आपण सगळे माहिती तंत्रज्ञानाने व्यापलेल्या डिजिटल युगात जगत आहोत. समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी लावलेला स्त्री शिक्षणाचा वेलू आता गगनावरी गेला आहे. आपल्या आसपास असं एकही क्षेत्र नाही की जिथे स्त्रिया नुसत्या काम करताना नाही तर नेतृत्व करताना दिसतात. समाजात स्त्री शिक्षणाचं वाढतं प्रमाण, स्त्री सक्षमीकरणासाठी होणारे प्रयत्न दिसत असताना आपल्या आजूबाजूला हुंडाबळीच्या घटना घडत आहेत. ते बघून कोणत्याही संवेदनशील माणसाची तळपायाची आग मस्तकात जाईलचं. पण अशा वेळी मनात विचार येतो की खरंच आपला समाज सुधारला आहे का?

२१व्या शतकातही समाजातल्या काही वाईट प्रथा नष्ट होण्याऐवजी मुळं घट्ट रोवून उभ्या असलेल्या आपल्याला दिसतात. त्यातलीचं एक हुंडा पद्धत. बदलत्या काळानुसार ही प्रथा बंद होण्याऐवजी नव्या रूपात समाजात रूजताना दिसते आहे. या अनिष्ट प्रथेपायी कितीतरी निष्पाप मुलींचे प्राण गेले आहेत, जात आहेत. काही महिन्यापूर्वीची हुंड्यापायी बळी गेलेली वैष्णवी हगवणे किंवा कालपरवाची नोएडामधली त्विशा शर्मा, दीपिका नागर सगळ्यांना माहीत आहेत. मनाला अस्वस्थ करणाऱ्या अशा कितीतरी घटना आपल्या देशात आजही कुठे ना कुठे घडता आहेत. यावरून आपला समाज प्रगतीशील आहे असं आपण म्हणू शकतो का?

खरं तर भारत सरकारने १९६१सालीच हुंडाप्रतिबंद कायदा केलेला आहे. त्या कायद्यानुसार हुंडा देणं व घेणं कायद्याने गुन्हा आहे. तरी समाजात उघडपणे हुंडा दिला जातो व घेतला जातो. हुंडा घेण्याच्या बाबतीत गरीबश्रीमंत असा भेदभाव दिसत नाही, तसा शिक्षित-अशिक्षित असाही भेदभाव दिसत नाही. मुलाकडचे लोक आपल्या ऐपतीनुसार हुंडा मागताना दिसतात. पैसा, दागदागिणे, महागडी गाडी, जमीन, फ्लॅट, लग्नाचा पूर्ण खर्च करणे अशा वेगवेगळ्या प्रकाराने हुंड्याची मागणी केली जाते. चांगल्या उच्च पदावर असणारे, उच्च शिक्षण घेतलेले लोकही यात मागे नाहीत. पैशाच्या हव्यासापायी लोक आपल्या मुलाचा सौदा करताना दिसतात. जेवढा नवरदेवाचं प्रोफाइल मोठं तेवढी हुंड्याची मागणी जास्त…

तसं पाहायला गेलं तर मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी जास्त बिनधास्त असते, स्मार्ट असते. पण आपण जेव्हा या हुंडाबळी गेलेल्या मुलींची शोकांतिका पाहतो तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो की, या मुली सासरचा त्रास का सहन करत होत्या? सहनशिलता संपेपर्यंत यांनी वाट का पाहिली? त्यांच्या आयुष्य संपवण्याने प्रश्न सुटले का? याचा समाज म्हणून आता आपल्याला विचार करायला हवा.

पूर्वीच्या काळी मुली फारशा शिकलेल्या नसायच्या, त्यांना माहेरचा पाठिंबा नसायचा. घरात सख्खीचुलत भावंड जास्त असायची. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून जर मुलगी माहेरी आली तर बाकीच्या भावंडाच्या लग्नकार्यात, त्यांच्या संसारात अडथळे येतील या भीतीपोटी मुलींनी कायमचं माहेरी येऊ नये असं घरच्यांना वाटायचं. त्याचा दबाव मुलींवर असल्यामुळे त्या नाईलाजास्तव सासरचा हुंड्यासाठी केला जाणारा जाच सहन करायच्या व आयुष्य ढकलत राहायच्या. पण आताची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे.

