प्रिय बाबा,

‘हॅपी फादर्स डे.’ बाबा, जसा ‘मदर्स डे’ असतो तसा ‘फादर्स डे’सुद्धा हल्ली मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. बाप आयुष्यभर राब राब राबतो, पण त्याचं कौतुक फार केलं जात नाही. बघा, आता ‘फादर्स डे’मुळे मुलांना वडिलांचं महत्त्व तरी कळेल, नाही तर बाप वारल्यावरच मुलांना वडिलांचं महत्त्व कळायचं. अगदी माझ्यासारखं. तुम्ही सोडून गेला आणि आम्हाला बाप कळला. क्षणात बापाविना आयुष्य काय असतं हे कळलं. सोप्प नव्हतं बाबा तुमच्याशिवाय आयुष्य जगणं, पण असा एकही दिवस नसेल की तुमची आठवण येणार नाही.

बाबा, तुमची चिमुकली ३५ वर्षांची झाली. हल्ली लहानपणीचे जुने अल्बम खूप बघते. त्या अल्बममधील काही फोटोंमध्ये तुम्ही मला कसं चालायचं शिकवताहेत, कडेवर घेऊन जग दाखवताहेत, अंगा खांद्यावर खेळवताहेत. आई सांगते की, तुम्ही मला तुमची ‘माय’ म्हणायचे. तुम्ही मला न मागता आयुष्यात सर्व काही दिलं. कपडे, खेळणी, वस्तू, वह्या, पुस्तके सर्व काही दिले; पण मला तुम्हाला काहीही देता आले नाही. साधं तुम्हाला Thankyou सुद्धा म्हणता आलं नाही. मला हवे ते शिक्षण दिले. एवढंच काय, तर मला नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले. माझ्या पसंतीच्या मुलाबरोबर माझे लग्नही लावून दिले. मला आठवते बाबा, तुम्ही म्हणाला होता, “तुला पसंत आहे त्या मुलाबरोबर लग्न कर.. लोक काय म्हणतील हा विचार मी करत नाही. कारण तू आनंदी असावी, यापेक्षा जास्त महत्त्वाचं माझ्यासाठी काही नाही.” तेव्हा तरी मी तुम्हाला एकदा thankyou म्हणायलाच पाहिजे होतं.

हेही वाचा : ‘बालवधू’ ते यशस्वी ‘डॉक्टर’! स्वप्न पूर्ण करण्यासाठी रुपाला कशी मिळाली कुटुंबाची साथ, पाहा…

सासरी जाऊन पाच महिनेही झाले नव्हते आणि तुम्ही अचानक एक दिवस आम्हाला सोडून गेलात. त्या दिवसांपासून ते आजपर्यंतचा प्रत्येक दिवस तुमच्या आठवणीत गेला आहे. तुमची किंमत आणि महत्त्व हे तुम्ही सोडून गेल्यावर जास्त जाणवलं. खरं सांगायचं तर वडील नसल्यावर मुलगी पोरकी होते बाबा. वडिलांइतके प्रेम मुलीवर कोणीच करू शकत नाही. कोणीच नाही. तुमच्या आशीर्वादाने मी आज सुखात आहे. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांना तुमचं प्रेम अनुभवता आले नाही, याची खंत आहे.

आयुष्यात अनेक अडचणी येतात बाबा. प्रत्येक वेळी तुमच्याकडे रडत येणारी ही चिमुकली आता स्वत:च त्या अडचणींशी दोन हात करते. तुम्ही एकदा मला म्हणाला होता, “बाळ, एकदिवस असा येईल, तेव्हा मी तुझ्याजवळ नसणार. तेव्हा तुलाच सर्व गोष्टींचा सामना करावा लागेल. त्यामुळे आयुष्यात स्वत:च्या पायावर उभं राहणं खूप जास्त गरजेचं आहे.” तुमचे हे शब्द आजही मनात जिवंत आहेत, जे मला रोज ऊर्जा देतात.
बाबा, तुमची खूप आठवण येते. मिस यू बाबा आणि या सुंदर आयुष्यासाठी खूप खूप आभार. मी तुमची सदैव ऋणी राहीन.

तुमची लेक…