भारतीय समाजात आजही असा समज आहे की, लग्नानंतर मुलीच्या स्वप्नांना पूर्णविराम मिळतो व घरच्या जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन अशा कौटुंबिक चौकटीत अडकल्यानंतर त्यांना स्वतःचे करिअर घडवणे कठीण होऊन बसते. मात्र, राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील जालीपा गावच्या दीपू कंवर यांनी ही समज मोडीत काढली आहे. त्यांनी लग्नानंतर जवळपास सात वर्षांनी आणि एका पाच वर्षांच्या मुलीची आई असतानाही, गुजरात ज्यूडिशियल सर्विस (GJS) परीक्षेत ७९ वी रँक मिळवून ‘सिव्हिल जज’ होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
दीपू कंवर या मूळच्या राजस्थानच्या बाडमेरमधील असल्या, तरी त्यांचे शिक्षण गुजरातमध्ये झाले. २०१९ मध्ये लोकेंद्र सिंह यांच्याशी त्यांचे लग्न झाले, तेव्हा त्या एलएलबीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होत्या. सामान्यतः लग्नानंतर मुलींची प्राथमिकता बदलते, चूल, मूल घरची कामे हे त्यांचे प्रथम काम बनते. पण दीपू यांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती. त्यांच्या पतींनीच त्यांना एलएलबी पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. लग्नानंतर त्या सासरी गेल्या, पण रिकाम्या हाताने नव्हे, तर कायद्याची पुस्तके आणि डोळ्यांत न्यायाधीश बनण्याचे स्वप्न घेऊनच. जामनगरच्या के. पी. शाह लॉ कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
दीपू यांच्या यशात त्यांच्या सासरच्या मंडळींचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे सासरे थान सिंह आणि सासू समद कंवर यांनी दीपू यांना कधीच ‘सून’ म्हणून केवळ घरकामात अडकवून ठेवले नाही. दीपू जेव्हा जेव्हा घरकामात मदत करायला जायच्या, तेव्हा त्यांचे सासरे त्यांना प्रेमाने रागावत म्हणायचे, ‘बिणणी (राजस्थानी भाषेत सूनबाई), तुम्ही फक्त अभ्यास करा. घरकामासाठी आम्ही आहेत.’ सासऱ्यांचे हे शब्द दीपू यांच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आणि मोलाचे ठरले. त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून सासरच्यांनी घरातच तिच्यासाठी एक स्वतंत्र खोली तयार केली होती. दीपू यांनी या खोलीला एखाद्या ‘हॉस्टेल’सारखे स्वरूप दिले होते, जिथे त्या दिवसरात्र कायद्याच्या कलमांचा अभ्यास करत असत. त्यांच्या सासूनेही त्यांना घरकामातून पूर्णपणे मुक्त ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले.
एवढा पाठिंबा असला तरी न्यायाधीश बनण्याचा हा प्रवास दीपू यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यांना दोन वेळा मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. २०२२ साली त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली त्यात पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्या, पण मुलाखतीत थोड्या मार्कांनी हुकल्या. दुसरा प्रयत्न त्यांनी २०२३ साली केला, पण यावेळी त्या मुख्य परीक्षेतच अडकल्या. सलग दोन वळा अपयश आल्याने त्या थोड्या खचल्या होत्या, तरीही त्यांनी जिद्द ठेवली. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नासाठी आधीच्यापेक्षा दुप्पट वेगाने तयारी सुरू केली. सोबत वकिली डीग्री घेतल्यानंतर २०२१ पासूनचा त्यांनी व्यावसायिक वकील म्हणून सराव करायला सुरुवात केली होती. कारण हा अनुभव ज्युडिशियल सर्व्हिससाठी अनिवार्य असतो. अखेर २०२५ च्या परीक्षेचा निकाल लागला आणि दीपू यांनी ७९ व्या रँकसह यश मिळवले आणि न्यायाधीश होण्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले.
एका मुलाखतीत दीपू सांगतात की, जेव्हा निकाल लागला तेव्हा त्या आपल्या माहेरी होत्या. निकाल पाहताच त्या आपल्या वडिलांसह थेट सासरी पोहोचल्या आणि ही आनंदाची बातमी दिली. त्यांच्या यशाचे श्रेय त्या पूर्णपणे आपले पती लोकेंद्र सिंह आणि सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्याला देतात. जर कुटुंबाने मुलगी किंवा सुनेच्या स्वप्नांचा आदर केला आणि त्यांना पाठिंबा दिला, तर त्या कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतात.’
चेहरा झाकेपर्यंत पदर घेणारी सून गुजरातमध्ये न्यायाधीशाचा कोट घालून न्यायदान करणार आहे. दीपू कंवर यांची कहाणी ही केवळ एक यशाची कहाणी नसून ती संघर्षाची, हार न मानणाऱ्या जिद्दीची प्रतीक बनली आहे. आजही स्त्रिया लग्नानंतर आपले शिक्षण, स्वप्ने सोडून देतात त्यांच्यासाठी दीपू कंवर या एक आदर्श उदाहरण ठरल्या आहेत.
rohit.patil@expressindia.com
