अनुजा कर्णिक मोहिले
घरातल्या डब्यात चिप्स, हातात ज्यूसचा पॅक आणि समोर मोबाईल. आज अनेक मुलींचं बालपण असंच दिसतं. मुली सतत काहीतरी खात असतात, पण तरीही अनेक पालकांचं एकच वाक्य असतं, “काही खातच नाही.” कारण प्रश्न फक्त पोट भरण्याचा राहिलेला नाही; प्रश्न आहे पोषणाचा. पूर्वी कुपोषण म्हणजे कमी वजनाच्या, अशक्त मुली अशी प्रतिमा होती; तर स्थूलता ही श्रीमंतीशी जोडली जात असे. पण आता वास्तव बदललं आहे. WHO, UNICEF आणि ICMR-NIN यांच्या अहवालांनुसार भारत ‘ट्रिपल बर्डन ऑफ मालन्युट्रिशन’चा सामना करत आहे. म्हणजे कुपोषण, सूक्ष्म पोषकतत्त्वांची कमतरता आणि वाढती स्थूलता या तिन्ही समस्या एकाच वेळी दिसत आहेत.
या त्रिसूत्रीचे तीन चेहरे आहेत. पहिला म्हणजे कुपोषण ज्यामुळे वाढ खुंटू शकते आणि अशक्तपणा येऊ शकतो. दुसरा म्हणजे सूक्ष्म पोषकतत्त्वांची कमतरता, जी अनेकदा दिसूनही येत नाही. आणि तिसरा म्हणजे स्थूलता, जिथे वजन वाढतं, पण शरीराला आवश्यक पोषण मिळेलच असं नाही. त्यामुळे मुलींची वाढ आता केवळ उंची-वजनापुरती मर्यादित राहिलेली नाही; ती त्यांच्या संपूर्ण शारीरिक आणि प्रजनन आरोग्याशी जोडली जात आहे.
या लपलेल्या कुपोषणाचं सर्वात सामान्य उदाहरण म्हणजे ॲनिमिया. अनेकांना वाटतं की ॲनिमिया फक्त कमी वजनाच्या मुलींमध्ये आढळतो. पण वास्तव वेगळं आहे. NFHS-5 नुसार भारतातील सुमारे 59% किशोरवयीन मुली ॲनिमियाग्रस्त आहेत. विशेष म्हणजे ॲनिमिया कमी वजनाच्या, सामान्य वजनाच्या आणि जादा वजनाच्या मुलींमध्येही आढळू शकतो. कारण प्रश्न फक्त किती खाल्लं याचा नसून काय खाल्लं याचाही असतो. सतत थकवा, अभ्यासात लक्ष न लागणं, चिडचिड वाढणं, खेळताना लवकर दम लागणं, वारंवार डोकेदुखी होणं किंवा केस गळणं ही त्याची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. लोहाची कमतरता केवळ शारीरिक वाढीवरच नाही तर एकाग्रता, शिकण्याची क्षमता आणि दैनंदिन कार्यक्षमतेवरही परिणाम करू शकते.
यावरचे उपाय मात्र अनेकदा आपल्या स्वयंपाकघरातच सापडतात. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्यं, हरभरा, चवळी, राजमा, शेंगदाणे, तीळ, गूळ, नाचणी, अंडी किंवा मांसाहारी पदार्थांचा समावेश करणं उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर लिंबू, आवळा, संत्री किंवा इतर व्हिटॅमिन-Cयुक्त पदार्थ जेवणासोबत घेतल्यास लोहाचं शोषण वाढण्यास मदत होते. खरं तर या उपायांपैकी बहुतांश गोष्टी आपल्याला माहीत आहेत.
पण मग प्रश्न असा पडतो की, जर उपाय माहीत असतील तर समस्या वाढत का आहेत? याचं उत्तर आपल्या बदलत्या अन्नसंस्कृतीत आणि जीवनशैलीत दडलं आहे. अनेक मुलींच्या आहारात डाळी, कडधान्यं, दूध, अंडी, शेंगदाणे यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ कमी होत आहेत; तर साखर, मीठ आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांचं प्रमाण वाढत आहे. ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिरिक्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ मर्यादित ठेवणं आवश्यक आहे.
आज अनेक संशोधनांमध्ये बालपणातील पोषण, शरीररचना, शारीरिक हालचाली आणि जीवनशैली यांचा मुलींच्या वाढीच्या गतीशी आणि ऋतुप्राप्तीच्या वेळेशी संबंध दिसून येत आहे. त्यामुळे मुलींच्या आरोग्याकडे फक्त आजच्या पोषणाच्या दृष्टीने नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण आरोग्यप्रवासाच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
त्यातच मुलींचं खाणं केवळ स्वयंपाकघरात ठरत नाही. जाहिराती, सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर्स आणि आकर्षक पॅकेजिंग त्यांच्या निवडींवर प्रभाव टाकत आहेत. पूर्वीच्या ताटातील डाळी, कडधान्यं, नाचणी, ताक आणि घरचे पदार्थ यांची जागा हळूहळू अतिप्रक्रिया केलेले स्नॅक्स, साखरयुक्त पेय आणि पॅकेज्ड पदार्थ घेत आहेत. कॅलरीज वाढल्या, पण पोषण हरवत चाललं आहे.
पोषणाचा प्रश्न केवळ अन्नापुरता मर्यादित नाही. WHO नुसार मुलींना दररोज किमान ६० मिनिटे सक्रिय खेळ आवश्यक आहे. पण स्क्रीनचा वाढता वापर, सुरक्षित खेळाच्या जागांची कमतरता आणि वाढलेला अभ्यासाचा ताण यामुळे शारीरिक हालचाली कमी होताना दिसत आहेत.
यासाठी उपाय परिपूर्णतेत नाहीत; ते छोट्या बदलांत आहेत. दिवसातून एक वेळ कुटुंबासोबत जेवणं, स्क्रीनशिवाय खाणं, घरचे नाश्ते वाढवणं, साखरयुक्त पेय कमी करणं, मुलींना पॅकेज्ड पदार्थांचे लेबल वाचायला शिकवणं आणि रोज सक्रिय खेळासाठी वेळ देणं, हे छोटे बदल मोठा फरक घडवू शकतात.
मुलींना केवळ ‘काय खायचं’ हे शिकवण्यापेक्षा अन्नाशी निरोगी नातं निर्माण होणं अधिक महत्त्वाचं आहे. भूक लागल्यावर खाणं, सावकाश खाणं, अन्नाची चव ओळखणं आणि जेवताना स्क्रीनपासून दूर राहणं: या साध्या सवयीही आरोग्य घडवतात. कारण निरोगी वाढ ही फक्त शरीराची नसते; ती शरीर, मन, भावना आणि पुढील आयुष्याच्या आरोग्याशी जोडलेली असते. कदाचित मुलींच्या आरोग्याची सुरुवात पुन्हा स्वयंपाकघर, खेळाचं मैदान आणि कुटुंबासोबतच्या जेवणातूनच करावी लागेल.
(महिला व बालपोषण तज्ज्ञ)
aahaartadnya1605@gmail.com
