सध्या सगळीकडे रोमँटिक माहोल आहे. व्हॅलेंटाईन वीकमधले वेगवेगळे दिवस साजरे करण्यासाठी सगळीकडे थीम्स, गिफ्टच्या आयडियाज यांचा पाऊस पडत असतो. हा व्हॅलेंटाईन वीक फक्त कपल्सससाठीच असतो असं जर तुम्हाला वाटत असेल, तर थोडंसं थांबा. याच रोमँटिक वीकमध्ये एक खास दिवस असतो जो फक्त मुलींसाठी- खरं तर मैत्रीणींसाठी राखीव असतो. तुमच्या आयुष्यातील त्या स्त्रीचं स्थान किती खास आहे हे सांगण्याचा हा दिवस म्हणजेच गॅलेंटाईन्स डे! प्रेम म्हणजे फक्त प्रियकर- प्रेयसी किंवा नवरा-बायको किंवा जोडीदारांमधलंच नसतं, प्रेम म्हणजे फक्त रोमान्स नसतो… तर खऱ्या अर्थाने मैत्रीचं नातं निभावणाऱ्या स्त्रीबद्दल व्यक्त होण्याचा हा दिवस आहे असं म्हटलं जातं.
निखळ, निर्मळ मैत्री निभावणाऱ्या मैत्रीणीसाठी हा खास दिवस राखीव असतो. दरवर्षी १३ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डेच्या आदल्या दिवशी गॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो. आपल्यासोबत हसणारी, आपल्या दु:खाने व्याकूळ होणारी, आपल्याला लढण्याची हिंमत देणारी, संपूर्ण जग विरोधात असलं तरी आपल्यावर ठाम विश्वास ठेवणारी अशी मैत्रीण प्रत्येकाला हवीच असते. जिच्यापाशी आपलं मन मोकळं करता येतं, तिच्यापासून काहीही लपवावंसं वाटत नाही. किंबहुना तिला न सांगताही सगळं कळतं अशी मैत्री तर खासच असते. शाळेपासूनची, तारुण्याच्या उंबरठ्यावर झालेली, ऑफिसमधली, वयाच्या चाळीशीत झालेली आणि अगदी निवृत्तीच्या वयातलीही… मैत्रीण तीच असते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळ्यांत खास अशा मैत्रीणीला ती किती खास आहे हे सांगण्यासाठी म्हणून गॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो.
गॅलेंटाईन्स डे ही संकल्पना ‘पार्क्स अँड रिक्रिएशन’ (Parks And Recreation) टीव्ही शोमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली. त्यामध्ये लेस्ली नॉप हिने हा दिवस म्हणजे महिलांनी एकमेकांबरोबरचं नातं, मैत्री साजरी करण्याचा दिवस असं त्याचं वर्णन केलं आणि ते क्लिकही झालं. संपूर्ण व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये फक्त रोमान्ससाठीच सगळे दिवस आहेत असा समज असताना, एकतरी दिवस ‘मैत्रीसाठी- मैत्रीणीसाठी’ही कल्पना विशेषत: तरुणींना तर खूपच आवडली. सगळेचजण काही रोमँटिक रेलिशेनशीपमध्ये नसतात किंवा सगळ्यांनाच फक्त व्हॅलेंटाईन्स वीकही साजरा करायचा नसतो. रिलेशनशीपमध्ये असलं तरी मैत्री ही प्रत्येकासाठीच मोठा आधार असते. एकमेकांना केलेलं प्रपोझ, प्रेमात पडल्याची दिलेली कबुली, जोडीदारासाठी घेतलेली गिफ्ट्स, त्याच्यासोबतची भांडणं… अशा असंख्य गोष्टी शेअर करायलाही कुणीतरी हवंच असतं. प्रेमात पडलो असलो तरी मैत्रीणींबरोबर रात्रभर जागून मारलेल्या गप्पा, तिच्यासमोर व्यक्त केलेल्या भावना, कठीण काठात तिने दिलेली साथ आणि तिचा अगदी प्रामणिक कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय असलेला पाठिंबा, या सगळ्याची तुलना अन्य कशाचीच होऊ शकत नाही, त्यामुळे अशा नात्याची प्रत्येकाला खूप गरज असते.
व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे भावनांचा कल्लोळ… पण कोणत्याही भावनिक ताणाशिवाय जर तुम्हाला एखादा दिवस साजरा करायचा असेल तर तो आहे- गॅलेंटाईन्स डे. तुमचे नातेवाईक तर तुम्ही निवडू शकत नाही, पण तुमचे मित्र-मैत्रीणी तुम्ही निवडलेले असतात. ते तुमच्यासमोर खरं बोलायला घाबरत नाहीत, तुमच्या चुका स्पष्टपणे दाखवतात, तुमच्यावर रागावतात, चिडतात, भांडतात पण तरीही सतत तुमच्यासोबत असतात. अशा मैत्रीणीसाठी एक तरी दिवस खास असायलाच हवा ना!
आता व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे गिफ्ट्स घ्या, चॉकलेट्स घ्या, तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी नाना अनोख्या पध्दती शोधा. पण गॅलेंटाईन्स डे म्हणजे या सगळ्यापासून अगदी सुटका. हा दिवस तुम्हाला हवा तस्सा तुम्ही साजरा करू शकता. हवं तर गिफ्ट घ्या किंवा नका घेऊ. गिफ्टपेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही तिच्याबरोबर असणं. मस्तपैकी एखादं ब्रंच किंवा लंच प्लॅन करू शकता. आवडत्या नाटकाला, चित्रपटाला जाऊ शकता, एकत्र शॉपिंग करू शकता किंवा घरीच राहून मस्तपैकी लोळत गप्पा मारू शकता. अगदी एक कप चहा किंवा पाणीपुरी खा… पण भरपूर गप्पा मारा आणि ती किती खास आहे हे सांगायला मात्र विसरू नका. आता तुमची मैत्रीण लांब, दुसऱ्या शहरात किंवा अगदी परदेशातही राहत असेल तरी काय झालं? तिला फोन लावू शकता, फेसटाईम, व्हिडिओ कॉल करूनही तिच्याशी पोटभर गप्पा मारू शकता.
तरुण असताना पाहिलेली स्वप्नं, भविष्यातील ध्येयं, सगळं काही तिला माहिती असतं. पण त्या ध्येयांचा पाठलाग करता करता कधीकधी ही निखळ मैत्री मागे राहते. तिचा हात सुटून जातो पण त्या हाताची ऊब मात्र कायम आपल्यासोबत असते. काहीही झालं तरी तिला आपण कधीही हक्कानं सांगू शकतो हा विश्वास आयुष्यभर असतो. तो विश्वास दिलेल्या मैत्रीणीला तिचं महत्त्व सांगायला विसरू नका.
तुम्ही सिंगल असा किंवा रिलेशनशीपमध्ये, विविध डेज साजरे करायला संपूर्ण आठवडा आहे. पण तुमचं आयुष्य अधिक आनंदी करणाऱ्या या व्यक्तीसाठी हा हक्काचा मनमोकळा दिवस राखून ठेवा. आणि एक महत्त्वाचं, मैत्री आणि मैत्रीण मुलगी,आई, सासू, सून, नणंद भावजय, जाऊ, मामी, आत्या, काकू, मावशी किंवा बहीण, अशा कोणत्याही नात्यात असू शकते. तेव्हा तुमचा हक्काचा गॅलेंटाईन्स डे तुमच्या आवडत्या मैत्रीणीबरोबर साजरा करायला विसरू नका!

