नातेसंबंध : का रे अबोला? | fight between husband and wife emotional bond scsg 91 | Loksatta

नातेसंबंध : का रे अबोला?

भांडणानंतर एकमेकांशी बोललंच नाही तर प्रश्न आपोआप सुटतात असा काही व्यक्तींचा गैरसमज असतो. एकाच घरात राहून वर्षानुवर्षं एकमेकांशी आजिबात संवाद न ठेवणारी कितीतरी जोडपी बघायला मिळतात. पण अशा अबोल्याचा आपल्या मनावर आणि शरीरावरही परिणाम होतो.

नातेसंबंध : का रे अबोला?
‘जोडा असावा तर असा’ अशी चर्चा आमच्या ग्रुपमध्ये नेहमीच व्हायची. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शननंतर मी तिला भेटलेच नव्हते.

-डॉ स्मिता प्रकाश जोशी

आज बऱ्याच दिवसांनी अश्विनीकडे जाण्याचा योग आला. अमेय आणि अश्विनी दोघांचं लव्ह मॅरेज. ही जोडगोळी कॉलेजपासून अगदी एकत्र होती. दोघंही एकमेकांना सोडून एकटे कधी दिसलेच नाहीत. ‘जोडा असावा तर असा’ अशी चर्चा आमच्या ग्रुपमध्ये नेहमीच व्हायची. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शननंतर मी तिला भेटलेच नव्हते. आज तिच्या घराजवळच माझं एक काम असल्यानं आवर्जून तिला भेटावं असं ठरवलंच होतं.
मी घराजवळ जाऊन बेल वाजवली.
अश्विनीनं दार उघडलं. म्हणाली, “तू? मी स्वप्नात तर नाही ना? ये ये. घरात ये. तुला अगदी १०० वर्षं आयुष्य आहे. माझ्या मनात तुझ्याबद्दलच विचार चालू होते आणि तू दारात हजर. अगदी बोलावल्यासारखी आलीस बघ!”
“बापरे! एवढं आयुष्य मला नको बाई! आणि आज माझी आठवण कशी काय झाली?” माझ्या मनात उगाचच शंकेची पाल चुकचुकली. ही आता माझी आठवण कशासाठी काढत होती, याचं रहस्य मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी मुद्याचं बोलायला सुरुवात केली.
“कशी आहेस? आणि अमेय काय म्हणतोय?”
“मी ठीक आहे. पण अमेयचं मी काही सांगू शकत नाही. ते तू त्याच्याशीच बोल.”
तिचा सूर वेगळंच काही सांगून गेला.
“का गं? असं का बोलतेस? ठीक आहे ना सगळं?”
“अगं, आम्ही दोघं गेले दोन महिने एकमेकांशी आजिबात बोलतच नाही, तर तो कसा आहे हे मला कसं समजणार?”
“अगं, एका घरात राहून एकमेकांशी बोलत नाही तुम्ही? हा अबोला, दुरावा कशासाठी?”
“आमच्या दोघांमध्ये वाद झाला की आमच्यात अबोला असतो. महिनोंमहिने आम्ही एकमेकांशी आजिबात संभाषण करत नाही. शब्दानं शब्द वाढतो. भांडणं वाढीस लागतात. भांडणाऐवजी अबोला बरा नाही का?”
भांडणानंतर एकमेकांशी बोललंच नाही तर प्रश्न आपोआप सुटतात असा काही व्यक्तींचा गैरसमज असतो. एकाच घरात राहून वर्षानुवर्षं एकमेकांशी आजिबात संवाद न ठेवणारी कितीतरी जोडपी समाजात बघायला मिळतात. पण अशा अबोल्याचा आपल्या मनावर आणि शरीरावरही परिणाम होतो याची जाणीवच अबोला धरणाऱ्या व्यक्तीला नसते. मानसिक स्वास्थ्यासाठी एकमेकांचं मन एकमेकांकडे मोकळं करणं आवश्यक आहे.
म्हणूनच मी अश्विनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते,“अश्विनी, चुकतेस तू. अगं एक वेळ भांडण परवडलं. एकमेकांशी बोलून मोकळं तरी होता येतं. न बोलण्यानं घुसमट होते आणि त्याचा त्रास अधिक होतो. चार भिंतीत एकत्र राहाणं म्हणजे संसार नाही गं. समाजाला दाखवण्यासाठी एकत्र राहाण्यात काहीच अर्थ नाही. एकत्र राहात असताना एकमेकांचे सगळे विचार एकमेकांना पटतीलच असं नाही, पण एकमेकांचे विचार भिन्न असतील तरीही त्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन तिचे वेगळे विचार समजून घेणं आणि त्या विचारांची खिल्ली न उडवता त्या विचारांचाही कल समजून घेणं, आदर करणं आवश्यक असतं. विचार वेगळे आहेत या कारणामुळे नात्यात ताणतणाव निर्माण करणं योग्य नाही. नात्यातला स्नेह जपणं आवश्यक आहे. किरकोळ मतभेद, गैरसमज वेळच्यावेळी दूर करायला हवेत. हे तण काढून टाकलं तर नात्याची जोपासना चांगली होईल. सहवासातून आनंद मिळवणं आपल्याच हातात असतं.”
अश्विनीला माझं म्हणणं कळत होतं, पण वळत नव्हतं. म्हणूनच तिच्या शंका चालूच होत्या.
“पण समजून घेणं, ‘आईस ब्रेकिंग’ करणं हे दोन्हीकडून व्हायला हवं असं तुला वाटत नाही का? प्रत्येक वेळी समोरच्यानंच माघार घ्यावी अशी अपेक्षा असेल तर काय करायचं?”
“हो. तुझं बरोबर आहे. पण सुरूवात कोणी करायची यात अडकायचं नाही. सुरूवात आपल्यापासूनच करायची हे आपणच ठरवायचं. अबोला धरून, मनातल्या मनात त्रास करून घेऊन व्यक्त न होणं म्हणजे स्वतःच स्वतःच्या मनावरचं ओझं वाढवून घेण्यासारखं आहे.”
काही क्षण अश्विनी शांत राहिली. बहुतेक माझं बोलणं तिला पटलं असावं. “अमेयशी मी आजच बोलायला सुरुवात करते. अगं अनेक कामं आणि निर्णय पेंडिंग आहेत. हा रुसवा आणि अबोला मला सोडायलाच हवा. गेला महिनाभर मला शांत झोप नाहीये. मनातल्या मनात मी कुढत आहे. पण आज त्याच्याशी बोलणारच. तू अमेय येईपर्यंत थांबतेस का?”
“अश्विनी, आपले प्रश्न आपणच सोडवायला हवेत. तुमच्या दोघांमध्ये मी हिंगाचा खडा कशाला! मी आता निघते.”
अश्विनीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. बहुधा अमेयशी कसं बोलायचं, या विचारात ती असावी. मी मात्र तिथून काढता पाय घेतला.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पोन्नीयिन सेल्व्हन: इथे स्त्रिया राज्य करतात…

