‘प्रवाशांनी खिसा-पाकीट सांभाळावे’ टाईप्स घोषणा आपल्याला बस, रेल्वे, सार्वजनिक उत्सव, समस्त ठिकाणी वारंवार ऐकू येतात. या घोषणा फक्त आणि फक्त पुरूषांसाठीच असतात, असा विचार तुम्ही कधी केलाय का? कारण स्त्रियांना पाकीट ठेवायला खिसा असतोच कुठे? काही ‘चतुरा’ म्हणतील, ‘पण आमच्याकडे पर्स असते’. पण आपला आजचा प्रश्न आहे, की स्त्रियांनी फॅशनवाल्यांचं असं काय घोडं मारलंय, की त्यांच्या जीन्स, ट्राऊझर, पँटस् ना टूचभर खिसे दिलेले असतात?… अक्षरश: टूचभरच! खोटं वाटत असेल, तर तुमची कुठलीही जीन्स किंवा ट्राऊझर घातल्यावर खिशात हात घालून त्यात सेफ्टीपिनव्यतिरिक्त काही ठेवता येईल का याचा विचार करा. पर्स, बटवा कितीही असूद्यात हो तुमच्याकडे! पण जीन्ससारख्या कपड्यांमध्ये वावरताना आपला मोबाईल खिशात ठेवावासा वाटला, तर मोबाईल अर्ध्याहून अधिक खिशाबाहेरच राहील, यासाठी कोणत्याही प्रयोगाची आवश्यकता नाहीये!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : समुपदेशन : बॉयफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड नात्यातला तोल

मात्र यावर अमेरिकेत चक्क एक अभ्यास झालेला आहे, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही! नुकताच तो आमच्या वाचनात आला. ‘द पुडिंग’ या व्यासपीठानं यावर एक अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे, की स्त्रियांना मोबाईल फोनसारखी किंवा लहान वॉलेटसारखी (चिल्लर ठेवायची पर्स म्हणा हवं तर!) महत्त्वाची वस्तू ठेवायला जीन्स वा पॅण्टचा दिलेला खिसा अजिबात उपयोगी पडत नाही. त्यांनी अमेरिकेतल्या विविध ब्रॅण्डस् च्या स्त्री आणि पुरूषांसाठीच्या ८० जीन्स तपासल्या. त्यांच्या पुढच्या आणि मागच्या खिशांची मापं घेतली. मापात काही गफलत नको, म्हणून एकाच ‘वेस्ट साईज’च्या जीन्स या प्रयोगात निवडलेल्या होत्या. आपल्या मोजमापाचा निष्कर्ष लिहिताना त्यांनी असे शब्द वापरले- ‘विमेन्स पॉकेटस् आर रिडिक्युलस!’ त्यांच्या प्रयोगानुसार सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या जीन्सना दिलेले खिसे हे पुरूषांच्या जीन्सना दिलेल्या खिशांपेक्षा लांबीला ४८ टक्के कमी आणि ६.५ टक्के अरुंद (नॅरो) असतात. केवढा हा अन्याय! बरं हा अभ्यास काही फार पूर्वी झालेला नाहीये बरं! आताचाच, साडेतीन-चार वर्षांपूर्वीचा आहे. विशेष म्हणजे एवढ्यावरच हे अभ्यासक थांबलेले नाहीत. तर पुढे जाऊन त्यांनी प्रत्यक्षात स्त्री आणि पुरूषांच्या जीन्सच्या खिशात रोजच्या वापरात हाताळल्या जाणाऱ्या कोणकोणत्या वस्तू बसतील यासाही आढावा घेतला. यात तर अरुंद, आखूड खिशांच्या रुपानं बायांवर होत असलेला अन्याय अधोरेखितच झाला!

आणखी वाचा : केस सरळ करण्यासाठी नेमका किती वेळा स्ट्रेटनर वापरावा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

