भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
आपल्या भारतीय त्वचेचा विचार केल्यास वेगवेगळ्या ठिकाणचे भौगोलिक पर्यावरण, हवामान, आहार-विहार, सामाजिक घडण, राहणीमान, दिनचर्या, सवयी, प्रदूषण यावर त्वचेचा पोत, रंग अवलंबून असतो. प्रत्येक त्वचेचा रंग, त्वचेमध्ये तयार होणारे मेलानिन रंगद्रव्य, हिमोग्लोबिन, सूर्याची अतिनील किरणे शोषण्याची ताकद या जैविक घटकांवर अवलंबून असते. पूर्व आशियाई लोकांमध्ये त्वचेतील हायपोडर्मिस त्वचेला अतिरिक्त पिवळ्या रंगाची झाक देते. त्यामुळे त्यांचे रंग पिवळसर निमगोरे दिसतात. आपल्याकडे उजळ गोरा, निमगोरा, फिकट मध्यम गव्हाळ, गडद तपकिरी अशा विविध छटा आहेत. जनुकीय अभ्यासातून असे निष्कर्ष आहेत की काही ठराविक जनुके भारतीय त्वचेच्या रंगांमधील वैविध्य ठरवतात.

भारतीयांना त्वचा उजळण्याची गरज का वाटते?

भारतीय सौंदर्यप्रसाधन बाजारपेठ ८-१६ अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढ्या प्रचंड मूल्याची आहे. ही बाजार पेठ भारतीय ग्राहकांना अक्षरशः आपल्याकडे खेचत आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती आणि फिल्म इंडस्ट्रीकडून गोऱ्या त्वचेचे उदात्तीकरण केले जाते, त्याचा परिणाम लोकांच्या मानसिकतेवर होतो. गोरी त्वचा सौंदर्य, आत्मविश्वास वाढवते अशा जाहिरातींचा सतत मारा चालू असतो. त्वचा गोरी असेल तर आकर्षक वाटते, लग्न जमते त्यामुळे त्वचेचा रंग उजळण्याचा दबाव वाढतो, अशी मानसिकता, कल्पना यामागे आहे. पण भारतीय परंपरेचा विचार केला तर बाह्य शरीर नाही अंतर्मन सुंदर हवे असाच विचार सर्व संतांनी, विचारवंतांनी बोलून दाखवला आहे. आपण ‘चेहरा सुंदर हवा’ बाकी आतून कसेही चालेल! एवढे उथळ महत्त्व कधी देत नव्हतो तर आंतरिक उर्मी, ऊर्जा, शक्तीचे संवर्धन याचीच जोपासना करण्याची भारतीय परंपरा आहे.

भारतीयांना त्वचेच्या काही समस्या असू शकतात जसे रंगद्रव्य कमी/ जास्त होणे- कोड, गुलाबी, तांबूस, पांढरे ठिपके, दाद, खरुज, नायटा, इसब आणि इतर गंभीर त्वचारोग होणे. त्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सहाय्याने औषधोपचार घेणे उचित आहे.

परंतु ७०% लोकांना त्वचा उजळण्याच्या क्रीममध्ये स्टेरॉइड असतात हे माहीत नसतं. त्यातला मूळ घटक माहीत नसतो. त्याचे दुष्परिणाम याबाबत निम्मे लोक अनभिज्ञ असतात. बहुमांश लोक दूरचित्रवाणी जाहिराती, ऑनलाइन, सोशल मीडिया जाहिराती पाहून, सेलिब्रिटींचे विडियो पाहून दुकान, मॉलमधून सौंदर्य प्रसाधने खरेदी करतात. डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय खरेदी करतात, पण त्वचारोगतज्ज्ञाकडे जाऊन प्रिस्क्रिप्शन आणून त्वचा उजळण्याची औषधे घेत नाहीत. त्वचारोगतज्ञ आपल्या भारतीय त्वचेला साजेसे औषध देतील ना? पण नाही लोक जाहिरातींना भुलतात. परंतु या औषधांचा गंभीर दुष्परिणाम झाला की मात्र त्वचारोगतज्ञाकडे धावतात. त्वचेला बाहेरून किती काही लावा ती उजळत नाही. बाहेरून उजळवण्यापेक्षा आत शरीरात- पोटात काय घेतो? काय आणि कसे अन्न खातो? सर्व रंगीत भाज्या, फळे, डाळी, कडधान्ये, तैल बिया असा चौरस आहार घेतो का? किती झोप घेतो, पाणी किती पितो, पोट नीट साफ होते का? पाळी नियमित येते का? या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे त्वचा उजळते आणि निरोगी राहते.

त्वचेसाठी कुठलीही क्रीम खरंच आवश्यक आहेत का?