संबंधित बातम्या

‘त्या’ ठिकाणचे केस काढण्यापूर्वी हे वाचा!
‘माझी स्पर्धक मीच’ – अभिनेत्री संयमी खेर
विवाह समुपदेशन: अस्वस्थ करणारं नवऱ्याचं ‘क्रॉस ड्रेसिंग’
लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?
मी असुनही नसल्यासारखीच…, नवरा दुर्लक्ष करत असेल कर ‘या’ ५ टिप्स वाढवतील संसारात गोडवा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video : पांढरी दाढी, थकलेला चेहरा, विस्कटलेले केस; ‘तू तेव्हा तशी’मध्ये तरुण दिसणाऱ्या स्वप्निल जोशीचा ‘नो मेकअप’ लूक
“बॉलिवूडचा चित्रपट बनवण्याचा फॉर्म्युला….” ‘फोन भूत’ फ्लॉप झाल्यावर अभिनेता इशान खट्टर स्पष्टच बोलला
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून नव्हे…परळीतून या व्यक्तीने केला पैशांसाठी फोन!
आतड्यांमध्ये जमलेली घाण ‘हे’ ६ पदार्थ सहजपणे काढून टाकतील; कॉस्टिपेशनची समस्याही पुन्हा होणार नाही
विश्लेषण : दिल्ली महापालिकेत ‘आप’ची सत्ता, तरीही भाजपाचा महापौर होणार? कशी आहेत समीकरणं? जाणून घ्या