आपल्या देशाला पदक मिळवून देण्यासाठी मैदानावर जीव तोडून पळणारी ती… आणि रात्री रुग्णांची आपुलकीनं विचारपूस करणारी ती… सध्याच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी ती आहे टिपिकल अमेरिकन युवती. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला तिनं २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवून दिलं. जगातल्या वेगवान धावपटूंमध्ये तिचं नाव दुसरं आहे. तिचं नाव गॅबी थॉमस. गॅबी ही अमेरिकन ॲथलिट आहे. पण ती नुसतीच खेळाडू नाही, तर स्वत:च्या पायावर उभी असलेली गॅबी उच्चशिक्षित आहे. एकदा खेळाकडे लक्ष द्यायला लागलं की कितीतरी खेळाडूंचं शिक्षण अर्धवटच राहतं. पण गॅबीनं ऑलिम्पिकच्या दृष्टीने आपल्या प्रशिक्षणाचा वेग दुप्पट केला आणि त्याचबरोबर आपलं शिक्षणही सुरू ठेवलं. ती हार्वर्ड विद्यापीठाची पदवीधर आहे. न्युरोबायोलॉजी अँड ग्लोबल हेल्थ या अत्यंत अवघड विषयांत तिनं पदवी मिळवली आहे. Sleep epidemiology या विषयामध्ये तिनं टेक्सास युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स केलं आहे. हेही वाचा - महिलांच्या वाटेवर अडथळ्यांची रांग! लैंगिक छळ अन् भेदभावामुळे नोकरदार महिला हतबल; अहवालातून धक्कादायक माहिती समोर दिवसभर गॅबी आपलं ॲथलिटिक्सचं प्रशिक्षण घेते. खरं तर दिवसभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर कुणीही आता दुसरं काही नको असं म्हणेल, पण गॅबी आपल्या शिक्षणाचा सदुपयोग करते. गॅबी टेक्सासमधील ऑस्टिनमध्ये हेल्थ केअर क्लिनिकमध्ये ज्या लोकांकडे इन्शुरन्स नाही अशा लोकांसाठी स्वयंसेविका म्हणून काम करते. २७ वर्षांच्या गॅबीने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल मिळवलं होतं. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये न्युरोबायोलॉजीचं शिक्षण घेत असतानाच तिनं धावण्याचंही प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याआधी शाळेत असताना ती सॉकर आणि सॉफ्टबॉल खेळायची. १०० मीटर, २०० मीटर, लांब उडी आणि ट्रिपल जंप अशा सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण तिनं कॉलेजच्या तीन वर्षांमध्ये घेतलं. या तीन वर्षांत वेगवेगळ्या सहा इव्हेंट्समध्ये तिने २२ मेडल्स मिळवली. गॅबीनं रनिंग गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं तिच्या आईनं तिला सुचवलं. गॅबीनं विचार केला आणि ॲथलिट होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले. पण त्याचबरोबर अभ्यासही सुरुच होता. किंबहुना हेल्थकेअर हा विषय तिला इतका आवडला की त्यातच मास्टर्स डिग्री घ्यायचं तिनं नक्की केलं. त्यासाठी तिनं टेक्सास युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. त्याच्याच बरोबरीने तिनं बर्फर्ड-बॅली ट्रॅक क्लबमध्येही प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. या क्लबमध्ये कृष्णवर्णीय महिलांना ॲथलिटिक्सचं प्रशिक्षण दिलं जातं. या क्लबमध्ये गॅबीला बरंच काही शिकता आलं आणि तिला नवा आत्मविश्वासही या क्लबमुळे मिळाला. टोकियो ऑलिम्पिक ट्रायल्सच्या आधी गॅबीला दुखापत झाली होती. तरीही तिनं या ट्रायल्समध्ये रेकॉर्ड केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ, त्यानंतर झालेल्या वर्ल्ड चॅंपियनशीपमध्ये सिल्व्हर मिळाल्यानंतर आता देशासाठी गोल्ड मेडल जिंकायचंच असा निश्चय तिनं केला होता. त्याप्रमाणे तिनं २०० मीटरच्या स्पर्धेत गोल्ड तर मिळवलंच, पण जगातील वेगवान धावपटूंपैकी एक अशी ओळखही कायम ठेवली. एलिसन फेलिक्स ही गॅबीची आदर्श आहे. गंमत अशी की ज्या एलिसनला टीव्हीवर बघून गॅबी भारावली होती, तिच्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या टीममध्ये ती सहभागी झाली. हेही वाचा - “जेव्हा आई शाळेत जाते…” वर्गमैत्रिणी असलेल्या मायलेकींची कहाणी! आपला खेळ आणि अभ्यास अशी तारेवरची कसरत सांभाळणाऱ्या गॅबीला प्राण्यांबद्दल फार प्रेम आहे. तिचं तिच्या रिको नावाच्या कुत्र्यावर प्रचंड प्रेम आहे. ‘त्याला दत्तक घेणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय होता, जेव्हा मैदानावर चांगला परफॉरमन्स होत नव्हता, तेव्हा रिकोनेच आपल्याला साथ दिली,’ असं ती म्हणते. ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंवर अपेक्षांचं प्रचंड ओझं असतं. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर प्रचंड ताणही असतो. या ताणाला सामोरं जातानाही गॅबी शांत होती. “तरुण मुलींनी आमच्याकडे (मेडल विजेत्यांकडे) भक्कम महिला ॲथलिट म्हणून पाहावं आणि आपणही हे करू शकतो असं मनापासून ठरवावं,” अशी प्रतिक्रिया तिनं मेडल जिंकल्यानंतर दिली होती. झोप हा तिच्या अभ्यासाचा भाग आहे. त्यामुळे एका खेळाडूसाठी त्याचं महत्त्व ती चांगलंच जाणते. किंबहुना झोप हाही प्रशिक्षणाचा भाग असल्याचं तिचं म्हणणं आहे. त्यामुळेच ती रात्री ८ वाजता सगळी गॅजेट्स बंद करून झोपी जाते. पुरेशी झोप घेतल्याने ताण कमी होतो आणि नव्या दिवसाला, नव्या आव्हांनाना सामोरं जायला उर्जा मिळते असं मानणारी गॅबी ही आपलं शिक्षण आणि मैदानावरचं प्रशिक्षण यांचा उत्तम मेळ साधते.