कोणतेही कृत्य हे गुन्हा ठरण्याकरता कायद्याच्या चौकटीत गुन्ह्याच्या व्याख्येचे सर्व घटक त्यात असणे आवश्यक असते. विविध कायद्यांमध्ये विविध संज्ञांच्या व्याख्या केलेल्या असतात. या संज्ञा नेमक्या कशा वेगळ्या आहेत, याबाबत सर्वसामान्यांमध्येच नव्हे तर अनेक कायद्याच्या विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम असतो. अशाच व्याख्ये संदर्भात एक महत्त्वाचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिला.
नेमके घडले काय?
अवघ्या तीन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. आरोपी तिला आपल्या घरात घेऊन गेला. तेथे त्याने मुलीचे कपडे खाली केले, स्वतःचे कपडे उतरवले आणि स्वतःचे जननेंद्रिय मुलीच्या गुप्तांगावर घासले. त्यानंतर मुलगी रडत आईकडे आली आणि घडलेला प्रकार सांगितला. आई आरोपीकडे गेली असता, आरोपीने माफी मागितल्याचेही पुराव्यात आले. हे प्रकरण सत्र न्यायालयात गेले आणि आरोपीला पॉक्सो अंतर्गत दोषी ठरवत २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
मात्र, कथा इथे संपली नाही… या निकाला विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. पॉक्सो कायदा कलम ३ नुसार लैंगिक हिंसा किंवा गुन्हा सिद्ध होण्यासाठी केवळ लैंगिक स्वरूपाचे वर्तन पुरेसे नसते. प्रत्यक्ष प्रवेश (Penetration), अगदी अल्प प्रमाणात जरी असला तरी, सिद्ध होणे आवश्यक असते.
न्यायालयाने गुन्हा, आईचे कलम १६४ अंतर्गत दिलेले निवेदन आणि न्यायालयातील साक्ष, तसेच पीडित मुलीची साक्ष यांचा बारकाईने अभ्यास केला. सर्वच पुराव्यांमध्ये एक बाब समान होती, आरोपीने मुलीला घरात नेले, कपडे उतरवले, स्वतःचे जननेंद्रिय मुलीच्या गुप्तांगावर घासले, कपडे खराब झाले, परंतु कोठेही प्रत्यक्ष प्रवेश (Penetration) झाल्याचा उल्लेख नव्हता.
पॉक्सो कायदा कलम ३ मधल्या व्याख्येनुसार प्रत्यक्ष प्रवेश आवश्यक आहे. जर तो सिद्ध होत नसेल तर केवळ घासणे या कृत्याला Penetrative Sexual Assault म्हणता येणार नाही. म्हणजेच केवळ गुप्तांग घासणे (Rubbing) म्हणजे प्रवेश (Penetration) होत नाही
वैद्यकीय तपासणी आणि FSL अहवालात आरोपीचे DNA पीडितेच्या कपड्यांवर आणि इतर नमुन्यांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. परंतु न्यायालयाने येथे अत्यंत महत्त्वाचा फरक स्पष्ट केला, DNA जुळणे म्हणजे लैंगिक संपर्क झाला हे सिद्ध होऊ शकते; पण त्यामुळे Penetration झाला, असे आपोआप सिद्ध होत नाही. म्हणजेच DNA हा महत्त्वाचा पुरावा असला तरी तो Penetration चा पर्याय नाही.
आरोपीने मुलीला फसवून घरात नेले, कपडे उतरवले, स्वतःचे कपडे उतरवले, जननेंद्रिय घासले, वीर्यस्खलन झाले. हे सर्व पाहता आरोपी फक्त तयारी (Preparation) करत नव्हता. तो प्रत्यक्ष Penetrative Sexual Assault करण्याच्या प्रयत्नापर्यंत (Attempt) पोहोचला होता. Preparation म्हणजे गुन्हा करण्याची तयारी, Attempt म्हणजे तयारी संपल्यानंतर प्रत्यक्ष गुन्हा करण्यासाठी केलेली कृती. जेव्हा आरोपी प्रत्यक्ष गुन्हा करण्यासाठी कृती सुरू करतो, तेव्हा तो Attempt च्या टप्प्यात प्रवेश करतो.
दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले या प्रकरणात पूर्ण Penetrative Sexual Assault सिद्ध होत नाही. मात्र आरोपीचे कृत्य हे Attempt to Commit Aggravated Penetrative Sexual Assault या स्वरूपाचे आहे. त्यामुळे दोषसिद्धी कायम ठेवण्यात आली; परंतु कलम बदलण्यात आले. आरोपीला कलम ६ अंतर्गत दोषी धरून शिक्षा २० वर्षांवरून १० वर्षांपर्यंत कमी करण्यात आली. या प्रकरणात कायदेशीर तरतुदीचा, व्याख्येचा नुसता अर्थच लावण्यात आलेला नाही, तर किस काढण्यात आला आहे आणि त्याचा फायदा आरोपी गुन्हेगारास झालेला आहे.
प्रत्येक लैंगिक कृत्य म्हणजे Penetrative Sexual Assault नसते, Penetration सिद्ध करण्यासाठी कायद्यातील घटक पूर्ण करावे लागतात, DNA हा महत्त्वाचा पुरावा असला तरी तो Penetration सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसतो, आरोपीचा हेतू, कृती आणि परिस्थिती पाहून Attempt सिद्ध होऊ शकतो, गंभीर गुन्ह्यांमध्येही न्यायालय कायद्याच्या शब्दशः अटींकडे दुर्लक्ष करत नाही हे महत्वाचे निष्कर्ष या निकालाने प्रस्थापित केलेले आहेत. या निर्णयाने एकीकडे ‘Penetration’ या संकल्पनेची कायदेशीर मर्यादा स्पष्ट केली, तर दुसरीकडे गुन्हा पूर्ण झाला नसला तरी त्याचा प्रयत्न (Attempt) सिद्ध झाल्यास आरोपी गंभीर शिक्षेपासून सुटू शकत नाही, हेही ठामपणे अधोरेखित केले.
