लंडनमधील ‘रॉयल सोसायटी’ ही जागतिक स्तरावरील अत्यंत मानाची संस्था. या संस्थेसाठी ‘फेलो’ म्हणून निवड होणं, ही शास्त्रज्ञाच्या क्षेत्रात सर्वोच्च सन्मानाची बाब समजली जाते. विशेष म्हणजे १९६०-७०च्या दशकात हाच पुरस्कार आपले हरितक्रांती चे जनक प्रो. एम. एस. स्वामीनाथन यांना मिळाला होता. यंदाच्या वर्षी याच पुरस्कारासाठी त्यांच्या मुलीची निवड व्हावी म्हणजेच डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची निवड व्हावी, हा योगायोग नसून रॉयल सोसायटच्या कारकिर्दीतली एक मोठी ऐतिहासिक घटना आहे.
रॉंयल सोसायटीसाठी ‘फेलो’म्हणून निवड होणे हा शास्त्रज्ञ लोकांसाठीचा ‘सर्वोच्च बहुमान’ समजला जातो. विशेष म्हणजे काही दशकांपूर्वी वडिलांना हा सन्मान प्राप्त झाल्यानंतर आता मुलीलादेखील तोच सन्मान प्राप्त व्हावा, ही रॉंयल सोसायटीच्या इतिहासातलीदेखील एक ऐतिहासिक घटना आहे. आणि ही भारतासाठीदेखील तितकीच ऐतिहासिक घटना आहे, कारण हा सन्मान मिळविणाऱ्या ‘बाप-लेकी’ च्या जोडीचे नाव आहे- भारतरत्न प्रो. एम.एस. स्वामीनाथन आणि डॉ. सौम्या स्वामीनाथन. वडिलांनी १९६०-७०च्या काळात अन्न हरितक्रांती घडवून जगाला उपासमारीपासून वाचविले, तर क्षयरोग आणि एचआयव्ही सारख्या साथीच्या रोगांवर मात करण्याची ताकद लेकीने जगाला दिली.
भारतरत्न एम. एस. स्वामीनाथन यांना ‘हरितक्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाते, डॉ.सौम्या यांच्या कन्या होत. मुळातच हुशार असलेल्या सौम्या यांनी पुण्याच्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. नंतर दिल्लीतील एम्स या संस्थेतून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे अमेरिकेतील काही नामंकित रुग्णालयाची फेलोशिप मिळाल्यामुळे त्यांना कॅलिफोर्निया, लॉस एंजलिस येथे काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर काही वर्षे इंग्लंडमध्येदेखील काम करण्याची संधी मिळाली. आरोग्य क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्यानंतर त्या पुन्हा भारतात परतल्या.
इथे येऊन चेन्नईमधील एका संस्थेत संशोधन करीत असताना त्यांना जाणविले की, क्षय आणि एचआयव्ही सारखे रोग मोठ्या प्रमाणवर पसरत आहे. तेव्हा संशोधकांची एक टीम तयार करीत त्यांनी खेड्यापाड्यात, शहरोशहरी हिंडून हे रोग पसरण्यामागची कारणे जाणून घेतली. आणि त्यानुसार एक उपाय योजना ठरविली. ही योजना एक मोहिम म्हणून देशभरात मोठ्या प्रमाणावर राबविली. याचा परिणाम असा झाला की, दोन्ही रोगांचे उच्चाटन होण्यास मदत झाली.
एकेकाळी क्षय किंवा एचआयव्ही म्हटले की, रुग्ण थेट मृत्युच्या दारात, अशी एक प्रतिमा जनमानसात होती. पण डॉ. सौम्या यांच्या योजनेनं यावर मात केली. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांची भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या प्रधान सल्लागार म्हणून निवड झाली. सल्लागार म्हणून काम करीत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली की, इतर देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध असतो, तसा तो भारतात नाही. याबाबत त्यांनी सातत्याने पाठ-पुरावा करून भारत सरकारव्दारे हा निधी उपलब्ध करून दिला. यामुळे अनेक जनहित योजना लोकांपर्यत पोहोचण्यास मदत झाली.
यानंतर त्यांनी २०२२ पर्यत जागतिक आरोग्य संघटने (WHO) साठी मुख्य शास्त्रज्ञ तसेच उप महासंचालक म्हणूनदेखील काम केले आहे. जागतिक संघटनेच्या इतक्या महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत, हे विशेष. या व्यतिरिक्त कोविड काळातदेखील त्यांनी आपले खूप मोठे योगदान दिले. जागतिक तसेच भारतातल्या अनेक महत्त्वाच्या आरोग्य संस्थाची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना निव्वळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर देखील विविध सन्माननीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
नुकतीच लंडन येथील रॉयल सोसायटी तर्फे ‘फेलो ऑफ द रॉयल सोसायटी’ च्या नावाची घोषणा झाली. यासाठी डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे ही घोषणा आपले थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केली. रॉयल सोसायटी साठी फेलो म्हणून निवड होणाऱ्या डॉ. सौम्या या दुसऱ्या भारतीय महिला आहेत. या आगोदर २०१९ मध्ये व्हॅक्सिनोलॉजिस्ट गंगादीप कांग यांना मिळाला होता. मोठ्या वृक्षाच्या छायेखाली लहान झाडाची सावली झाकोळली जाते, असा अनुभव आपल्याला रोजच्या जीवनात बऱ्याचदा अनुभवायला मिळतो. अशी अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे आहेत की, ज्यांनी आपल्या क्षेत्रात स्वत:चा असा खास ठसा उमटविला. पण त्यांची मुले मात्र तो दर्जा प्राप्त करू शकली नाहीत. पण डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी मात्र नियमाला अपवाद हे असतात हे सिद्ध केले. ही तमाम भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.
