‘एकीचे बळ देते फळ’ हे आपण अनेकदा ऐकत असतो. तर कधी कधी आयुष्यात अनुभविलंदेखील असेल. स्त्रियांच्या बाबतीतही असंच काहीसं होत असतं. सर्वसाधारणपणे तरुणीचं लग्न झालं की तिला सासुरवास हा होणारच असतो, असे कित्येकदा गृहीत धरलं असतं. मग हा सासुरवास कधी सासू-सासऱ्यांकडून असतो तर कधी नवऱ्याकडून. अशावेळी आहे त्या परिस्थितीला तोंड देणं किंवा त्याविरोधात आवाज उठविणं हे दोनच पर्याय समोर असतात.

त्यात जर स्त्री कमावती असेल, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल तर घर सोडून दुसरीकडे जाऊ शकते अथवा घटस्फोटाचा विचार करू शकते. पण गावात किंवा खेड्यासारख्या ठिकाणी बहुतांश स्त्रियांना सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसतात. शिवाय आपण जर घर सोडून बाहेर पडलो तर आपलीच जास्त बदनामी होईल, ही भीती त्यांना सतावित असते. गावा-खेड्यातील स्त्रियांची हीच परिस्थिती बदलण्यासाठी ‘ग्रीन गॅग’ ची स्थापना झाली.

काय करते ही ‘ग्रीन गँग’? तर गावातील एखादया महिलेनं तिच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तक्रार केल्यास या टोळीतील १५-२० महिला हातात बांबूच्या काठ्या घेऊन तिच्या घरी जातात. बहुतांश वेळेला हा अन्याय तिच्या पतीकडून होत असतो. त्यामुळे त्याला योग्य त्या भाषेत समज दिली जाते. आणि तरीही न ऐकल्यास पोलिसी खाक्या दाखविला जातो. परिणामी, घरातील त्या पीडित महिलेला न्याय मिळण्यास मदत होते.

साधारणपणे २०१५च्या आसपास हिंदू बनारस विद्यापीठाचे रवी मिश्रा आणि काही विद्यार्थ्यांनी मिळून उत्तर प्रदेशातील वाराणशी परिसरातील काही गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्याच्या हेतूनं काही शिबिरांचे आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांना असे दिसून आलं की, गावातील बहुतांश पुरुष हे दारू-जुगार यांसारख्या व्यसनांच्या आहारी गेले आहेत. आणि दारू पिऊन घरातील स्त्रीला मारहाण करणं हे नित्याचं आहे. शिवाय घरातील पुरुषधारी मंडळींना जुगार खेळताना पाहून अनेक बाल वयातील मुलंदेखील जुगार खेळू लागली होती. लहान वयातच जुगार-दारूचे व्यसन लागले तर पुढे ते सोडविणं कठिण होऊन बसते, ही बाब ओळखून गावातील काही निडर स्त्रियांना हाताशी धरून एका गटाची स्थापना केली. या महिलांना पोलीसांची मदत घेऊन एक विशेष स्वरूपाचं प्रशिक्षण देण्यात आलं. आरोग्य, समृद्धीचे प्रतिक असलेला हिरवा रंग. म्हणून या महिलांचा हिरवी साडी हा मुख्य पोशाख ठरला.

एखाद्या महिलेची तक्रार येताच, ही महिलांची टोळी मग प्रदेश तिच्या घरी जात असे. आणि प्रकरणाचा निकाल लावत असत. हा गट स्थापन करण्यामागे पीडित महिलेला तिच्या गावातच तात्काळ मदत मिळेल आणि त्यासाठी तिला वणवण हिंडावं लागणार नाही, हा हेतू त्यामागे होता. त्याचबरोबर घरातल्या गोष्टी पोलिसांपर्यंत जाऊ नये, म्हणून अनेक स्त्रिया स्वत;वर होणारा अत्याचार निमूटपणे सहन करीत असत. पण ‘ग्रीन गँग’ मुळे आपण आपलं दु:ख एका मैत्रीणिसमोर मांडत आहोत, असा विश्वास गावातील महिलांमध्ये निर्माण झाल्यामुळे, होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी महिला पुढे येऊ लागल्या. हे या गटाचं यश आहे.

पीडित महिलेला न्याय देण्याबरोबर, गावात बेकायदेशीरपणे दारू विक्री चालत असेल तर अशा ठिकाणी ही ‘ग्रीन गँग’ जाऊन आपल्याजवळील काठीनं या दारूच्या बाटल्या फोडतात. त्याचबरोबर जुगाराचे अड्डे दिसल्यास तेथील व्यक्तींना पोलिसांमार्फत अटक करतात. याच जोडीनं बालविवाह, हुंड्याची समस्या, भ्रूणहत्या, छेडछाड याविरोधातदेखील त्यांचा लढा सुरू असतो.

याव्यतिरिक्त दरवेळी धाकानंच नाही तर समुपदेशनाव्दारेदेखील समस्या सोडविण्यावर त्यांचा भर असतो. काही महिलांपासून सुरू झालेल्या या गँगमध्ये आता सुमारे १५,००० हून अधिक महिला सभासद झाल्या आहेत. या गटाची कामकाजाची पद्धत आणि त्यांचे यश लक्षात घेऊन उत्तरप्रदेश सरकारने आपल्या ‘मिशन शक्ती’ या महिला सुरक्षेसाठी राबविल्या जाणाऱ्या गटात ‘ग्रीन गँग’चा समावेश केला आहे. परिणामी, पोलिसांची मदत घेऊन कमी वेळात एखाद्या समस्येचं निराकरण होत आहे. या गटातील महिलांमुळे गावातील अनेक महिला साक्षर बनण्यासाठी पुढे येत आहेत. आज शिकण्याबरोबर स्वत:चं बँक खाते उघडण्यापर्यंत गावातील महिलांची प्रगती झाली आहे. एक काळ असा होता की, घरातील अथवा शेतीचं व्यवहार हे पुरुष मंडळी बघत. पण आता हा व्यवहार त्यात महिलांसाठी असलेले अधिकार आदीबाबत जाणून घेण्यासाठी गावातील महिला पुढे येत आहे. संघटनेची ताकद काय असते, हे या ‘ग्रीन गँग’ नं वाराणसी आणि आसपासच्या परिसरातील अनेक गावांमध्ये आपल्या कार्यामार्फत दाखवून दिलं आहे.