भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
एंडोमेट्रिओसिसमध्ये डॉक्टरांच्या उपचारांसोबतच स्वतःची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असते, ज्यामुळे वेदना कमी होण्यास आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते. एंडोमेट्रिओसिसमध्ये कशी, काय काळजी घ्यावी, कोणती आसने करावी जेणेकरून वेदना कमी होऊन आराम मिळेल याबद्दल अधिक जाणून घेऊया.

डॉक्टरांशी बोलण्याव्यतिरिक्त, एंडोमेट्रिओसिसग्रस्त लोकांना स्थानिक रुग्ण मदत गटांद्वारे अधिक सल्ला आणि भावनिक आधार मिळू शकतो. असे रुग्ण मदत गट जवळपास आहेत का ते शोधले पाहिजे. शारीरिक थेरपी आणि कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (CBT) यांसारख्या बहुविद्याशाखीय वेदना व्यवस्थापन पद्धतींमुळे एंडोमेट्रिओसिसशी संबंधित वेदना कमी होण्यास आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत होऊ शकते. हे उपचार शारीरिक लक्षणे आणि या आजारामुळे येणारा भावनिक ताण या दोन्हींवर काम करतात. काही उपचारांचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात आणि उपचार संपल्यानंतर एंडोमेट्रिओसिसची लक्षणे कधीकधी पुन्हा दिसू शकतात. उपचारांची निवड ही प्रत्येक व्यक्तीमधील त्याची परिणामकारकता, दुष्परिणाम, दीर्घकालीन सुरक्षितता, खर्च आणि उपलब्धतेवर अवलंबून असते.

परिणाम : एंडोमेट्रिओसिसचे आरोग्य, समाज आणि आर्थिक स्थितीवर मोठे परिणाम होतात. तीव्र वेदना, मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे, थकवा, नैराश्य, चिंता, वंध्यत्व, खराब लैंगिक आरोग्य आणि एकटेपणा यांमुळे जीवनाचा दर्जा खूप खालावू शकतो. जागतिक स्तरावर एंडोमेट्रिओसिसचा संबंध वंध्यत्वाशी जोडला गेला आहे. वंध्यत्व असलेल्या महिलांपैकी २५ ते ५०% महिलांना एंडोमेट्रिओसिस असतो. पाळीदरम्यान होणाऱ्या जास्त रक्तस्त्रावामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊन थकवा येऊ शकतो. संबंध ठेवताना होणाऱ्या वेदनांमुळे महिला संबंध ठेवणे टाळू शकतात, ज्याचा परिणाम त्यांच्या आणि त्यांच्या जोडीदाराच्या लैंगिक आरोग्यावर होतो.

काही महिलांना या आजारामुळे इतक्या असह्य वेदना किंवा इतर त्रास होतो की, ज्यामुळे त्यांना कामावर किंवा शाळेत जाणे जमत नाही. यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते आणि समाजावरही याचा आर्थिक ताण पडतो. या उपचारांसाठी अनेकदा स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करावे लागतात, ज्यामुळे आर्थिक ताण आणखी वाढतो.

मासिक पाळीच्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्याची किंवा त्या सामान्य मानण्याची सामाजिक वृत्ती आणि अंधश्रद्धा यांमुळे हा त्रास सहन करणाऱ्या महिलांची परिस्थिती आणखीनच बिकट होते.

प्रतिबंध : सध्या एंडोमेट्रिओसिस रोखण्यासाठी कोणताही ज्ञात उपाय उपलब्ध नाही. या आजाराबद्दलची जागरूकता वाढवणे, वेळेवर रोगनिदान होणे आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे यामुळे आजाराचा वाढणारा वेग कमी करता येऊ शकतो किंवा तो थांबवता येऊ शकतो. यामुळे दीर्घकालीन लक्षणे कमी होण्यास मदत होते, ज्यामध्ये मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या वेदना संवेदनशीलतेचा धोका कमी होणेदेखील समाविष्ट असू शकते. सध्या या आजारावर कोणताही पूर्ण इलाज नाही.

आव्हाने आणि प्राधान्यक्रम : अनेक देशांमध्ये सामान्य जनता, कुटुंबातील सदस्य आणि बहुतेक आरोग्य कर्मचारी यांना याची जाणीवच नसते की एंडोमेट्रिओसिसमुळे महिलांना होणाऱ्या ओटीपोटातील तीव्र वेदना सामान्य नसतात. या वेदनांना ‘सामान्य’ समजणे आणि त्याबद्दल समाजात असलेला संकोच यामुळे एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त असलेल्या महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये एंडोमेट्रिओसिसचे लवकर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि उपकरणे असलेल्या बहुविद्याशाखीय डॉक्टरांच्या टीमची कमतरता आहे. याशिवाय, या आजाराबद्दल अजूनही बरीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे शरीराची कोणतीही चिरफाड न करता रोगनिदान करणाऱ्या पद्धती आणि गर्भधारणेत अडथळा न आणणारे वैद्यकीय उपचार शोधण्याची मोठी गरज आहे.

