scorecardresearch

आहारवेद : बीजांडकोशाची सूज घालविणारे कारले

पित्त, वात आदींपासून ते महिलांच्या बिजांडकोशाच्या विकारांपर्यंत सर्वत्र कारले गुणकारी आहे.

आहारवेद : बीजांडकोशाची सूज घालविणारे कारले
कारले हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानच आहे


डॉ. शारदा महांडुळे
चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले भारतात सर्वत्र पिकते व अतिप्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. संस्कृतमध्ये कंदुरा (करवल्ली), हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये कॅरीला फ्रुट किंवा बिटर गार्ड म्हणून ओळखले जाणारे कारले ही वनस्पती कुकरबिटेसी या कुळातील आहे. कारली हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी होतात. कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असेही दोन प्रकार आढळतात.

आणखी वाचा : य़शस्विनी : २१ हजार फूट उंचीवर लिंगभेदाला मूठमाती… कशी, ते जाणून घ्या !

औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार कारली पित्तशामक, वातानुलोमक, कृमिघ्न व मूत्रल आहेत. कारल्याची पानेही ज्वरनाशक, कृमीनाशक व मूत्रल आहेत. कारल्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात तर ‘ब’ जीवनसत्त्व थोड्या प्रमाणात असते. या सर्व औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तीवर्धक, पुष्ठीकारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.

आणखी वाचा : मी सून आहे म्हणून सासूने मला मध्यरात्री…

उपयोग :
० कारल्यांच्या पानांचा तीन चमचे रस एक ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. या सोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीसे होतात.
० खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर लिंबूरस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्तशुद्ध होते व पर्यायाने त्वचा विकार कमी होतात.
० मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्यांचे बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ, संध्याकाळ ५-५ ग्रॅम (अर्धा
चमचा) नियमितपणे घ्यावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते.

आणखी वाचा : भोगीची आमटी : एक चवदार आठवण

० जंत-कृमी झाले असतील तर कारल्याच्या पानांचा रस कपभर नियमितपणे आठ दिवस द्यावा. यामुळे सर्व कृमी शौचावाटे पडून जातात.
० दारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते. ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्यांच्या पानांच्या रस रोज सकाळ-संध्याकाळ कपभर घ्यावा.
० दमा, सर्दी, खोकला अशा श्वसन मार्गाच्या तक्रारी असतील तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे विकार दूर होतात.
० कावीळ या विकारांमध्ये ताज्या कारल्यांचा रस सकाळ-संध्याकाळ प्यावा यामुळे कावीळ दूर होते.
० यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस अत्यंत उपयुक्त असतो.

आणखी वाचा : आहारवेद : मासिक पाळीच्या विकारांवर गुणकारी- पावटा

० कारल्याच्या पानांचा कल्क, हळद, तीळ तेलात उकळून हे तेल त्वचेला लावल्यास जुने त्वचा विकार तसेच सोरायासीस हा विकार दूर होतो.
० स्त्रियांमध्ये बीजांडकोषाला सूज आल्यास कारले बी, मेथी, गुळवेल, जांभूळ बी यांचे चूर्ण करून प्रत्येकी पाच ग्रॅम (अर्धा चमचा )सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
० लघवीस त्रास होत असेल तर कारल्यांच्या पानांचा १ कपभर रस चिमूटभर हिंग घालून प्यावा.
० जुनाट ताप (जीर्णज्वर) झालेला असेल तर अशा वेळी कारल्याची पाने वाटून त्याचा रस काढावा व हा रस सकाळी व संध्याकाळी पिण्यास द्यावा.
० रातआंधळेपणाचा त्रास होत असेल, तसेच डोळ्यांना क्षीणता आली असेल तर रोज कोवळ्या कारल्यांचा रस किंवा चूर्ण सकाळी संध्याकाळी १-१ चमचा घ्यावे.

आणखी वाचा : प्राऊडली सिंगल!

सावधानता :
कारल्याचा रस हा अतिशय कडू असल्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात पिणे शक्य होत नाही अशा वेळी खडीसाखर अथवा मध घालून प्यावा. परंतु मधुमेही रुग्णांनी खडीसाखर व मधाचा वापर करू नये.
sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 07:42 IST

संबंधित बातम्या