मल्लिका चौकर
जवळजवळ पाच वर्षांपूर्वी मी स्वीडनमधल्या Uppsala university मध्ये Masters in Chemical Biology करण्यासाठी गेले. घराबाहेर एकटी अशी पहिल्यांदाच पडले होते. त्यापूर्वी पर्यंत मुंबईतच वाढले. माझे बॅचलर्सचे शिक्षणही मुंबईतच आयसीटी (UDCT) मध्ये झाले. जन्मल्यापासून ते मास्टर्ससाठी परदेशात जाईपर्यंत मी एकाच ठिकाणी राहिले. स्वीडनला राहायला येण्यापूर्वी आई बाबांपासून दूर राहण्याचा माझा अनुभव म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत घरापासून ६-७ किमी वर राहणाऱ्या आजी आजोबांकडे आठवडाभर राहायला जायचे, तेव्हढाच! स्वावलंबी आयुष्याच्या अगदीच नगण्य अनुभवावर मी घरापसून दूर 6000 किमी स्वीडनला गेले, तेव्हा थोडी हुरहूर मनात होतीच. स्वीडनला जाताना माझ्याकडे प्रचंड सामान होते- दोन मोठ्या सूटकेस आणि एक सॅक. आईबाबांनी मला इतका खाऊ- लाडू, चिवडा, रेडी टू कूक खाद्यपदार्थ, पराठे, गूळपोळ्या, पुरणपोळ्या इतके काय काय दिले होते की स्वीडनची माझी रूम म्हणजे जणू अन्नाचे गोदाम झाले होते.
माझ्याच स्वीडनच्या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट हाऊसिंगमधले माझे इतर युरोपियन शेजारी मात्र तेव्हा फक्त एका बॅगवर स्वतःचे घर सोडून स्थलांतरित झाले होते. त्यांच्याकडे अन्नाचा कणदेखील नव्हता. युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट हाऊसिंगच्या किल्ल्या मिळाल्यावर ग्रोसरी शॉप शोधायचे, तिथे जाऊन हवे ते घ्यायचे आणि मग जेवण बनवायचे, हा त्यांचा प्लॅन. त्याविरुद्ध माझ्या आईने मला २-३ दिवस आरामात पुरेल आणि काही आणण्याची, शोधण्याची गरज भासणार नाही, इतके खाणे दिले होते. (तेव्हा कोविडचे वातावरण होते, म्हणूनही ही तजवीज!) माझे सामान आणि माझ्या युरोपियन शेजाऱ्यांचे सामान यातला विरोधभास हा माझ्यासाठी पहिला सांस्कृतिक धक्का (कल्चर शॉक) होता.
दमून भागून आलेल्या माझ्या काही शेजाऱ्यांना मग मी माझ्याकडे असलेले ठेपले खायला दिले. त्यामुळे त्यांना नवीन देशी पोहोचल्या पोहोचल्या लगेच जेवणाची सोय करावी लागली नाही. प्रेमाचा मार्ग पोटातून जातो, या उक्तीचा अनुभव आला, कारण या पराठ्यांमुळे माझी माझ्या शेजाऱ्यांशी लगेच मैत्री जुळली, ती अजूनही एकदम घट्ट टिकून आहे.स्वीडनचे मास्टर्स पूर्ण झाल्यावर पीएच.डी करण्यासाठी युरोपमधल्या नेदरलँड्स देशातल्या आईन्धोव्हन (Eindhoven) शहरामध्ये मी गेले. काहीजण या देशाला Holland पण म्हणतात. Eindhoven शहरातल्या Technical University of Eidnhoven मध्ये सध्या मी पीएच.डी करतेय. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप Microscope वापरून मी नानोपार्टिकल्स (nanoparticles) अभ्यासते.
स्वीडनमध्ये आणि नेदरलँड्स मध्येसुद्धा मला खूप जिव्हाळ्याचे मैत्र मिळाले. त्यांच्यामुळे मी घरापासून दूर असतानाही रुळले. हे मित्रगण फक्त स्वीडिश किंवा डच (नेदरलँड्सचे नागरिक) आहेत असे नाही; तर युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांतून शिक्षणासाठी आलेले आहेत. तसेच काही मराठी व अन्य भारतीय मित्रमैत्रिणीपण मिळाले. स्वीडनमध्ये आणि नेदरलँड्समध्ये मी युनिव्हर्सिटीशी सलग्न असल्यामुळे मला खूप वेगवेगळे विषय शिकत असलेले, वेगवेगळ्या देशांतून आलेले, भिन्न संस्कृतीचे, भिन्न विचारप्रवाहांचे मित्रगण मिळाले. त्या माझ्या मित्रमंडळातले काही जण नंतर त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी युरोपमधल्या इतर देशांमध्ये गेले.
