आपण जगातली सर्वोत्तम आई असावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. मुलांसाठी तर आपली आई ही जगातली सर्वात बेस्टच असते. अनेक आयांच्या मानगुटीवर आपण ‘बेस्ट मॉम’ असण्याचं भूत सतत बसलेलं असतं. आजूबाजूच्या लोकांकडूनही उत्तम आई होण्यासाठी अनेक सल्ले, टीप्स सतत ऐकायला मिळत असतात. प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते, आपल्या मुलानं पुढं काय करावं, कसं वागावं… यासाठी ती सतत विचार करत असते आणि सतत मार्गदर्शकाच्या भूमिकेतही असते. तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, पण ‘मॉम’चे अर्थात आयांचे वेगवेगळे प्रकार असतात… त्यांच्या आईपणाच्या स्टाईलवरून हे प्रकार ठरवण्यात आले आहेत.

सोशली ॲक्टीव्ह मॉम-( Socially Active Mom)

ही आई सोशली भरपूर ॲक्टीव्ह असते. तिचे भरपूर सोशल ग्रुप्स आणि मित्रपरिवार असतो. अशी आई कुठेही गेली तरी नवनवीन मित्र-मैत्रिणी जोडते, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेते, व्हॉट्सॲप ग्रुप्सही बनवते. मुलांशी वागण्याबोलण्याचा अनेक टीप्स अशी आई इतरांबरोबर शेअर करते आणि इतरांकडूनही घेते. पण अशी आई असल्याचा फायदा म्हणजे त्यांची मुलंही भरपूर सोशली ॲक्टीव्ह होतात. त्यांचाही मोठा मित्रपरिवार असतो.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

मास्टरशेफ मॉम- (MasterChef Mom)

या आयांना कुकिंगची भरपूर आवड असते. अगदी पोळी-भाजीपासून ते पास्ता, पिझ्झा, केक… सगळं काही या आया घरीच करायचं असतं. आपल्या मुलांना जे हवं ते आपण सगळं घरी करून द्यावं असं या प्रकारच्या आयांना वाटत असतं. त्यामुळे या आयांचे तासन् तास किचनमध्येच जातात. या आयांच्या मुलांच्या डब्यात उत्तमोत्तम पदार्थांची मेजवानीच असते आणि त्यांच्या मित्रांनाही अनेकदा ट्रीट मिळते.

चिंतातूर मॉम- ( Worried Mom)

प्रत्येक आईला आपल्या मुलाची/ मुलीची सतत काळजी वाटत असते. लहान असताना वेगळी काळजी, टीनएजर मुलांच्या आयांची वेगळी काळजी. पण काही आया मात्र सतत काळजी करत राहतात. या असतात ‘चिंतातूर मॉम’! माझं पोरगं आजारी तर पडणार नाही ना? शाळेत त्याला कुणी त्रास तर देत नसेल ना? तो एकटा बसमधून येताना घाबरणार तर नाही ना? खेळताना तो पडला तर! त्यानं डबा तर खाल्ला असेल ना?… असे असंख्य प्रश्न सतत या आयांना पडत असतात. त्याच विचारात त्या अगदी स्वत:लाही विसरतात. शाळेत किंवा खेळायला गेलेल्या मुलाकडून अगदी प्रत्येक क्षणाचा हिशेब या आयांना हवा असतो. जर अशा आया पॅरेंट टिचर मीटिंग्जना गेल्या तर त्या शिक्षकांचं काही खरं नसतं. कारण असंख्य प्रश्न विचारून त्या शिक्षकांना भंडावून सोडतात. या अशा सतत काळजी करण्याच्या स्वभावामुळे यांची मुलंही त्यांना कधीकधी वैतागतात.

परफेक्शनिस्ट मॉम- (Perfectionist mom)

या आयांना प्रत्येक कामात परफेक्शनच हवं असतं. त्यांचा दिनक्रमही अगदी घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आखीव-रेखीव असतो. आपली मुलंही अशीच परफेक्शनिस्ट असावीत असा या आयांचा आग्रह असतो. त्यामुळे त्या सतत मुलांच्या मागे लागलेल्या असतात आणि मुलं नेमून दिलेली कामं वेळेवर आणि नीट करत आहेत ना, याकडे त्यांचं सतत लक्ष असतं. मग अगदी ते होमवर्क असो, खेळण्याचा वेळ असो, दूध पिणं असो किंवा अगदी रात्रीचं जेवणही- या आया मुलांच्या प्रत्येक कामासाठी टाईमटेबल आखतात आणि त्यानुसारच सगळं झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. मुलांच्या रुटीनमध्ये त्यांच्या सुट्ट्या, फॅमिली फंक्शन, अन्य कोणतेही कार्यक्रम या कशाचाही परिणाम होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.

बेस्ट फ्रेंड मॉम- (Best Friend Mom)

अशा आया मुलांना आपल्या बरोबरीनं वागवतात. त्यांना आईपेक्षाही मुलांचं बेस्ट फ्रेंड वाटायला हवं असं वाटत असतं. त्यामुळे मुलांवर कोणत्याही प्रकारची बंधनं घालण्यापेक्षा त्या त्यांच्याशी मित्रत्वानं वागतात. त्यामुळे मुलांनाही एक चांगली मैत्रीण मिळते. अनेकदा ती काहीही लपवत नाहीत. पण काही वेळेस मात्र मुलांना आईचीच गरज असते. अशा वेळेसहही मित्रत्वाच्या नात्यानं वागलं तर मुलांना ते न आवडण्याची शक्यता असते.

फक्त आपल्याच मुलाचं कौतुक करणारी – (Over Protective Mom)

प्रत्येक आईला आपल्या मुलाचं कौतुक असतं. पण काहीजणींना मात्र फक्त आपलंच मूल जगातलं सर्वश्रेष्ठ असल्यासारखं वाटतं. या आया आपल्या मुलांसाठी जरा जास्तच पझेसिव्ह असतात. त्यांच्या प्रत्येक बोलण्याचा केंद्रबिंदू फक्त आपलं मूल हेच असतं. मुलानं अगदी एखादं छोटंसं जरी काम केलं किंवा कशात बक्षीस मिळवलं तर ते संपूर्ण जगाला पुढचे काही दिवस ते कौतुक सांगत बसतात. अगदी ऑफिस, मुलांची शाळा, खेळण्याचं ठिकाण, गार्डन, दुकान कुठेही या आयांना भेटलात तरी त्या फक्त त्यांच्या मुलांचंच कौतुक ऐकवत बसतात.

अंधश्रद्धाळू मॉम

आपल्या पोराला नजर लागेल किंवा त्याला काहीतरी होईल म्हणून या आया सतत घाबरत असतात. किंबहुना मुलांचं जास्त कौतुक केलं तर ती डोक्यावर बसतील म्हणून सगळ्यांसमोर त्यांचं कौतुकही करत नाहीत. उलट तो आपलं कसं ऐकत नाही, त्याला कसे कमी मार्क पडतात, अभ्यास करत नाही, सतत खोड्या करतो, त्रास देतो अशाच तक्रारी या आया करत राहतात. पण त्यामुळे आपल्या मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो हे त्यांना जाणवतंही नाही.

आता तुम्ही यातल्या कोणत्या प्रकारात मोडता याचा विचार करा. पण प्रत्येक मुलासाठी त्यांची आई ‘सुपरमॉम’च असते हे मात्र खरं!

शब्दांकन : केतकी जोशी