रजोनिवृत्ती आणि त्या आसपासचा काळ हा स्त्रीच्या आर्थिक क्षमतेवर परिणाम घडविण्यास कळत-नकळतपणे कारणीभूत ठरत आहे, अशी माहिती या संदर्भात केलेल्या निरीक्षणावरून पुढे आली आहे. याबाबत जाणून घेऊया…
स्त्रियांची पाळी हा आता कानात कुजबूजण्याजोगा विषय राहिला नाही. आता याविषयी खुलेपणाने चर्चा होत आहे. पाळी येण्याचे वय जे काही वर्षांपूर्वी १४-१५ वर्षे होते, ते आता ८ ते १० वर्षादरम्यान आले आहे. तर रजोनिवृत्तीचा काळ जो ४५ ते ५५च्या दरम्यान होता, तो आता ३५-४५ वर्षांच्या दरम्यान आला आहे. या दोन्ही काळात स्त्रियांच्या शरीरात विविध प्रकारचे बदल घडून येत असतात. परिणामी तिला अनेक मानसिक व शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. इतकेच नाही तर अलीकडेच झालेल्या एका पाहणीनुसार, पेरिमेनोपोज म्हणजेच ‘रजोनिवृत्तीच्या आसपास चा काळ’ हा बहुतांश महिलांच्या आर्थिक घटकावर परिणाम करणारा ठरत आहे.
सर्वसाधारणपणे ४५ ते ५५ वयाच्या दरम्यान पुरुष मंडळी आर्थिकदृष्ट्या स्थिरावलेली असतात. आणि पुढे साठीपर्यंतदेखील ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात, कार्यरत असतात. थोडीफार दुखणी-खुपणी असली तरी ती सुसुह्य असतात.
पण स्त्रियांच्या बाबतीत याच काळात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. जसे पाळीची अनियमितता, पाळीच्या वेळी रक्ताचा कमी-जास्त होणारा फ्लो, दरदरून घाम येणे किंवा अंगात एकदम उष्णता वाढणे आणि या सगळ्याच्या मानसिक ताणामुळे होणारी चिडचिड, सतत बदलणारे मूड्स. या सर्व गोष्टींमुळे बहुतांश स्त्रियांना अनेक शारीरिक आणि मानिसक व्याधीना तोंड द्यावे लागते. परिणामी नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याऐवजी मागे राहणं पसंत करतात. मग भले दोन पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही,पण ती दगदग नको,असा पवित्रा घेतला जातो. अनेकदा त्या नोकरी सोडण्याचा विचार करतात.
या संदर्भात जागतिक स्तरावर नमूद केलेल्या एका अहवालात असे आढळून आले आहे की, या रजोनिवृत्ती किंवा रजोनिवृतीच्या आसपासच्या काळात प्रत्येक २५ जणींमध्ये चार ते पाच स्त्रिया पार्ट-टाइम काम करण्याकडे वळतात तर इतर नोकरी सोडण्यावर अधिक भर देतात. अशा सुमारे जगभरात १.५ अब्जाहून अधिक स्त्रिया नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणातून मागे फिरताना दिसतात.
एककाळ असा होता, जेव्हा जगभरातील बहुतांश स्त्रिया आपल्या या मासिकपाळीच्या समस्यासंदर्भात फारशा मोकळेपणाने बोलत नसत. सगळ्यांना यातून जावे लागते, असा विचार करून त्या त्रास सहन करीत असत. विविध चर्चासत्रांमधून आणि या संदर्भात केलेल्या अनेक निरीक्षण अहवालातून असे दिसून आले की, रजोनिवृत्ती आणि त्या आसपासच्या काळाचा परिणाम स्त्रियांच्या आर्थिक स्रोतांवर होत आहे. शिवाय ४० ते ६० वयाच्या काळात अनेक स्त्रियांमध्ये मन एकाग्र होत नसल्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर दिसून आली. झोपेच्या समस्या, नैराश्य यामुळे अनेक स्त्रिया आयुष्याबाबत उदासीन होताना दिसल्या.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून ब्रिटिश सरकारने अलीकडेच, रजोनिवृत्ती आणि या आसपासच्या काळातील स्त्रियांना मदत व्हावी, या उद्देशाने ‘मेनोपोज ॲडव्हायसरी ग्रुप’ ची स्थापना केली. जेणेकरून नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी या काळात स्त्रियांना जाणविणाऱ्या समस्यांवर योग्य ते मार्गदशन दिले जाईल. आणि नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणाहून माघार न घेता आर्थिकदृष्ट्या त्या कशा सक्षम राहतील, यावर उपलब्ध पर्याय शोधण्यात मदत केली जाईल, हा या मागचा उद्देश आहे.
जगभरातील प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा ती करिअर अथवा नोकरी करायला सुरुवात करते आणि हे जसजसे आकार धरू लागते, त्यावेळी बहुसंख्य स्त्रियांच्या मार्गात ‘ब्रेक’ येण्यास सुरुवात होते. मग तो लग्न, गरोदरपण, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा अनेक मार्गातून पुढे पुढे सरकत जातो. आणि शेवटी रजो निवृत्तीच्या टप्प्यावर येऊन थांबतो. मासिकपाळी हा स्त्रीच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण प्रगतीच्या मार्गात हा भाग अडथळा न ठरता, या काळात देखील ती आर्थिकदृष्ट्या तितकीच सक्षम राहू शकते. आणि त्यासाठी गरज आहे ती नोकरी-व्य्वस्याच्या ठिकाणी काही बदल करण्याची. हा विचार रुजायला सुरुवात झाली आहे. हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.
