आपल्या मैत्रीणीसाठी त्यांनी घेतलेला ‘हा’ निर्णय बघून तुमच्या डोळ्यांतही पाणी येईल. बालपणीची मैत्री किती छान असते. छोटे छोटे रुसवे-फुगवे असले तरी त्यात निष्पाप भावना असतात. एकत्र खाल्लेला खाऊ, एकत्र केलेला दंगा, शाळेतल्या गमतीजमती… मोठे झाल्यावर चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या याच आठवणी असतात. मैत्रीणीला लागलं की आपल्या डोळ्यांतून पाणी येतं… तिच्या वेदना कमी करण्यासाठी काहीही करण्याची आपली तयारी असते. जोधपूरमधल्या काही छोट्या मैत्रीणींनी आपल्या सखीसाठी असं काही केलं आहे की ज्यामुळे सध्या त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे. या मैत्रीणींनी अगदी लहान वयातच मैत्रीचा आदर्श घालून दिला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या जोधपूरमधील एका शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे. या शाळेतील एका विद्यार्थिनीला कॅन्सर झाला. कॅन्सरवरील औषध, केमोथेरपी यामुळे या मुलीचे केस पूर्ण गेले. कॅन्सर हा आजार भल्याभल्यांना नैराश्येच्या गर्तेत लोटतो. ही तर एक लहान मुलगी होती. ती बाहेर गेल्यावर लोक काय म्हणतील या भीतीने तिनं बाहेर येणं-जाणं बंद केलं. शाळेत जाणंही बंद केलं. ती एकटी राहू लागली. आपल्या मैत्रीणीची अवस्था तिच्या वर्गातल्या मुलींना बघवत नव्हती. ती एकटी नाही हे तिला जाणवू देण्यासाठी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि त्याला त्यांच्या शिक्षकांनीही साथ दिली.

तिच्या वर्गातील सगळ्या मुलींना त्यांच्या डोक्यावरचे केसही काढून टाकले आणि पूर्णपणे टक्कल केलं. इतकंच नाही तर तिच्या शिक्षिकांनीही याला साथ देत मुंडण करून घेतलं. या मुलींचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये स्कूल बॅग घेतलेल्या मुली एकामागोमाग एक लाईनमधून येत असताना दिसतात. या सगळ्या मुली मुंडन केलेल्या आहेत. त्यानंतर एक महिला एका मुलीला घेऊन येते. या दोघींच्या डोक्यावरही केस नाहीत. या शाळेत्या मुलीचे केस केमोथेरपीच्या दरम्यान पूर्णपणे गळून गेले. त्यामुळे उदास झालेल्या आपल्या मैत्रीणीला एकटं वाटू नये यासाठी तिच्या मैत्रीणी आणि शिक्षकांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

 कॅन्सर अनेकदा जीवघेणा आजार ठरतो. त्याचबरोबर हा आजार माणसाला एकाकी करतं. आयुष्यातील सगळ्यांत मोठी लढाई लढत असताना आपल्या मैत्रीणीला एकटं वाटू नये यासाठी या लहान मुलींनी उचललेलं पाऊल पाहून आपल्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. मोठ्यांनाही जे जमलं नसतं ते या मुलींनी केल्यामुळे तसंच त्यांच्या शिक्षकांनी त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचंही कौतुक होत आहे.

कॅन्सर पेशंटसाठी शारीरिक औषधांबरोबरच मानसिक आधारही तितकाच महत्त्वाचा असतो. याबद्दल आत्ता कुठे जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. या मुलींनी आपल्या कृतीतून एखाद्याच्या सोबत असणं म्हणजे काय हे दाखवून दिलं आहे. खरं तर केस हा मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. शाळेत असताना तर कुणाचे केस लांब आहेत यावर चढाओढही सुरू असते. त्यामुळे या मुलींनी जे केलं आहे त्याला तोड नाही. मैत्री निभावण्यासाठी तुम्हाला काहीतरी भव्यदिव्य करण्याची गरज नसते.

निस्वार्थी मनाने आपल्या मैत्रीणीसाठी केलेली कोणतीही गोष्ट मोठीच असते हेच यावरून दिसून येतं. आपल्या मैत्रीणीच्या वेदना तर आपण घेऊ शकत नाही, पण त्या कमी नक्की करू शकतो या निर्मळ हेतूने या मुलींनी ही कृती केली आहे. ती एकटी नाही हे तिला जाणवून देणाऱ्या तिच्या मैत्रीणी आणि शिक्षकांचा हा व्हिडिओ लक्षवेधी ठरतो आहे. या मुलींनी मैत्रीणीची साथ तर दिली आहेच. पण त्यांच्या कृतीतून कॅन्सरबद्दल जागरूकताही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

कॅन्सरग्रस्त माणसाला एकटे सोडू नका, असा संदेश त्यांच्या कृतीतून त्यांनी दिला आहे. शाळेत चार भिंतीच्या आड शिक्षण तर सगळीकडेच मिळतं. शिक्षण घेत असताना शिक्षक विद्यार्थ्यांमधून संवेदनशील माणूस कसा घडवू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. अशी भक्कम मैत्री मिळाली तर प्रत्येक संकटावर मात करण्याची हिंमत मिळते. शाळेतील मैत्री निरागस, निस्वार्थी तर असतेच पण आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला सोबत करते.