एंडोमेट्रिओसिसमध्ये घ्यायची काळजी : ओटीपोटावर किंवा पाठीच्या खालच्या भागावर हीटिंग पॅड, गरम पाण्याची पिशवी ठेवल्याने पेल्विक स्नायूंना आराम मिळतो आणि मासिक पाळीतील वेदना कमी होतात. कोमट पाण्याने अंघोळ करणेदेखील फायदेशीर ठरते. शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, संपूर्ण धान्य आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडसमृद्ध पदार्थ (जसे की अळशी, अक्रोड) समाविष्ट करा. मानसिक ताणामुळे एंडोमेट्रिओसिसच्या वेदना अधिक तीव्र होऊ शकतात. यासाठी ध्यान, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा तुमच्या आवडीचे छंद जोपासा. पुरेशी आणि चांगली झोप घेणे आवश्यक आहे. झोपताना कूस बदलून गुडघे छातीजवळ घेणे किंवा पाठीवर झोपल्यास गुडघ्याखाली उशी ठेवल्याने ओटीपोटावरील ताण कमी होतो आणि आराम मिळतो. एका डायरीमध्ये किंवा ॲपमध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी जास्त त्रास होतो, याची नोंद ठेवा. यामुळे डॉक्टरांना योग्य उपचार ठरवणे सोपे जाते.

कोणती योगासने आराम देतात

बालआसन (Child’s Pose) : कसे करावे?– गुडघ्यांवर बसा, मागे टाचांवर नितंब ठेवा. आता पुढे वाकून कपाळ जमिनीला टेकवा आणि हात पुढे सरळ पसरवा. या स्थितीत दीर्घ श्वास घ्या.

फायदा : हे आसन पाठीचा खालचा भाग, नितंब (hips) आणि ओटीपोटाच्या स्नायूंना हलका ताण देऊन आराम देते.

सुप्त बद्धकोणासन (Reclined Bound Angle Pose/ Cobbler’s Pose Regular Variation) : कसे करावे?- पाठीवर उताणे झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पावले एकमेकांना जोडत (फुलपाखरासारखे). गुडघे जमिनीच्या दिशेने जितके जातील तितके जाऊ द्या. आराम मिळण्यासाठी गुडघ्याखाली उशा ठेवू शकता.

फायदा : यामुळे ओटीपोटाचा भाग पूर्णपणे मोकळा होतो आणि तिथला ताण कमी होतो. मासिक पाळीतील वेदनांसाठी हे सर्वोत्तम आसन आहे.

विपरित करणी (Legs-Up-the-Wall Pose/ Inverted Pose) : कसे करावे?- भिंतीला लागून पाठीवर झोपा आणि दोन्ही पाय भिंतीच्या सहाय्याने वर सरळ ९० अंशात ठेवा. नितंब भिंतीच्या शक्य तितके जवळ असावेत. डोळे बंद करून शांत श्वास घ्या.

फायदा : यामुळे पेल्विक भागातील सूज कमी होते, रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो.

मार्जरासन-बितीलासन (Cat-Cow Pose) : कसे करावे?- हाताचे तळवे आणि गुडघे जमिनीवर ठेवून ‘चौपायी’ (tabletop) स्थितीत या. श्वास घेताना पाठ खाली झुकवा आणि मान वर करा (Cow). श्वास सोडताना पाठ वर करा आणि हनुवटी छातीला लावा.

फायदा : यामुळे पाठीचा कणा लवचिक होतो आणि ओटीपोटातील स्नायूंचे आखडणे कमी होते.

शवासन : कसे करावे?- पाठीवर सरळ झोपा. हात आणि पाय शरीरापासून थोडे दूर आणि सैल सोडा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा आणि शरीराला पूर्ण रिलॅक्स सोडा.

फायदा : हे आसन शरीर आणि मन पूर्णपणे शांत करते, ज्यामुळे तीव्र वेदना सहन करण्याची क्षमता वाढते.

महत्त्वाची काळजी : मासिक पाळी सुरू असताना किंवा तीव्र वेदना होत असताना शीर्षासन किंवा कपालभातीसारखे पोटावर जास्त ताण देणारे कठीण प्राणायाम/व्यायाम करू नका. प्रत्येक आसन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. जितके सहज जमेल तितकेच करा.
(लेखिका औषधनिर्माण शास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक आहेत.)
Bhagyashri1@zohomail.in