समाजात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व घरात एक किंवा दोन अपत्य असल्यामुळे जे दडपण पूर्वी सासरी गेलेल्या मुलीवर असायचं ते आता कमी झालेलं आहे. मुली चांगल्या शिकलेल्या असतात, माहेराहुनही त्यांना बऱ्यापैकी पाठिंबा असतो, त्या स्वतंत्र विचार करू शकतात, समाजमाध्यमांचा वापर सर्रास करत असतात. एखादी कठीण परिस्थिती आली, संकट आलं, तर कुठे, कशी आपल्याला मदत मिळेल याची माहिती त्यांना एका क्लिकवर मिळू शकते. त्यामुळे सासरी होणाऱ्या त्रासावर त्या स्वत: किंवा पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या मदतीने तोडगा काढू शकतात. तरी या मुली हुंडाबळीच्या शिकार का होतात हे कळत नाही…

लग्न करू इच्छीणाऱ्या जेन झी मुलींनी आता काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. जो मुलगा लग्नासाठी हुंड्याची मागणी करतो त्या मुलाशी लग्न न करण्याचा ठाम निर्णय त्यांनी घ्यायला हवा. सासरी गेल्यानंतर वारंवार पैशासाठी सासरचे लोक टोमणे मारत असतील किंवा त्रास देत असतील तर लगेच पालकांना सांगायला हवं. ज्या घरात आपल्याला मान सन्मान मिळत नाही, जिथे आपले अधिकार डावलले जातात, जिथे फक्त पैशामध्ये नाती तोलली जातात तिथे आपलं भविष्य सुरक्षित नाही हे जाणायला हवं. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढायला हवं. सासरी लक्ष्मीचा मान न देता जर नवऱ्यासकट सगळे लोक दासी बनवायला लागले तर मुलीने दुर्गेचा अवतार धारण करून स्वसंरक्षण करायला हवं.

ज्यांना आपल्या मुलीचे लग्न करायचे आहे त्यांनी काही गोष्टींचा विचार करायला हवा. हुंडा मागणाऱ्या घरात आपली मुलगी न देण्याचा निश्चय त्यांनी करायला हवा. सासरी गेलेल्या मुलीने केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता सासरच्या मंडळींना या संदर्भात जाब विचारायला हवा. पालकांनी खंबीरपणे आपल्या मुलीच्या पाठीशी उभं राहून तिला सांगायला हवं की, संसार टिकवणं ही तुझी एकटीची जबाबदारी नाही. हुंड्यापायी होणारा तुझा छळ तू सहन करू नकोस. त्या घरात राहून मरण्यापेक्षा तू आपल्या घरी परत ये व आनंदाने आयुष्य जग. असा मानसिक आधार सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीला पालकांनी द्यायला हवा.

हुंड्यासारखी समस्या सोडविण्यासाठी समाजातल्या लोकांची मानसिकता बदलणं गरजेच आहे. सगळ्या मुलींच्या पालकांनी ठाम निर्धार केला पाहिजे की, मी माझ्या मुलीचं लग्न हुंडा मागणाऱ्या लोकांच्या घरात करणार नाही. तर कदाचित चित्र बदलू शकतं. जेव्हा मुलाकडच्या लोकांना मुलगी शोधताना हा विरोध दिसेल तेव्हा त्यांना मुलाचं लग्न करायचं असेल तर हुंड्याची मागणी सोडून देण्याशिवाय पर्याय राहणारा नाही.

मुलींना आर्थिक सक्षम बनवताना मानसिकरित्याही त्या कशा सक्षम होतील हे पालकांनी पाहिले पाहिजे. शालेय जीवनापासूनच प्रत्येक मुलीला महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती दिली गेली पाहिजे. त्यामुळे मुली सजग होतील व अन्यायाला वाचा फोडतील. आपल्या देशात महिला आयोगासारखी संस्था महिलांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी उपलब्ध आहे. सासरच्या लोभी लोकांवर वचक ठेवण्यासाठी कायद्याची मदत घेणं गरजेचे आहे. त्यामुळे महिला आयोगाची मदत घेऊन मुलींनी व पालकांनी सासरच्या छळवणुकीचे प्रश्न सोडवायला हवेत.

थोडक्यात सांगायचं तर हुंडा घेण्याची अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. हुंड्यापायी छळणारे हात कमी करण्यासाठी तो छळ रोखणारे हात वाढवायला हवेत. महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवायला हवं. समाजात हुंडा देणं-घेणं चुकीचं आहे याबद्दल जनजागृती सतत व्हायला हवी. हुंडा न घेता लग्न करणाऱ्या कुटुंबाचा समाजाने सन्मान करायला हवा. हे पाहून अनेकांना हुंडा न घेण्याची सद्सद्विवेकबुद्धी येऊ शकते. तेव्हा समाजाला लागलेली हुंड्याची कीड आता समाजानेचं निपटून काढायला हवी, कारण ती सध्या काळाची गरज आहे…

mukatkar@gmail.com