प्लास्टिक सर्जरी आणि भाजलेल्या रुग्णांना आपल्या संशोधनाने नव जीवन देणाऱ्या डॉ. के. माथांगी यांचे वैद्यकीय विश्वातील योगदान अमूल्य आहे. अलीकडेच त्यांचे निधन झाले. आपल्या ज्ञानाचा उपयोग मूठभर लोकांपुरताच मर्यादित न ठेवता, तो सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा या उद्देशाने आयुष्यभर झटणाऱ्या डॉ. के. माथांगी रामकृष्णन यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी…

पदमश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या डॉ. के. माथांगी रामकृष्ण यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्यापैकी बहुसंख्य जणांना डॉ. के. माथांगी यांच्याविषयी माहिती नसेल, पण भारतीय तसेच जागतिक वैद्यकीय विश्वात त्यांचे योगदान अमूल्य आहे.

त्या नुसत्याच डॉक्टर नव्हत्या, तर प्रोफेसर, संशोधक, लेखक त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वावरणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्यादेखील होत्या. त्यांनी संशोधन करून विकसित केलेले ‘कोलेजन मेमब्रेन’ हे आगीत भाजलेल्या रुग्णांसाठी संजीवनच ठरले, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

१९३४ मध्ये जन्मलेल्या माथांगी यांनी मद्रास वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिका,इंग्लंड येथून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. परदेशात करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असूनदेखील आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशातील लोकांना व्हावा, या उद्देशाने त्या भारतात परतल्या.

चेन्नई येथील सेण्ट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने त्यांनी कॉलेजन मेमब्रेनचे तंत्र विकसित केले. हे तंत्र इतके परिणामकारक होते की, आगीत भाजलेल्या रुग्णांना या उपचारांमुळे त्वचा पूर्ववत होण्यास मदत होत होती. शिवाय या उपचार पद्धतीचा खर्चदेखील सर्वसामान्यांना परवडण्याजोगा होता.

मुळातच आगीत त्वचा भाजली की शरीराचा तो भाग विद्रूप होत असे. आणि ती जखम भरण्यास बराच वेळ लागत असे. काही काही रुग्णांमध्ये तर हे घाव कायमस्वरूपी राहत. पण त्यांच्या या तंत्राने अनेक रुग्णांच्या अंगावरील विद्रूपतेच्या जखमा अगदी सहजपणे पुसल्या गेल्या. त्यांचे हेच संशोधन भारतातच नाही तर जगभरातदेखील तितकेच प्रसिद्ध झाले.

त्यांनी सरकारी किलपौक वैद्यकीय महाविद्यालय, चेन्नई येथे प्लास्टिक सर्जरी आणि भाजलेल्या पीडित रुग्णांसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली. नुसताच विभाग स्थापन करून त्या थांबल्या नाहीत, तर इथे काम करणाऱ्यांना हुरूप वाटेल अशा पद्धतीचे वातावरण त्यांनी नेहमीच ठेवले. त्याचबरोबर पीडित रुग्णांना शारीरिक उपचारांबरोबर मानसिक उपचार देखील मिळतील याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. जेणेकरून वेदनेच्या उपचारांच्या काळात आपण देखील या जखमांमधून बरे होऊ शकतो, हा विश्वास पीडित रुग्णांमध्ये निर्माण करण्यास त्या यशस्वी ठरल्या. त्यांच्या या कामांवरील अपार श्रद्धेमुळे आज हा विभाग भारतातील नावाजलेल्या संस्थामध्ये गणला जातो.

प्लास्टिक सर्जरी आणि आगीने होरपळलेल्या पीडित रुग्णांवरील उपचारपद्धती या विषयावर भारतातील तसेच जगभरातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून शिकविले होते. याचबरोबर या विषयावर आधारित अनेक मार्गदर्शनपर पुस्तकेदेखील त्यांनी लिहिली आहेत. प्रोफेसर, सर्जन,लेखिका, संशोधक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आपल्या वैद्यकीय कालखंडात साकारल्या होत्या.

आपल्या कार्यालयीन कामकाजातून निवृत्त झाल्यावरदेखील त्या स्वस्थ बसल्या नाहीत. आगीच्या आसपास कामानिमित वावरताना कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी,भाजलेल्या भागाची कशी काळजी घ्यावी, त्यावर कोणते प्राथमिक उपचार करावेत, याबाबत मार्गदर्शन करणारे छोटे-मोठे कॅम्प त्यांनी ठीकठिकाणी घेतले.

आपल्या कामाविषयी अपार श्रद्धा असल्यामुळे, त्यांना भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अनेक नावाजलेले पुरस्कार मिळाले. पदमश्री पुरस्कार, जी.व्हिटेकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, एव्हीयार पुरस्कार, बी, सी. रॉय पुरस्कार अशा अनेक नामवंत पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या होत्या.

संशोधन क्षेत्रात त्यांना विशेष रस असल्यामुळे प्लास्टिक सर्जरी आणि आगीत होरपळलेल्या रुग्णांसाठी अजून आपण काय काय करू शकतो, याबाबतचा विचार नेहमीच त्यांच्या डोक्यात घोळत असे. आणि यावर इतरांकडूनदेखील नवीन विचार आल्यास त्या तितक्याच आनंदाने त्याचे स्वागत करीत असत.