डॉ. सुरी श्रीमथी यांचा १९३३ साली एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील व्यवसाय करीत असत. आई-वडिलांचे विचार त्याकाळी आधुनिक स्वरूपाचे होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलांना शिकविण्यावर भर दिला. सुरींचा लहानपणापासून वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा होता. त्यामुळे जेव्हा त्यांनी डॉक्टर होण्याचा विचार आपल्या पालकांसमोर मांडला, तेव्हा त्यांना घरातून प्रोत्साहनच मिळाले. १९५८ मध्ये उस्मानिया विद्यापीठातून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.

पुढे प्रसूतीतज्ज्ञ म्हणून रुग्णालयात काम करण्याचा आपला विचार मांडला, तेव्हा नातलगांनी त्यास विरोध दर्शविला. तरूण स्त्रीने घराबाहेर जाऊन काम करणे हे त्या काळी अपेक्षित नव्हते.

त्याच सुमारास गावातील एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात बैलगाडीतून नेत असताना उशीर झाल्यामुळे वाटेत आई व बाळ दोघांचाही मृत्यु झाला. या घटनेने त्यांच्या मनावर फारच खोलवर परिणाम केला. भविष्यात अशी घटना परत घडू द्यायची नाही, या निश्चयाने त्यांनी नातलगांचा विरोध पत्करून त्याकाळी आपल्या वैद्यकीय पेशाची सुरुवात केली.

त्यांनी ज्यावेळी डॉक्टर म्हणून कामाला सुरुवात केली, त्यावेळी भारतातील आरोग्य व्यवस्था आजच्या इतकी पुढारलेली नव्हती. स्त्रियांची प्रसूती घरातच किंवा सुईणीच्या हाताखाली होत असे. त्यामुळे अनेकदा योग्य उपचारांअभावी मातेला किंवा बाळाला तर कधी-कधी दोघांनाही आपला जीव गमवावा लागे. तेव्हा घरोघरी जाऊन दवाखान्यात प्रसूती करणं कसं योग्य आहे, हे त्यांनी पटवून दिले.

हळूहळू त्यांचे विचार गावातील लोकांना पटले आणि परिस्थितीत फरक पडू लागला. जसजशा त्या प्रसूतीतज्ज्ञ म्हणून नावाला येऊ लागल्या, तसतसे त्यांनी या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण घेतले. प्रसूती व स्त्रीरोग शास्त्र विषयात त्यांनी एम.डी. केले.

प्रसूती करणं हे फक्त त्यांच्यासाठी केवळ व्यावसायिक काम नाही आहे, तर प्रसूती दरम्यान आई व बाळ दोघेही कसे सुखरूप राहतील यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्या या गुणामुळेच आजवर त्यांनी दोन लाखाहून अधिक अवघडलेल्या प्रसूती यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. आजवर शेकडोहून अधिक सरकारी आणि खाजगी डॉक्टरांना प्रसूती संदर्भात योग्य मार्गदर्शन दिले आहे.

गर्भाशय हा त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे गर्भधारणा, गर्भाशयाची आवश्यक ती काळजी, मासिकपाळी, रजोनिवृत्ती दरम्यान घ्यावयाची काळजी यावर वेळोवेळी अभ्यासपूर्ण व्याख्याने देऊन त्या सर्वाना मार्गदर्शन करीत असतात.

डॉक्टरी हा केवळ त्यांच्यासाठी पेशा नाही तर ते त्यांचे ध्येय आहे. त्यामुळेच आज वयाच्या ९२ व्या वर्षी देखील त्या तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. आजही त्या रोज रुग्णालयात जातात आणि रुग्णांना तपासतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात त्यावर मार्गदर्शन करतात.

आजचे प्रसूतीशास्त्र हे आधुनिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा अंदाज घेऊन त्यावर मात करणे हे सहज सोपे झाले आहे. परंतु डॉ. सुरी यांनी अशा काळापासून काम केले आहे, जेव्हा कोणत्याही स्वरूपाचे तंत्रज्ञान हाताशी नव्हते. तरीदेखील आपल्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी अनेक कठीण प्रसूती सुखरूपपणे पार पाडल्या. आणि या गोष्टी त्यांनाच जमू शकतात, ज्यांची आपल्या कामावर निस्सिम श्रद्धा असते.