या प्रयोगात खिशात ठेवण्यासाठी ७ ‘रँडम’ वस्तू निवडल्या गेल्या. यात काय होतं? ‘आयफोन-१०’, ‘सॅमसंग गॅलेक्सी’, ‘गूगल पिक्सेल’, पैशांचं वॉलेट, पेन, स्त्रीचा तळहात आणि पुरूषाचा तळहात. विशेष बाब अशी आहे, की यातली कोणतीही वस्तू- (अगदी पेनसुद्धा) स्त्रियांच्या सर्व- म्हणजे १०० टक्के जीन्सच्या खिशांमध्ये बसत नव्हती! पुरूषांच्या सर्व- १०० टक्के जीन्सच्या खिशांमध्ये ‘आयफोन-१०’ बसत होता, तर स्त्रियांच्या केवळ ४० टक्के जीन्सच्या खिशांमध्ये तो बसत होता. ‘सॅमसंग गॅलेक्सी’सुद्धा पुरूषांच्या ९५ टक्के जीन्सच्या खिशांत बसत होता, तर स्त्रियांच्या केवळ २० टक्के खिशांमध्ये तो बसत होता. पुरूषांचा तळहात आणि स्त्रियांचा तळहातसुद्धा पुरूषांच्या जीन्सच्या सर्वच्या सर्व खिशांमध्ये व्यवस्थित बसत होता. तर स्त्रियांच्या फक्त आणि फक्त १० टक्के जीन्सच्या खिशांमध्ये खुद्द त्यांचा तळहात बसू शकणार होता. भेदभावाला काही सीमा?… म्हणजे ‘अमुक एकजण थंडीत आपले हात आपल्या खिशांत घालून उभा होता’ हे वाक्य नेहमी पुरूषाला उद्देशूनच लिहावं लागणार काय?… जीन्सचा पुढचा खिसा आणि मागचा खिसा असा भेद करून तपासून पाहिलं, तर स्त्रियांच्या जीन्सचा मागचा खिसा जरासा तरी खोल आणि रुंद असतो, पुढचा खिसा नुसता शोभेलाच.

आणखी वाचा : पुरुष इतके हिंस्त्र का आहेत?

असं का होत असावं?
स्त्रियांच्या जीन्सचे खिसे इतके लहान का असावेत यासाठी आम्ही काही परिचित ‘चतुरां’शी गप्पा मारल्या. त्यातून दोन संभाव्य गोष्टी समोर आल्या. त्या अशा-एकतर अनेक जणींना ‘स्किनी’- म्हणजे अंगाबरोबर फिट बसणाऱ्या जीन्स घालायला आवडतं. अशा कपड्यांत फार लांब-रुंद खिसा शिवता येत नाही, कारण मग कपड्याच्या वरून आतला खिशाचा झोळ दिसून येतो. काही जणींनी अशीही शंका ठामपणे व्यक्त केली, की स्त्रियांच्या प्रत्येक बॉटम्सना मुळातच लांब-रूंद खिसे दिले असते, तर आकर्षक ‘हँडपर्स’ किंवा ‘क्लच’ची केवढी तरी मोठी इंडस्ट्री कशी वाढली असती! ही दोन्ही कारणं अगदीच विचार करण्याजोगी आहेत. एक मात्र खरं, की सध्या तरी स्त्रियांच्या जीन्स आणि ट्राऊझर्सना पुरेसे खोल खिसे नाहीत.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : स्तन मोठे करता येतील का?

आपणच बदलू या परिस्थिती!
हा सगळा भेदभाव लक्षात घेत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीय का? की आता कित्येक ब्रॅण्डेड कुडत्यांना खिसे आलेत. बाजारात खिशांच्या काही लेगिंग्जसुद्धा आल्यात. चला, हेही नसे थोडके! आमच्या परिचयातल्या काही चतुरा सलवार किंवा लेगिंगवरचे टॉप्स शिवून घेतानाच त्याला किमान मोबाईल तरी बसेल, असा खिसा आवर्जून शिवायला सांगताहेत. आणि या चतुरांच्या मते ही आयडिया सगळ्यात बेश्ट आहे! सारखा मोबाईल हातात घेऊन फिरणं किंवा पर्स घेऊन फिरणं शक्य नसतं, तेव्हा या खास शिवून घेतलेल्या खिशांचा चांगला वापर होतोय. मोबाईल, हेडफोन आणि पैशांच्या १-२ नोटा तरी त्यात बसताहेत!

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : लीना मोगरे – अनुभवच माझे मेन्टॉर्स

जीन्स आणि ट्राउझरचे खिसे कधी ‘स्रीस्नेही’ होतील माहीत नाही, पण आपण ग्राहकांनी सारखा तसा आग्रह धरला तर त्यावर या कपडे विक्रेत्या ब्रॅण्डस् ना काहीतरी विचार नक्की करावा लागेल. शिवाय अगदी प्रत्येक बाबतीत ‘हे स्त्रियांचं- हे पुरुषांचं’ असं करायलाच हवंय का? भविष्यात कदाचित ‘युनिसेक्स’ टाईपचे खिसे येतील… आपणा स्त्रियांचे (निदान स्वतःचे!) तळहात आणि मोबाईल एवढं जरी त्या खिशांमध्ये बसू लागलं तरी जिंकलीच!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion utility pockets in womens jeans needs to be larger in size vp
First published on: 23-11-2022 at 10:15 IST