अनेक वेळा फसवणूक करणारे व्यक्तीचे नाव अचूक सांगतात. त्यामुळे कॉल खरा असल्याचा भास निर्माण होतो. फोनची रिंग वाजते. समोरून घाबरलेला आवाज येतो, “मॅडम, तुमच्या मुलाचा भीषण अपघात झाला आहे. त्याची अवस्था गंभीर आहे. तातडीने पैसे पाठवा, नाहीतर उपचार सुरू करता येणार नाहीत.”

एवढे ऐकताच कोणत्याही आईचे हृदय धडधडू लागते. विचार करण्याची क्षमता काही क्षणांसाठी थांबते आणि मनात एकच प्रश्न काहूर माजवतो- “माझं मूल ठीक आहे ना?” सायबर गुन्हेगार याच क्षणाची वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षांत महिलांना लक्ष्य करणाऱ्या फसवणुकीच्या नवीन प्रकारांमध्ये ‘Fake Emergency Call Scam’ किंवा ‘Emergency Distress Scam’ हा प्रकार वेगाने वाढताना दिसत आहे. या फसवणुकीत गुन्हेगार भीती, घबराट आणि आईच्या ममतेचा गैरफायदा घेतात.

या फसवणुकीची सुरुवात बहुतेक वेळा एका अनोळखी फोन कॉलपासून होते. कॉल करणारी व्यक्ती स्वतःला पोलीस अधिकारी, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी किंवा एखादा प्रत्यक्षदर्शी असल्याचे सांगते. त्यानंतर ती महिला किंवा आईला सांगते की, तिचा मुलगा, मुलगी, पती किंवा जवळचा नातेवाईक गंभीर अपघातात जखमी झाला आहे.

अनेक वेळा गुन्हेगार अत्यंत नाट्यमय पद्धतीने संवाद साधतात. पार्श्वभूमीला रडण्याचे आवाज, हॉस्पिटलमधील गोंधळ  किंवा मदतीसाठी ओरडण्याचे आवाज ऐकू येतील अशी व्यवस्था केली जाते. काही प्रकरणांमध्ये तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून नातेवाईकांच्या आवाजासारखा आवाज तयार करण्याचाही प्रयत्न केला जातो.

महिलेची मानसिक अवस्था अस्थिर झाल्यानंतर पुढचा टप्पा सुरू होतो. “ऑपरेशनसाठी तातडीने पैसे लागतील”, “पोलीस केस मिटवण्यासाठी दंड भरावा लागेल”, “रुग्णालयात दाखल करण्यासाठी डिपॉझिट जमा करावे लागेल” अशा कारणांखाली पैसे मागितले जातात. अनेकदा काही मिनिटांतच निर्णय घेण्यासाठी दबाव टाकला जातो.

सायबर गुन्हेगारांना माहिती असते की, आईसाठी तिच्या मुलापेक्षा महत्त्वाचे काहीही नसते. त्यामुळे ती आधी सत्यता पडताळून पाहण्याऐवजी मदत करण्याचा प्रयत्न करेल. याच भावनिक प्रतिक्रियेचा फायदा घेऊन हजारो किंवा लाखो रुपयांची फसवणूक केली जाते.

विशेषतः घरात एकट्या राहणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक महिला, विधवा किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहणाऱ्या मुलांच्या मातांना अशा कॉल्सने लक्ष्य बनवले जाते. गुन्हेगार सोशल मीडिया, सार्वजनिक माहिती किंवा मोबाईल नंबर डेटाबेसमधून काही प्राथमिक माहिती मिळवून कॉल अधिक विश्वासार्ह बनवतात.

अनेक वेळा फसवणूक करणारे व्यक्तीचे नाव अचूक सांगतात. त्यामुळे कॉल खरा असल्याचा भास निर्माण होतो. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की, आजच्या डिजिटल युगात नाव, मोबाईल क्रमांक किंवा कुटुंबातील सदस्यांची काही माहिती मिळवणे गुन्हेगारांसाठी फार अवघड राहिलेले नाही.

अशा परिस्थितीत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाबरून न जाणे. अपघात, अटक किंवा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरित संबंधित व्यक्तीला थेट फोन करा. जर संपर्क होत नसेल तर इतर कुटुंबीय, मित्र किंवा सहकाऱ्यांशी संपर्क साधा. कोणत्याही परिस्थितीत केवळ फोनवर मिळालेल्या माहितीनुसार पैसे पाठवू नका.

खरे रुग्णालय, पोलीस ठाणे किंवा सरकारी यंत्रणा पैसे जमा करण्यासाठी वैयक्तिक खात्यांवर तातडीने रक्कम पाठवण्याचा दबाव टाकत नाहीत. तसेच कोणतीही अधिकृत संस्था ‘ही गोष्ट कोणालाही सांगू नका’ असे सांगत नाही. जर अशा प्रकारचा कॉल आला तर कॉलची माहिती, क्रमांक आणि संभाषणाची नोंद जतन करा. संशयास्पद प्रकार असल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा किंवा सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

आजचे सायबर गुन्हेगार केवळ संगणक किंवा मोबाईल हॅक करत नाहीत; ते मानवी भावना हॅक करण्याचा प्रयत्न करतात. आईच्या ममतेपेक्षा मोठी भावना दुसरी नाही आणि म्हणूनच ती त्यांच्या लक्ष्यावर असते. पण लक्षात ठेवा, संकटाच्या बातमीपेक्षा सत्याची पडताळणी अधिक महत्त्वाची आहे.

कारण काही मिनिटांची शांतता आणि योग्य पडताळणी तुमची आयुष्यभराची बचत वाचवू शकते. “तुमच्या मुलाला अपघात झाला आहे” असे ऐकताच घाबरण्याऐवजी सत्य जाणून घेण्यासाठी एक अतिरिक्त फोन कॉल करा. कदाचित तोच कॉल तुम्हाला फसवणुकीपासून वाचवणारा ठरेल.

(सायबर फॉरेन्सिक विश्लेषक)

dnyandev.najan@yahoo.in