बऱ्याचदा मुलींच्या आयुष्याचे निर्णय घेताना तिच्या काळजीपोटी गुंता होऊन बसतो. तिला खूप सारं संरक्षण दिलं जातं, नाही तर आहे त्या परिस्थितीला सामोरे जा असं सांगत हात झटकले जातात. आयुष्यात एखादं संकट आलं, नाते संबंध बिघडतायत असं वाटलं तर ती काय करू शकते यादृष्टीने तिला भावनिक, सामाजिकदृष्टया आपण कितपत सक्षम बनवतो यासह वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा देता येतील तेव्हा आपण ती सक्षम आहे असे म्हणू शकू…
ती नाशिकची, तो पुण्याचा… घरातल्यांच्या संमतीने रितीरिवाजाप्रमाणे लग्न ठरवलं… मुलगी सुखात राहावी म्हणून वऱ्हाडाला येण्या-जाण्यासाठी सहा वातानुकूलित बसेस… हुंडा यासह अन्य अटी पूर्ण केल्या. धुमधडाक्यात लग्न झालं… मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींचे खंरं रूप तिच्या समोर आलं. सतत पैशांची मागणी होवू लागली… ती मात्र हा त्रास सहन करत राहिली. दरम्यान तिला एक मुलगी झाली. बाळंतपणानंतर सासरी परतल्यावर तिला पुन्हा हुंड्यासाठी त्रास सुरू झाला… यावेळी मात्र सासरच्या जाचाला कंटाळून ती माहेरी आली, तीही तीन महिन्याच्या चिमुकलीला घेऊन… पण तिचा भाऊ तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. तो तिला घेऊन महिला आयोगाकडे आला. ‘‘ माझ्या बहिणीची वैष्णवी होऊ देऊ नका…’’ अशी कळकळीची विनंती त्यांनी महिला आयोगाकडे केली आहे…
वीस वर्षांचा सुखी संसार… कामानिमित्त त्याचं सतत बाहेर राहणं… अचानक त्याच्या आयुष्यात ‘ती’ आली आणि पत्त्याच्या बंगल्या सारखा तिचा सुखी संसार कोलमडला… घटस्फोटासाठी त्यानं तगादा लावला. त्यासाठी तो तिला धमाकावू लागला. खरं तर ती उच्चशिक्षित, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये पुरती गुंतलेली… सासू-सासरे पाठिंबा द्यायला तयार, पण जगण्यासाठी लागणारा खमका आधार… आर्थिक स्थैर्य… मुला-मुलींच्या जबाबदाऱ्या आणि समोर असलेले एकाकीपण… यामुळे ती शून्यात हरवलेली… पण एका क्षणाला सारं काही झुगारून पोलीस ठाण्याची पायरी चढली… नवरा आणि त्याच्या प्रेयसीविरूध्द तक्रार दाखल करण्याची तिनं हिंमत दाखवली…
ती वयात येताच तिचं नात्यात म्हणजे आत्याच्या मुलासोबत लग्न लावून दिलं… एकत्र कुटुंब… सासऱ्यांची खूप शेती… एकदा शेतात वांगे काढत असताना तिनं वांग्यासह रोपही उपटलं… सासऱ्यानं हे पाहिलं तसं सर्वांंसमोर तिच्या कानशिलात लगावली… हा प्रकार नवऱ्याला सांगितला तर तो म्हणाला, ‘‘या घरात राहायचं असेल तर माझ्यासारखा निम्मा निम्मा खर्च दे… जी मुळात कमवत नव्हती ती अर्धा खर्च कसा देणार? तिनं आता कायदेशीर घटस्फोटाचा पर्याय निवडला असून ती पोटगी मिळवण्यावर ठाम आहे…
प्रेम म्हणजे नक्की काय याचं पुरेसं ज्ञान नसतानाही ती त्याच्या प्रेमात पडली. दोघेही वेगवेगळ्या जातीचे. घरच्यांना त्यांचं प्रेम मान्य नव्हतं, पण मियाबीबी राजी तो क्या करेगा काझी म्हणत दोघांचं लग्न झाले. काही दिवसांतच दोघांमध्ये वाद होऊ लागले… हे वाद एवढे विकोपाला गेले की तिनं आत्महत्येचा पर्याय निवडला…
आपल्या सभोवताली अशी एक ना अनेक उदाहरणं दिसतात… तिची वेदना… तिचा संघर्ष तिलाच ठाऊक. काळ पुढे जातो पण तिचा संघर्ष, वेदना पुरातनच… कधी ती थकते, त्वेषाने अन्यायाविरोधात उभी राहते. अनेकदा तिच्या सोबत तिचं कुटुंबही नसतं, तर समाजाची गोष्ट दूरच. सामाजिक प्रतिष्ठा या गोंडस नावाखाली, समाज काय म्हणेल या गोष्टीला कुटुंबही महत्त्व देतं. अशा परिस्थतीतीत अनेकदा ती टोक गाठते. आपलं आयुष्य संपवते. मुलगी शिकली असं आपण म्हणतो तेव्हा ती खऱ्या अर्थानं आर्थिक-सामाजिक-मानसिकदृष्टया सक्षम झाली का ? तिच्या निर्णयामागे ठामपणे उभे राहताना त्या निर्णयाच्या परिणामांनाही तुलाच सामोरे जावे लागेल ही जाणीव पालक म्हणून आपण करून देतो का?
बऱ्याचदा मुलींच्या आयुष्याचे निर्णय घेताना तिच्या काळजीपोटी गुंता होऊन बसतो. तिला खूप सारं संरक्षण दिलं जातं, नाही तर आहे त्या परिस्थितीला सामोरे जा असं सांगत हात झटकले जातात. आयुष्यात एखादं संकट आलं, नाते संबंध बिघडतायत असं वाटलं तर ती काय करू शकते यादृष्टीने तिला भावनिक, सामाजिकदृष्टया आपण कितपत सक्षम बनवतो यासह वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा देता येतील तेव्हा आपण ती सक्षम आहे असे म्हणू शकू…