्रशिक्षक अनुस्तूप नाराह यांच्याशी झाली. बोकाखात येथे झालेल्या एका आर्म रेसलिंग स्पर्धेदरम्यान अनुस्तूप सरांनी देबीमध्ये खेळाविषयी एक वेगळी चमक पाहिली. त्यांनी तिला थेट सांगितले की, तू कुस्ती खेळ. थोडा विचार करून देबी तयार झाली. अनुस्तूप सरांनी तिला काजीरंगा जवळील खेलो इंडिया सेंटरमध्ये सराव करण्याचा सल्ला दिला. पण इथेदेखील अडचणी होत्याच. सेंटरच्या जवळ राहण्यासाठी दरमहा १००० रुपयांचे भाडे द्यावे लागणार होते.
देबीकडे एवढे पैसे नव्हते. परंतु ती खचली नाही. ती छोट्या-मोठ्या नोकऱ्या करू लागली. २०२२ मध्ये तिने ईजी बाजार स्टोअरमध्ये २५०० रुपयांच्या मासिक पगारावर काम सुरू केले. दुसऱ्या वर्षी २०२३ मध्ये, तिला काजीरंगा येथील बोन विला रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलची स्वच्छता आणि देखभाल करण्याचे काम मिळाले, तिथे ७००० रुपये मासिक वेतनावर काम केले. दिवसभर पूल साफ करणे, पाणी तपासणे ही कामे करीत असे. दिवसभराच्या थकव्यानंतरही संध्याकाळी फक्त दोन तास कुस्तीचा सराव करणे हा तिचा रोजचा दिनक्रम बनला. ती सायकलवरून कामावर आणि सरावासाठी ये-जा करायची. प्रशिक्षक अनुस्तूप सरांनी जिल्हा कुस्ती संघटनेच्या मदतीने तिला नोकरी आणि एक सायकलही उपलब्ध करून दिली होती. देबी सांगते, ‘‘हे रौप्यपदक माझ्या कष्टांचे आणि अनुस्तूप सरांनी दाखवलेल्या माझ्यावरील विश्वासाचे फळ आहे. मी जे काही केले, त्यामागे रात्रंदिवसाची मेहनत आहे. पण मी यावर समाधानी नाही. आता मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक जिंकायचे आहे. तिच्या शब्दांतून तिची जिद्द दिसून येते. २०२२ मध्ये कुस्तीला सुरुवात केल्यावर अवघ्या काही महिन्यांत ती विशाखापट्टनम येथील सीनियर चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली. २०२४ मध्ये तिने आसाममध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. आणि आता २०२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावर ट्राइबल गेम्समध्ये रौप्यपदक जिंकून तिने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
देबीचे कुस्तीतील चढता आलेख पाहून कोच अनुस्तूप नाराह एका मुलाखतीत म्हणतात की, ‘‘देबीला पाहताक्षणीच समजले की तिच्यात खेळाडू बनण्याची क्षमता आहे. मी तिला सेंटरजवळ राहण्याचा सल्ला दिला. जेव्हा तिने भाड्याची अडचण सांगितली, तेव्हा मी तिला नोकरी आणि सायकल मिळवून दिली. ती काम आणि सराव योग्य पद्धतीने सांभाळायची.’’ कोचच्या या छोट्या-छोट्या मदतीने देबीला सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला आणि तिची झपाट्याने प्रगती झाली. देबीचे गेल्यावर्षी २०२५ मध्ये लग्न झाले. अनेकदा महिला खेळाडूंसाठी लग्नानंतरही खेळ चालू ठेवणे आव्हानात्मक असते. पण देबी म्हणते की, मी याबाबतीत खूप भाग्यवान आहे. माझे पती बंगळूरुमध्ये खाजगी कंपनीत नोकरी करतात आणि त्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे आणि सासरची मंडळीदेखील पूर्ण पाठिंबा देतात. सराव करताना खुराकासाठी लागणारे पैसे ते नियमित पाठवतात. ते म्हणतात की, तू फक्त खेळाकडे लक्ष दे बाकी चिंता करू नको. सासरच्या मंडळींच्या पाठिंब्यामुळे मी अधिक आत्मविश्वासाने सराव करत आहे.
आदिवासी समाजातील मुलींसाठी खेळाची संधी मर्यादित असते, पण देबीने आपल्या जिद्दीने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. देबी डायमारीचा हा संघर्ष केवळ कुस्तीच्या मैदानापुरता मर्यादित नसून गरीबीशी झुंज देणाऱ्या, कुटुंबाला गमावल्यानंतर हताश होणाऱ्या, स्वत:ची स्वप्ने सोडून देणाऱ्या असंख्य तरुण- तरुणींसाठी एक प्रेरणादायी ठरत आहे.
