हेलसिंकीत जिथे रहाते होते त्या हॉटेल जवळच टर्मिनल-२ होतं जिथून इस्टोनियाची राजधानी टॅलीनला जाणारी क्रूझ सुटत होती. ट्रामने अगदीच दोन स्टॉप… अवघा दोन-अडीच तासांचा प्रवास. सकाळी लवकरची क्रूझ पकडून टॅलीन गाठलं. मस्त शहर होतं. आता दिवसभर मनसोक्तपणे जुन्या काळत टाईम ट्रॅव्हल केल्यासारखे भटकत राहायला मिळणार होतं. असं मुक्त आणि मन मोकळं भटकणं मला आवडतं. अगदी वॉकिंग टूरपेक्षाही ही अशी स्वच्छंदी टूर माझ्या विशेष आवडीची. मुख्य रस्त्यावर आले आणि एखादं शहर लोकांच्या दृष्टीकोनातून कसं असलं पाहिजे तशा पद्धतीनं आखलेलं जाणवलं. लांब रूंद रस्त्यावरून मजेत चालताना दूरवर दिसणारे चर्चचे, जुन्या राजवाड्याचे उंच मनोरे मुख्य ऐतिहासिक शहराकडे येण्याची साद घालत होते, पण इथल्या नागरी सोयीसुविधायुक्त रस्त्यांवरसुद्धा रेंगाळावंसं वाटत होतं. त्याला कारणही तसंच होतं. रस्त्यावर चालण्याचं सुख. हे सुख आपण विसरलोय हेच खरं! युरोपात नेमक्या या गोष्टीच्या  प्रेमात पडायला होतं.

परिषदेच्या तारखांमुळे यावर्षी एम्स्टर डॅमची ट्युलीप गार्डन हुकली होती. इथे सभोवती पसरलेली असंख्य ट्युलिप पाहून दुधाची तहान ताकावर भागण्याचे प्रयत्न चालले होते. लांब दांड्यांची सरळसोट वाढणारी ती  फुलं… गोलाकार पाकळ्यांची साधीशीच रचना आणि आत इवले चार पुंकेसर असलेली बास्… एवढंच आणि इतकंच, तरीही त्यांचे ते नितळ रंग, त्यातल्या अनेक रंगीत छटा इतक्या मनमोहक की खाली झुकून त्यांना ओंजळीत घेतल्याशिवाय पाऊल पुढे पडणारच नाही. जांभळी आणि चक्क काळी ट्युलिपही कमालीची सुंदर दिसत होती. टप्प्याटप्प्यावर ट्युलिपचे ताटवे फुललेले. वसंताची धुंद हवा पसरलेली, सूर्याच्या किरणांची ऊब आणि आठ नऊच्या अधेमधे फिरणारे तापमान सकाळ हवीहवीशी करत होतं.

निगुतीने जपलेल्या फुलांच्या ताटव्यांसोबतच त्याभोवती असलेली सरळसोट झाडंही नीट काळजीपूर्वक जपलेली. अधून मधून पडणारा पाऊस आणि जोरदार वाहणारा वारा याने ती उन्मळून पडू नयेत म्हणून त्यांच्या भोवती आधारासाठी जाड ओंडके उभे केले होते. त्या ओंडक्यांना धरून दोरीने एक वीण घालत, कमीत कमी जागा व्यापत त्या झाडाला चारी बाजूने आधार दिलेला होता. बरं हे सगळं बेढब दिसू नये, सौंदर्यात उणेपणा येऊ नये म्हणून झाडाभोवती एकरंगी ट्युलीपचे ताटवे होतेच.

मला चटकन् आपली पहिल्या पावसाबरोबर उन्मळून पडणारी झाडं आठवली. पावसाळ्यापूर्वी त्यांची किती अंधाधुंद छाटणी होते, त्या छाटणीत ना विचार असतो ना ममत्व. झाड टिकावं, ते बहरावं, पावसात त्याचा तोल जाऊ नये हे सगळे विचार कोणाच्या मनातही येत नाहीत.

बरं, तोडणी केलेल्या फांद्यांचा तरी उपयोग होतो का? तर तोही नाही. चारपाच दिवस फुटपाथवर पडून राहिलेल्या त्या फांद्या मग कचरा गाडीची धन होतात. स्विडन, पॅरिसमध्ये या तोडलेल्या फांद्यांच्या तुकड्यांचा फार सुंदर वापर केलेला मी पाहिला होता. संध्याकाळी प्रकाशात न्हाऊन निघणारा आयफेल  टॉवर बघायला म्हणून गेले होते, तेव्हा तिथल्या झाडांच्या बुंध्यापाशी तोडलेल्या अतिरिक्त फांद्यांच्या सालीचे बारीक तुकडे आच्छादन म्हणून वापरलेले आढळले. झाडाची मुळं उघडी पडून नयेत, त्यांना वारंवार पाणी द्यायला लागू नये यासाठी सूक्ष्म विचार करत केलेली एक साधीशी, पण कल्पक कृती होती ती. पण पर्यावरणाच्या संवर्धनासाठी किती मोठा हातभार लावत होती. साली आणि काटक्यांमधलं लिग्निन (हे वनस्पतींना कडकपणा आणि मजबुती देतो, ज्यामुळे झाडे ताठ उभी राहू शकतात) वाढत्या झाडाला मिळणार तर होतंच, पण त्यासोबत सकाळच्या दवाचा गोड शिडकावाही टिकून राहणार होता.

शहर किंवा गाव स्वच्छ राखायला प्रत्येक वेळी ढोर मेहनत करावी लागते असं नाही. थोडी कल्पकता आणि विचारही पुरतो. नेमकी हीच गोष्ट आपण करत नाही, मग पहिल्या पावसात अमूक एका रस्त्यावरची इतकी इतकी झाडं पडली, वाहतुकीला अडथळा झाला अशा बातम्या येतच राहतात.

टांपेरीला जाताना वाटेत सभोवार एकाकार जंगल लागलं, अनेक झाडं तिथे तोडलेली दिसली कससचं वाटलं. पण कागद उत्पादनाचं मुख्य काम फिनलंड मधे होतं.त्या तोडलेल्या झाडांपासून काही अंतरावर नवीन रोपं जोम धरताना दिसत होती. एक जंगल तोडताना, दुसरं उभं राहतं होतं. खरं तर कागद उत्पादनाचं आघाडीवर असलेला फिनलंड, पण तपोलिना असेल की टांपेरी कुठेही सभोवतालची झाडी कधी उणावलेली दिसली नाहीत.

वृक्षारोपण करण्याआधी  झाडांची थोडी शास्त्रीय माहिती घेऊन, त्यांना टिकवण्यासाठी काही प्रयत्न केले तर तेसुद्धा जंगल वाचवण्यासाठी केलेले प्रयत्नच असतील. नुसत्या दिखाव्यात्मक कृतीने काहीच साधणार नाही. झाडं हा एक सजीव घटक आहे, त्याला मानवी जीवनाइतकंच महत्त्व आहे हा विचार जेव्हा रूजेल तेव्हा काही घडेल…

बघा तुम्हाला पटतंय का? नाहीतर युरोप स्वच्छ, सुंदर आहे असं आपण म्हणत राहणारच आहोत.

mythreye.kjkelkar@gmail.com