क्रीम्सपेक्षा दिवसाला ३-४ लिटर पाणी पिणे, पौष्टिक आहार आणि योग्य झोप यामुळे त्वचा जास्त नैसर्गिकरित्या चमकते. गोरेपणा देणारी क्रीम्स त्वचेसाठी आवश्यक नसतात आणि अशा उत्पादनांपेक्षा नैसर्गिक काळजी घेणे कधीही चांगले. ताणतणावमुक्त राहणे हे त्वचेच्या आरोग्यासाठी नैसर्गिकरित्या खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर उन्हात जात असाल आणि तुमची त्वचा कोरडी असेल, आपल्याकडे दमट, उष्ण हवामान असते तिथे सतत घाम येत असतो अशा ठिकाणी मॉइश्चरायझर अजून चिकट, तेलकटपणा देतं. कोरड्या हवामानात त्याचा विचार करावा. आपल्याकडे प्रखर ऊन असलं तरी आपल्या त्वचेमध्ये मेलानिन रंगद्रव्य मुबलक प्रमाणात असतं तेच नैसर्गिकपणे सनस्क्रीनचे काम करत असतं. महागड्या ब्रँड्सच्या मागे धावण्याऐवजी साधे आणि योग्य उपाय करावेत. चंदन, मध, हळद, पपई आणि कोरफड यांचा आहारात वापर केला की त्वचेला हायड्रेट करतो आणि रंग उजळण्यास मदत करतो. जाहिरातीत दाखवलेले खायचे पदार्थ सौंदर्य प्रसाधनात किती(?) वापरले असतात त्याऐवजी ते खाण्यात, आहारात घेतले तर निरोगी त्वचेसाठी फायदेशीर ठरतील.

त्वचेसाठी स्टेरॉइडविरहीत कुठली क्रीम आहेत?

विटामिन सी, हायड्रोक्विनोन, कोजिक ॲसिड, नियासिनमाइड, ग्लायकोलिक ॲसिड हे घटक असलेली क्रीम आहेत.

कशी काम करतात?

त्यांचे उपयोग त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन रोखून काळे डाग आणि टॅनिंग कमी करणे, त्वचेची चमक वाढवणे आणि काळे डाग फिके करणे, त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करणे, त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी आणि हायपरपिगमेंटेशन कमी करण्यासाठी वापरले जाते.

दुष्परिणाम :

हे मेलॅनिन कमी करून त्वचा उजळतात, पण त्यांचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. मुख्य दुष्परिणामांमध्ये त्वचेची जळजळ, लालसरपणा, त्वचा पातळ होणे, कायमचे डाग पडणे आणि ॲलर्जी होऊ शकते. हायड्रोक्विनोनचा अतिवापर केल्यास त्वचा कायमस्वरूपी निळी-काळी आणि जाड होऊ शकते. क्रीम लावल्यास खाज सुटणे किंवा त्वचा सोलणे असे त्रास होऊ शकतात. काही स्वस्त किंवा आयात केलेल्या क्रीममध्ये पारा असतो, ज्यामुळे किडनी आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

त्वचेचे कॉर्टिकोस्टेरॉइड क्रीम कशा साठी वापरतात?

त्वचेवर लावायचे कॉर्टिकोस्टेरॉइड दाहक, जळजळ करणारे, खाज/कंड सुटणे या त्वचारोगांसाठी वापरतात. सोरायसिस, कोड, इसब, एटोपिक डर्माटायटीस, क्ष-किरण त्वचारोग, गजकर्ण व इतर त्वचारोगांसाठी वापरले जाते.

कसे काम करतात?

त्वचेवर लावायची कोर्टिकोस्टिरॉइड्सची दाहक-विरोधी (anti-inflammatory), अँटी-मायटोटिक (पेशी विभाजन रोखणारे) आणि रोगप्रतिकारशक्ती कमी करणारे गुणधर्म आहेत. दाहक-विरोधी काम कसे करते तर, रक्तवाहिन्यांचे आकुंचन करून, फॉस्फोलिपेज ए2 एन्झाइमच्या निर्मितीला अटकाव करणे आणि डिएनए व दाहक ट्रान्स्क्रिप्शन घटकांचा (inflammatory transcription factors) अटकाव करते. त्वचेमधील रक्तवाहिन्यांच्या आकुंचनामुळे, त्या भागात पोहोचणारा दाह कमी होतो. या दाहक-विरोधी परिणामामुळे ‘लिपोकॉर्टिन’चे संश्लेषण होते, जे फॉस्फोलिपेज ए2 ला रोखते, त्यामुळे प्रोस्टाग्लँडिन आणि ल्युकोट्रिएन्सचे उत्पादन कमी होते.

