आपल्या मुला-मुलींची लग्न झाली आणि मग त्यांना एखादे मूल झालं की संपली आपली जबाबदारी, अशी वर्षानुवर्षे चालत येणारी मानसिकता आजही आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते. आणि मग नातवंडांची जबाबदारी आजी-आजोबांच्या खांद्यावर पडली की, सुरुवातीला बरं वाटतं. पण हळूहळू मात्र या जबाबदारीचं ओझं वाटू लागतं. परिणामी, काय करणार मुलगा-सून दोघेही कामावर जातात आणि सुनेची मुलं आम्हाला सांभाळावी लागतात. आता आमचंही वय होत चाललं आहे. आधी स्वत:ची मुलं सांभाळली आणि आता सुनेची. आम्ही आमचं आयुष्य जगणार कधी? ही परिस्थिती अलीकडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते.

नुकत्याच रेखा शर्मा नावाच्या एका महिलेने समाज माध्यमावर आपली पार्कमधील एका महिलेची व्यथा मांडली आहे. ‘‘मला जेव्हा इच्छा असते, तेव्हा मी माझ्या सुनेच्या मुलांना फिरायला घेऊन जाते आणि जेव्हा त्यांना न्यावेसे वाटत नाही, तेव्हा मी नाही नेत. त्यांना फिरवून आणायचे की नाही हे माझ्या मर्जीवर अवलंबून असते.’’ पण त्या सांगातात अशावेळी ती महिला आपल्या नातवंडांना सुनेची मुलं असं लेबल लावून मोकळी झाली आणि ते चुकीचं असं त्या म्हणतात.

खरं तर गंमतीचा भाग असा आहे की, सुनेची मुलं सांभाळावी लागतात, अशी ओरड होत असते. पण ही सुनेची मुलं स्वत:च्या मुलाचीदेखील असतात, याचा मात्र जाणीवपूर्वक विसर पडतो. इथे दोन्ही बाजूंचा विचार केला तर एक गोष्ट सहजपणे लक्षात येते की, मुलगा-सून किंवा मुलगी-जावई दोघांना काम करणे गरजेचे असते. अशावेळी प्रत्येक ठिकाणी चांगल्या पाळणाघराची अथवा डे-केअरची सोय असेलच असे नाही. त्यामुळे घरात आजी-आजोबा असतील तर नकळतपणे नातवंडांची जबाबदारी ही त्यांच्यावर पडते. आजी-आजोबा शारीरिकदृष्ट्या सक्षम असतील तर निभावून जाते. पण एखाद्या व्याधीने ग्रस्त असतील तर मात्र नातवंडांची जबाबदारी जाचक वाटू लागते. अशावेळी मदतनीस बाईची मदत त्यांच्या जोडीला दिली तर कदाचित ही जबाबदारी पेलणं सहजशक्य होऊ शकेल.

आजी-आजोबांनीदेखील एखादी गोष्ट त्यांना जमत नसेल, तर तसे स्पष्ट व चांगल्या शब्दांत आपल्या मुलगा-सून किंवा मुलगी-जावई यांना सांगावे. केवळ आपल्या नातवंडांचा हट्ट पुरवायचा आहे म्हणून त्यांच्या अवास्तव मागण्यांना होकार देऊ नये. तर कधी कधी मुलगा-सुनेला असे वाटते की, आजी-आजोबांमुळे आपल्या मुलांवर हवे तसे संस्कार करता येत नाहीत. त्यांची लुडबुड वाटायला लागते. परिणामी दोन्हीकडचे भावनिक संबंध बिघडू लागतात. आणि मधल्यामध्ये नातवंडांचेदेखील हाल होतात.

दुसरे असे की, नातवंडे आजी-आजोबांना लळा लावायला लागली की, ती मुलाची मुले असतात. पण हीच नातवंडे हक्क गाजवू लागली की सुनेची होतात. ही अशी दुट्टपी भूमिका बदलणं गरजेचे आहे. जन्माला आलेलं नातवंड हे मुलगा, सून दोघांचेही असते. अशावेळी सून केवळ दुसऱ्या घरातून आली आहे, म्हणून तिला परकी ठरविणे, नातवंडं बेजबाबदार वागली की त्याचे खापर सुनेवर फोडणे हे योग्य नाही.

बऱ्याचदा यामध्ये पालकांची चूक असते. मुले-मुली लग्नायोग्य वयात आली की, त्यांच्यामागे लग्नाचा तगादा लावला जातो. त्यातूनही लग्न वेळेत जमून आले  तर लगेच बाळासाठी घाई केली जाते. जोपर्यंत आम्ही चालते-फिरते आहोत, तोपर्यंत ‘चान्स’ घेऊन टाका, असा आग्रह धरला जातो. आपला मुलगा आणि सून बाळाची जबाबदारी घ्यायला तयार झाले आहेत का? याचा मात्र विचार केला जात नाही. कारण त्यांना एक मूल झाले की, आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे.

पुढे किती मुलं जन्माला घालायची हा मग मुलगा आणि सुनेचा प्रश्न असतो. मुळातच लोकांना जबाबदारीतून मोकळे होण्याची घाई का असते आणि तसं पाहिलं तर आयुष्याच्या हर एक टप्प्यावर ती ती जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावी लागते. लहान वयात शिकण्याची जबाबदारी, तरुण वयात नोकरी-करिअर करण्याची जबाबदारी… मग लग्न करून संसार करण्याची मग पुढे फावल्या वेळात स्वत:च्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगण्याची.

मुळातच आयुष्य जगत असताना त्या त्या वेळी तो तो क्षण जगणं, म्हणजेच आयुष्य आहे. उतारवयात स्वत:ची शारीरिक क्षमता ओळखून येणाऱ्या जबाबदारीचे आधीपासूनच व्यवस्थापन केल्यास, पुढे संबंधामध्ये येणारा दुरावा आधीच टाळता येईल. मग येणारे नातवंडं हे फक्त सुनेचे किंवा जावयाचे न राहता ते आपल्या कुटुंबाचे असेल, अशी आशा करायला हरकत नाही.