कामळाच्या फुलांची वाट पाहून मी काहीशी निराशच झाले होते. पावसाळ्यात लावायच्या बागेची तयारी करण्यात गुंतले होते. एक दिवस सकाळी मात्र एक सुखावणारी गोष्ट घडली. कमळाच्या मुळांच्या पसाऱ्यातून एक इवलीशी कळी अगदी सरळसोटपणे वर येऊन पाण्याबाहेर डोकावत होती. आता त्या इवल्या कळीला निरखणं, तिची होणारी वाढ पाहणं हा जणू मला छंदच लागला. दिवसागणिक ती वाढत होती, अधिक उंच होत होती. पुरेशी वाढ झाल्यावर मग कळीच्या दल आणि निदल पुंजाची वाढ होऊ लागली. कळी भरायला लागली. पाकळ्या मोठ्या आणि सघन होऊ लागल्या. हलक्या गुलाबी रंगाचं एक सुंदरसं कमळ त्यातून उमलणार होतं.
ही सगळी प्रक्रिया पाहणं हे कमालीचं आनंद देणारं होतं. साधारण आठ दिवसांत फूल उमलण्याच्या स्थितीला पोहचलं. आता काय नवल बघायला मिळणार या उत्सुकतेपोटी मी सुर्योदयाआधीच कमळापाशी पोहोचले. पाकळ्या अल्लद विलग होऊ लागल्या होत्या. अर्ध उमललेलं फूल फारच देखणं दिसत होतं. सूर्याच्या प्रकाशाबरोबर एक एक पाकळी पूर्ण उमलत होती. साधारण अकराच्या सुमारास सर्व पाकळ्या उमलल्या. मध्यभागी पिवळ्या रंगाचा गोलसर रेखीव बीजकोष, भोवती पिवळेजर्द पारागकोष आणि सभोवती हलक्या गुलाबी, मंद सुगंधित पाकळ्या असलेलं ते राजस फूल मोठं देखणं दिसत होतं. एखादं फूल आपली इतकी नजरबंदी करेल यावर एरवी मी मुळीच विश्वास ठेवला नसता.हिमालयातील स्नो लोटस किंवा ज्याला काहीजण रियल लोटस म्हणतात तेसुद्धा इतकं देखणं वाटलं नव्हतं. अलवार, फिक्कट हिरव्या पाकळ्यांचं हिम कमळ बद्रिनाथाच्या वाटेवर अगदी उंचावरच्या टापूत पाहिलं होतं, पण त्याहीपेक्षा हे सुंदर होतं. आजवर कमळ फक्त फोटोत पाहिलं. कधी देवीचं आसन म्हणून तर कधी श्रीनाथजीच्या मागे पिछवाई चित्रात.
हे ही वाचा… समुपदेशन : आईकडून बहिणींमध्ये दुजाभाव?
कधी अजिंठ्याच्या कोरीव शिल्पात तर कधी जपान मधील बुद्ध मूर्तीं समोरील देखाव्यात. थायलंड मधील मंदिराच्या भिंतीवर चितारलेली कमळ फूल निरखली तर कधी ताजमहालाच्या संगमरवरी दगडात त्यांची कोरीव रूपं पाहिली. प्रत्यक्षातलं फूल त्याहून कैक पटींनी सुंदर होतं. या राजस कमळाच्या पाकळ्या दुपारी बारा नंतर हळूहळू मिटू लागल्या. सूर्य मावळतीला यायच्या आधीच फूल संपूर्णपणे बंद झालं होतं.
दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला ते परत उमललं. आज त्याचं रूप थोडं वेगळं होतं. दुपारसर एक एक पाकळी विलग होऊ लागली. आता उरली होती ती मध्यभागी असलेली पुष्पथाळी. तिसऱ्या दिवशी या पुष्पथाळीचा पिवळा रंग बदलून हिरवा झाला होता. पुढे प्रत्येक दिवसागणिक ती अधिकच हिरवी होतं होती. तिच्यावरील हिरवे ठिपके अधिक गडद होत होते. हळूहळू यात बिया आकाराला येऊ लागल्या. बियांच्या परिपक्वतेबरोबरच कोषाचा रंग तपकिरी काळसर झाला. आता कोषात सहा काळ्या बिया खुळखुळ्यासारख्या वाजत होत्या.
हे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं. कोषातून जेव्हा या बिया विलग होऊ लागल्या तेव्हा मी त्या गोळा केल्या. रिकामा कोष वेगळा करून ड्राय फ्लावर अरेंजमेंटमध्ये वापरण्यासाठी वेगळा ठेवला.
हे ही वाचा… EY Employee Death : कामाच्या अतिताणाने ॲनाचा मृत्यू, जगभरात भारतातील महिला करतात सर्वाधिक तास काम!
या सगळ्या व्यापात नवीन येणाऱ्या दुसऱ्या कळीकडे लक्षच गेलं नव्हतं. सुरुवातीला उमललेल्या कमळ कळीपासून पुढे एक एक करत एकाच कमळं काकडीला चक्राकार फुलं आली. एक आवर्तन पूर्ण झाल्यावर ती थांबली तोवर दुसरं रिंगण सुरू झालं होतं. आता दर दिवशी एकाच वेळी दहा बारा कमळ फुलं डोलू लागली, त्याबरोबर उमलून गेलेली, उमलू पाहणारी तर होतीच, पण वाऱ्यावर झुलणारे बिजकोषही होते. चित्रात रेखल्यासारखं भरगच्च कमळ तळं माझ्या छोट्या कुंडात तयार झालं होतं. अनेक जण हा पद्माविष्कार पहायला येत होती. अडतिसाव्या मजल्यावरच्या गच्चीत फुलणारं ते पुष्प वैभव खरंच अनोखं होतं.
mythreye.kjkelkar@gmail.com