त्यामुळे आता जर्मनी, स्पेन, झेक, फिनलंड, स्विझर्लंडमध्येसुद्धा माझी हक्काची मित्रमंडळी आहेत. सुट्टी मिळेल तेव्हा मला युरोपमधल्या या जवळच्या देशांना जायला, माझ्या तिकडे राहणाऱ्या मित्रमंडळीना भेटायला खूप आवडते.माझ्या पीएच.डी.च्या रीसर्च ग्रुपमध्ये एक मोठी लंच रूम आहे. तिथे सगळे पीएच.डी. स्टुडंट, बाकी रीसर्चर, आमचे प्रोफेसर्स असे आम्ही सगळे मिळून एकत्र बसून आपापले डबे खातो. महिन्यातून एका शुक्रवारी कामानंतर तिथे खाऊ खात निवांत गप्पा मारतो. अनेकदा माझ्या काही युरोपिअन मित्रमैत्रीणींबरोबर मी आमच्या युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स सेंटरमध्ये स्विमिंग, जीमिंग करायला जाते. माझे दोन डच मित्र माझ्या घरापासून अगदी ३-४ मिनिटांवर राहतात. आम्ही अनेकदा जेवणानंतर एकत्र शतपावली करायला जातो. शतपावली करताना खूप गप्पा मारतो, खिदळतो. आम्ही बहुतांश जण एकेकटेच राहत असल्यामुळे अनेकदा एकमेकांच्या घरी जात-येत असतो. एकमेकांना घरी जेवायला बोलावतो, एकमेकांचे वाढदिवस एकत्र साजरे करतो, काही वेगळे बनवले की एकमेकांसाठी डबा पाठवतो. मला एकटीला बेड उचलता येत नाहीये, अशा अवघड कामांसाठी हक्काने एकमेकांची मदत घेतो.
माझ्या युरोपिअन मित्रमैत्रिणींबरोबर मी त्यांचे सण (इस्टर, ख्रिसमस, इ.) साजरे करते, इकडच्या शहरात लागणाऱ्या जत्रांना आवर्जून जाते. दिवाळीला आई-बाबांनी मुंबईवरून कुरिअर केलेला फराळ आला की माझ्या तमाम मित्रमैत्रिणींना तो खायला घरी बोलावते.मला जंगलात चालायला जायला फार आवडते. इकडच्या जंगलात भारतातल्या जंगलांसारखे प्राणी नसतात, आणि इथली जंगले तितकी घनगर्दही नसतात. वीकेंडला कधीकधी मी मित्रमैत्रीणींबरोबर जंगलात चालायला जाते. आम्ही दिवसभर मग चालत चालत जंगल अनुभवतो आणि एकीकडे गप्पाही मारतो. युरोपमध्ये हा प्रकार तसा कॉमन आहे, की एकमेकांबरोबर कॅचअप करण्यासाठी एकत्र चालायला जाणे, आणि चालता चालता गप्पा मारणे!दिवसभर युनिव्हर्सिटीमध्ये सगळे व्यवहार इंग्लिशमधूनच होतात.
संध्याकाळी स्पोर्ट्स सेंटरमध्ये आणि शतपावली करतानासुद्धा आमच्या गप्पा इंग्लिशमध्ये होत असतात. भारतात असताना मला वाटायचे की परदेशात राहताना भारतीय लोकांना स्वत:चे जेवण, घर, कुटुंब, सण यांची फार आठवण येते. मात्र इथे राहू लागल्यावर मला सगळ्यात जास्त उणीव कसली भासते तर मराठीतून बोलणं आणि मराठी कानावर पडणं. घरच्यांशी फोन सोडल्यास माझे मराठी बोलणे, ऐकणे अजिबातच होत नाही. युरोपमध्ये आता इतके भारतीय आहेत की इथे इंडियन असोसिएशन, मराठी मंडळेही आहेत. कधीकधी त्यांनी आयोजित केलेल्या भारतीय सणांना, कार्यक्रमानाही मी जाते. त्यामुळे माझी काही माझ्या या मावशी-काका वयाच्या लोकांशीही मैत्री झाली आहे. मग मला अशी माझ्या मातृभाषेत बोलण्याची खुमखुमी आली की मराठी मावशी-काकांच्या घरी जाते.
मी मायक्रोस्कोपीमध्ये पीएच.डी. करत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्समधून सूक्ष्म गोष्टी अभ्यासायची मला सवय आहे. माझ्या वेगवेगळ्या मित्रवर्तुळात वावरताना सूक्ष्मात शिरल्यावर मला आपल्या संस्कृतीमधल्या, वागण्यातल्या आणि युरोपिअन लोकांच्या आयुष्यातल्या गोष्टींमध्ये काही खूप विरोधाभास जाणवले तर काही गोष्टी अनपेक्षितपणे सारख्या जाणवल्या. अशा विरोधाभासांचा आणि साम्यस्थळांचा मॅगनिफाय करून विचार करायला मला खूप मज्जा येते. हीच माझी निरीक्षणे मी या सदरातून तुमच्याशी शेअर करणार आहे.mallikachaukar@gmail.com
