ती एक राजकुमारी… राजघराण्यात जन्मलेली, श्रीमंतीत लाडाकोडात वाढलेली, उच्चशिक्षित. सत्ता, राजकारण तिच्यासाठी नवीन नाही. पण तरीही तिची नाळ तिच्या लोकांशी जोडलेली आहे. त्यामुळेच लोकशाही मार्गानेही तिच्या लोकांनी तिला निवडून दिलं आणि राज्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पदावर तिची नियुक्ती झाली. तिचं नाव दिया कुमारी. राजस्थानच्या नव्या उपमुख्यमंत्री. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं. पण काही राजकीय समीकरणांमुळे ते शक्य झालं नाही. तरीही उपमुख्यमंत्रीपद मात्र त्यांना मिळालंच. दिल्ली, जयपूर इथून शिक्षण घेतलेल्या दिया कुमारी यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलं आहे. १० वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केलेल्या दिया कुमारी यांनी या विधानसभा निवडणुकीत विद्याधर नगर मतदारसंघातून भरघोस मतांनी विजय मिळवला. पदार्पणातच म्हणजे २०१३ साली त्या पहिल्यांदा सवाई माधोपूर मतदारसंघातून विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. राजघराण्यातील महाराजा भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांच्या पोटी जन्मलेल्या दिया कुमारी यांचे वडील भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. त्यामुळे राजघराण्याबरोबरच लष्करी शिस्तीत त्यांचं पालनपोषण झालं. आजोबा मान सिंह द्वितीय हे जयपूरचे शेवटचे महाराजा मानले जातात. गर्भश्रीमंत असलेल्या दिया कुमारी या ‘लोकांमध्ये मिसळणाऱ्या राजकुमारी’ म्हणून ओळखल्या जातात. हेही वाचा - समुपदेशन: चॉकलेट ताण हवा की च्युइंगम ताण? प्रस्थापित वाटा सोडून वेगळ्या मार्गाने जाणं हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांचा भाजपप्रवेशही गाजला होता. १० सप्टेंबर २०१३ रोजी जवळपास दोन लाख लोकांसमोर त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश झाला होता. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. २०१३ साली त्या आमदार झाल्या. पण २०१८ ची निवडणूक त्यांनी लढवली नाही. मात्र २०१९ साली त्या राजसमंद मतदारसंघातून थेट संसदेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. भाजपच्या महत्त्वाच्या गटामध्ये (कोअर ग्रुपमध्ये) त्यांचा समावेश होतो. केंद्रातील नेतृत्वाने केंद्रातील काही नेत्यांना राज्यात पाठवण्याचा प्रयोग केला होता. त्यात राजस्थानात दिया कुमारी यांना यावेळच्या निवडणुकीत मोठी जबाबदारी देण्याच्याच उद्देशाने उतरवण्यात आलं होतं. त्यांनी यश मिळवलं आणि आपल्यावरचा विश्वास सार्थ केला. हेही वाचा - छोट्याशा गावात जन्मलेली सावी ठरली बेस्टसेलर लेखिका; आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह पुस्तकाचं अनेक भाषांमध्ये भाषांतर! वैयक्तिक आयुष्यात दिया कुमारी या बंडखोर म्हणून ओळखल्या जातात. या राजकुमारीनं कोणतीही राजघराण्याची पार्श्वभूमी नसलेल्या एका सर्वसामान्य घरातील नरेंद्रसिंह यांच्याशी प्रेमविवाह केला. १९९४ मध्ये दिल्लीत कोर्टात केलेल्या या विवाहाबद्दल दोन वर्षे कुठेही वाच्यता करण्यात आली नव्हती असं म्हटलं जातं. त्यानंतर १९९७ मध्ये त्यांचा भव्य स्वरुपात विवाहसोहळा झाला खरा. पण त्यांच्या या लग्नामुळे त्यांच्या समाजात मात्र नाराजी पसरली होती. त्यांच्या वडिलांना राजपूत सभेच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. २०१८ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यांचा मोठा मुलगा पद्मनाभ सिंह यांना जयपूरच्या गादीसाठी दिया कुमारी यांच्या वडिलांनी दत्तक घेतलं आहे. तो राजघराण्याचा वारसा पुढे चालवत आहे. आपल्याकडे राजघराणातल्या व्यक्तींबद्दल कुतूहल असतंच. तसंच ते दिया कुमारी यांच्याबद्दलही होतं. त्यांचं राजघराणं, उच्चशिक्षण आणि त्यांचं व्यक्तिमत्व यामुळे त्यांच्याबद्दल राजस्थानातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दिया कुमारी या सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळतात, रस्त्यावर पायी चालतात यामुळे लोकप्रिय आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे त्या दरवेळेस प्रचंड बहुमताने निवडून आल्या आहेत. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत तर त्या जवळपास ७० टक्के बहुमतांनी विजयी झाल्या होत्या. राजस्थानातील मुलींचं शिक्षण, त्यांना नोकरीच्या संधी हे त्यांच्या प्रचाराचे मुद्दे होते. lokwomen.online@gmail.com