आयुष्यात सारं काही सुरळीत सुरू असताना, अचानक एका टप्प्यावर वेगळेच वळण लागते. मग वयाचा विचार करता आपण घेतलेला निर्णय बरोबर की चूक, या फेऱ्याभोवती मन अडकून राहते. पण ५२ वर्षीय बलविंदर कौर या महिलेने घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात करीत आहोत व या संदर्भातील काही व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकले. तिच्या या व्हिडीओज ना चांगलाच भरभरून प्रतिसाद लाभला.

काहींनी तिला वयाच्या या टप्प्यावर असा निर्णय घेतला म्हणून कौतुक केले तर काहींनी घर बसल्या पैसे कमविण्याचा उद्योग म्हणून व्हिडीओ करतेस का, असा हेटाळणीचा सूर लावला.

तसं पाहिलं तर लग्न, घटस्फोट ही ज्याच्या त्याच्या जीवनातली खाजगी बाब असते. काही वर्षांपूर्वी आपल्या लग्नातल्या काही खास क्षणांचे व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकण्यात सेलिब्रेटी आघाडीवर होते. पण आता तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसेसुध्दा आपल्या लग्नातील संगीत, हळद, मेंहदी, वरमाला घालणे अशा अनेक प्रसंगांचे व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसिद्ध करीत असतात.

इतकेच नाही तर ब्रेक अप, घटस्फोट झालाय, त्यानंतरचे आयुष्य यावरचेदेखील व्हिडीओ प्रसिद्ध होत असतात. मग या मागची नेमकी मानसिकता काय असते? स्वत:च्या आयुष्याचे जाहीर प्रदर्शन, सहानुभूती मिळविणे की खरोखरीच एका वळणावर या गोष्टी आता सर्व सामन्यांच्या आयुष्यातदेखील घडू शकतात, याबाबतची जागरूकता.

इथे आपण वर उल्लेखिलेले बलविंदर कौरचे उदाहरण पाहू. आपल्या २५-२६ वर्षांच्या लग्नाच्या काळात तिला कित्येकदा जाणविले असेल की, आपला नवरा आपल्याला अपेक्षित अशी सन्मानाची वागणूक देत नाही. आणि मग एका मोक्याच्या क्षणी तिच्या मनाने बंड केले नि ठरविले की, झाले इतके पुरे झाले. आता सर्व बंधने तोडून मुक्त होऊया. पुढे काय करायचे, लोक काय म्हणतील, आपण असे सुखी राहू शकू का? या चिंता तिलादेखील सताविल्या असतील. पण तरीही तिने आपल्या मनाचे ऐकले आणि आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली.

खरं तर प्रत्येक लग्नाचे काही ना काही चांगले आणि वाईट अनुभव हे असतातच. पण लग्न निभावून नेण्याकडे आपल्या संस्कृतीचा कल असतो. या आगोदरही ५०-६० च्या वयाच्या आसपास लोकांचे घटस्फोट झाले असतील, पण त्यावेळी समाजमाध्यमं आजच्या इतका प्रभावी नसल्याने ती उदाहरणे आपल्या समोर आली नसतील. वयाच्या या टप्प्यावर जेव्हा घटस्फोट होतो, तेव्हा इतकी वर्षे काढली. अजून थोडी वर्षे काढायची आहेत, असं समजून एकत्र राहायचं, असा सूर समाजातून निघतो.

पण नातं जेव्हा जबरदस्तीने लादलं जातं, तेव्हा त्याचा ताण हा खूप जास्त असतो. अशावेळी आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी निरस वाटू लागतात. मग आहे त्या परिस्थितीपासून दूर पळण्याकडे बहुतांश स्त्रियांचा कल राहतो. मीच लग्नाच्या बाबतीत दुर्दैवी ठरले, माझेच लग्न अयशस्वी ठरले असे अनेक नकारात्मक विचार स्त्रियांच्या मनात येऊ लागतात.

मग जेव्हा बलविंदर सारखी उदाहरणे समोर येतात, तेव्हा आपण आपला निर्णय घेऊ शकतो, त्यासाठी वय हे मर्यादा नसते, ही बाब प्रकर्षाने समोर येते. अर्थात त्यासाठी पुढील आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा विचार त्या महिलेने सजगपणे केला पाहिजे. मग ही आव्हाने स्वत:चे नाव बदलण्यापासून ते थेट मोठ्या गुंतवणुकीपर्यंत वेगवेगळ्या स्वरुपाची असू शकतात. शिवाय स्वत:ची शारीरिक क्षमतादेखील सक्षम ठेवणे महत्त्वाचे असते.

आयुष्यात अनेकदा कसोटी पाहणारे क्षण येतात. त्यावेळी सारी बंधने झुगारून मोकळे व्हावे असे, कित्येकींना वाटत असते. तेव्हा स्वत:च्या क्षमता जोखून योग्य तो निर्णय घ्या.