कोर्टिकोस्टिरॉइड्स थेट डिएनएवर काम करून दाहक-विरोधी जनुकांचे कार्य वाढवतात आणि अप्रत्यक्षपणे NF-kB सारख्या दाहक ट्रान्स्क्रिप्शन घटकांना अटकाव करतात, त्यामुळे दाहक-जनुकांचे (pro-inflammatory genes) कार्य कमी होते. कोर्टिकोस्टिरॉइड्सच्या रोगप्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या गुणधर्मामुळे, दाहक प्रतिसादातील (inflammatory response) ह्यूमरल घटक (humoral factors) रोखणे आणि सर्व रोगप्रतिकारक पेशींचे फलन, विभाजन आणि प्रसार रोखते. म्हणून हे सर्व धोक्याचे लक्षण आहे शरीरासाठी. त्वचेसाठी काही लावले तर ते फायदेशीर ठरत नाही, उलट अपायकारकचं ठरते.

त्वचेचे कॉर्टिकोस्टेरॉइड क्रीम वापराचे धोके!

ज्या महिला कॉर्टिकोस्टिरॉईड क्रीमचा गैरवापर सौंदर्य प्रसाधन म्हणून त्वचा उजळण्यासाठी करतात त्यांना अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते. मुरुमांसारखे पुरळ, त्वचेवरील लाल रेषा, त्वचेचा रंग बदलणे, शरीरावर अतिरिक्त केस वाढणे, तोंडाभोवतीची त्वचा दाह, छुपा बुरशीजन्य संसर्ग हे सगळे त्वचेचे विकार स्टिरॉइड क्रीमच्या चुकीच्या किंवा दीर्घकाळ वापरामुळे उद्भवतात.

अजून काही धोके!

शरीरातली कॉर्टिसॉल हार्मोनची मात्रा झपाट्याने कमी होते, एड्रिनल ग्रंथीचा पुरवठा अपुऱ्या प्रमाणत होतो. कॉर्टिसॉलची कमी झालेली मात्रा शिवाय एड्रिनल ग्रंथीचा अपुरा पुरवठा, दोन्ही धोक्याचे आहे त्यामुळे थकवा, स्नायूंना कमकुवतपणा, नैराश्य, आणि उपचार नाही केले तर कोमा किंवा मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. त्याचे इतर दुष्परिणाम त्वचा खराब होणे आणि दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात वापर केला तर अधिक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून कॉर्टिकोस्टिरॉईड क्रीमचा गैरवापर न करण्याविषयी व त्याच्या दुष्परिणामाविषयी महिलांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ वापरले तर शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनवर गंभीर परिणाम होतात. कॉर्टिसॉल हार्मोन तणाव नियंत्रण, चयापचय, रोगप्रतिकार शक्तीचे काम करते.

प्रचंड मोठी बाजारपेठ

भारतातील फेअरनेस क्रीमची बाजारपेठ विशाल आहे. २०२३ पर्यंत ५,००० कोटी रुपयांपर्यंत होती. त्वचेवर लावण्यासाठीच्या स्टेरॉइड्सच्या एकूण विक्रीपैकी ८५% विक्री ही त्वचा उजळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिश्रणांची असते.

अनेक क्रीम्स, ज्यांची कधीकधी हर्बल किंवा आयुर्वेदिक गोरेपणा वाढवणाऱ्या क्रीम्स म्हणून खोटी जाहिरात केली जाते, त्यांमध्ये गुप्तपणे क्लोबेटासोल प्रोपिओनेट, मोमेटासोन फ्युरोएट किंवा फ्लुओसिनोलोन सारखे शक्तिशाली स्टिरॉइड्स असतात. टॉपिकल कॉर्टिकोस्टिरॉइड्सचा गैरवापर अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केला जातो, ज्यामुळे प्रतिकूल औषध प्रतिक्रियांचे प्रमाण वाढते.

सुज्ञ विचार

स्टेरॉइड क्रीम म्हणजे तत्काळ आराम देणारा शॉर्टकट वाटू शकतो, पण त्याची किंमत त्वचेला दीर्घकाळ मोजावी लागू शकते. गोरेपणा, खाज कमी होणे किंवा डाग पटकन जाणे- या मोहात आपण त्वचेचे नैसर्गिक संतुलन बिघडवत आहोत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. सुजाण स्त्री म्हणून काय लावतेय? याचा विचार करणे हीच खरी सौंदर्याची सुरुवात आहे. डॉक्टरांचा सल्ला, संयम आणि योग्य काळजी- हीच सुरक्षित त्वचेची गुरुकिल्ली. त्वचेला तात्पुरती चमक नव्हे, तर दीर्घकाळ निरोगी ठेवण्याचा निर्णय आजच घ्या.

(लेखिका औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक आहेत)
phadkebhagyashri@gmail.com