अनुजा कर्णिक मोहिले
बाळ जन्माला आलं की घरात आनंदासोबत अनेक प्रश्नही सुरू होतात. बाळाचं वजन व्यवस्थित वाढतंय ना? दूध पुरेसं मिळतंय का? ते वेळेवर बसतंय, रांगतंय, चालतंय का? या प्रश्नांइतकाच महत्त्वाचा प्रश्न आहे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी, प्रतिकारशक्तीसाठी आणि भविष्यातील आरोग्यासाठी आपण काय करत आहोत?

गर्भधारणेपासून बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचा काळ म्हणजे पहिले १,००० दिवस. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफ यांच्या Nurturing Care Framework नुसार या काळात योग्य पोषण, आरोग्यसेवा, सुरक्षित वातावरण आणि प्रेमळ प्रतिसादात्मक संगोपन यांची सांगड मुलाच्या शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी महत्त्वाची ठरते.

आयुष्याची सुरुवात : आईचं दूध आणि चीक

जन्मानंतर शक्यतो पहिल्या तासात स्तनपान सुरू करणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला येणारं पिवळसर, घट्ट दूध म्हणजे चीक. त्यात प्रतिपिंडे (antibodies) आणि संरक्षणात्मक घटक असतात, जे बाळाला संसर्गांपासून संरक्षण मिळवून देण्यास मदत करतात. आईच्या दुधातील इम्युनोग्लोब्युलिन्स बाळाच्या प्रतिकारशक्तीला आधार देतात.

WHO आणि युनिसेफच्या शिफारशीनुसार पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचं दूध द्यावं आणि त्यानंतर पूरक आहार सुरू करून दोन वर्षे किंवा त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवता येतं. स्तनपानात अडचणी आल्यास आईला दोष देण्याऐवजी तिला योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळणं आवश्यक आहे.

सहा महिन्यांनंतर : पहिल्या घासाचं महत्त्व

सहा महिन्यांनंतर बाळाच्या वाढत्या गरजा केवळ आईच्या दुधातून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे स्तनपान सुरू ठेवून योग्य पूरक आहार देणं आवश्यक ठरतं. WHOच्या Infant and Young Child Feeding (IYCF) मार्गदर्शनात वयानुसार, पुरेशा प्रमाणात आणि विविध प्रकारचा आहार देण्यावर भर दिला आहे.

मऊ वरण-भात, खिचडी, कुस्करलेल्या भाज्या, मऊ शिजवलेली कडधान्यं आणि वयानुसार अंडी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे घरच्या आहारातील पर्याय असू शकतात. लोहयुक्त पदार्थांचा समावेश विशेष महत्त्वाचा आहे. बाळ मोठं होत जाईल तसं अन्नाचा पोत आणि घट्टपणा वाढवावा. खाण्यासाठी जबरदस्ती करण्याऐवजी भूक आणि पोट भरल्याचे संकेत ओळखावेत. एखादा पदार्थ नाकारला, तरी तो वेगवेगळ्या वेळी पुन्हा देऊन पाहता येतो.

बाळाला खाऊ घालताना मोबाइल दाखवण्याऐवजी त्याच्याशी बोलणं, त्याच्या प्रतिसादाकडे लक्ष देणं आणि शांतपणे खाऊ घालणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जेवण हा केवळ पोट भरण्याचा नव्हे, तर शिकण्याचा आणि नातं दृढ होण्याचाही अनुभव असतो.

प्रतिकारशक्तीची पायाभरणी : आहारासोबत लसीकरणही

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एखादा विशिष्ट पदार्थ किंवा पूरक आहार पुरेसा नसतो. आईचं दूध, विविध पोषक पदार्थ, स्वच्छता आणि वेळेवर मिळणारी आरोग्यसेवा या सर्वांचा त्यात वाटा असतो.

लसीकरणही याच काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताच्या राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार जन्मानंतर आणि पुढील महिन्यांत वयानुसार बीसीजी, पोलिओ, हिपॅटायटिस बी, पेंटाव्हॅलंट आणि गोवर-रुबेला यांसारख्या लसी दिल्या जातात. प्रत्येक मात्रा वेळेवर घेण्यासाठी लसीकरण कार्ड जपून ठेवावं आणि बालरोगतज्ज्ञ किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील लसी घ्याव्यात. आईचं दूध बाळाला संरक्षण देतं; मात्र ते लसीकरणाचा पर्याय नाही.

मेंदूचा विकास केवळ अन्नातून होत नाही

मेंदूच्या विकासासाठी पोषण महत्त्वाचं असलं तरी बाळाला प्रेमळ संवाद, खेळ आणि प्रतिसाद देणारी काळजीही आवश्यक असते. बाळाशी बोलणं, गाणी म्हणणं, चेहऱ्यावरील हावभाव दाखवणं, त्याच्या बडबडीला प्रतिसाद देणं आणि वयानुसार खेळण्याच्या संधी देणं यामुळे त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. WHOच्या Improving Early Childhood Development मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पोषणासोबत प्रतिसादात्मक संगोपन आणि सुरुवातीच्या शिक्षणाच्या अनुभवांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.

बाळाला सुरक्षित वाटणं, त्याच्या रडण्याकडे लक्ष दिलं जाणं आणि त्याच्या गरजांना प्रतिसाद मिळणं यामुळे काळजीवाहकाशी भावनिक नातं तयार होतं. हे नातं बाळाच्या भावनिक आणि सामाजिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे.

प्रत्येक बाळाची वाढ वेगळी

काही बाळं लवकर बसतात, तर काहींना त्यासाठी अधिक वेळ लागतो. प्रत्येक बाळाचा विकासाचा वेग सारखा नसतो. त्यामुळे इतर मुलांशी सतत तुलना करण्याऐवजी बाळाची वाढ नियमितपणे तपासणं महत्त्वाचं आहे. वजन, लांबी किंवा उंची आणि डोक्याचा घेर यांची नोंद वाढीच्या मानकांनुसार पाहावी. विकासातील एखाद्या टप्प्याबद्दल चिंता वाटत असल्यास केवळ ‘प्रत्येक बाळ वेगळं असतं’ असं मानून थांबू नये; बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पहिले १,००० दिवस म्हणजे पालकांनी प्रत्येक गोष्ट परिपूर्ण केलीच पाहिजे, असा दबाव नव्हे. योग्य पोषण, स्तनपानासाठी मदत, वयानुसार पूरक आहार, वेळेवर लसीकरण, प्रेमळ संवाद आणि नियमित आरोग्य तपासणी यांमधून बाळाच्या विकासाचा मजबूत पाया घालता येतो. बाळाला काय खायला मिळतं, याइतकंच महत्त्वाचं आहे की त्याच्याशी कसा संवाद साधला जातो, आणि त्याच्या विकासाकडे किती संवेदनशीलतेने पाहिलं जातं. पहिल्या १,००० दिवसांत आपण केवळ बाळाची वाढ करत नसतो; आपण त्याच्या मेंदूच्या विकासाची, प्रतिकारशक्तीची आणि पुढील आयुष्याच्या आरोग्याची पायाभरणी करत असतो.
(महिला व बालपोषण तज्ज्ञ)
aahaartadnya1605@gmail.com