डॉ. शारदा महांडुळे

दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम, तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. लांबट बाटलीच्या आकाराची फिक्या हिरवट रंगाची, आतून पांढऱ्या स्पंजसारखी आणि लांबचौकोनी बियांनी युक्त ही फळभाजी सर्वांनाच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. संस्कृतमध्ये कर्कटी, इंग्रजीमध्ये बॉटल गार्ड, तर शास्त्रीय भाषेत कुकर बीटा मॅक्झिमा या नावाने ओळखला जाणारा दुधी भोपळा कुकर बिटेसी या कुळातील आहे. दुधी भोपळा ही वेल प्रकारातील वनस्पती असून या वनस्पतीची फुले पांढरी असतात.

Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

आणखी वाचा : आहारवेद : आजारपणातील टॉनिक- द्राक्ष

औषधी गुणधर्म
० लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आर्द्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे.

उपयोग
० दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे. हृदयविकारामध्ये रक्त वाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची ७-८ पाने, पुदिन्याची ७-८ पाने, सैंधव, जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा. यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.

० दुधी भोपळा हा धातुपुष्टीकर असल्याकारणाने गर्भवती स्त्रीने आहारामध्ये दुधीचे सेवन नियमित करावे. यामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषणही व्यवस्थित होते. तसेच गर्भावस्थेमध्ये वारंवार होणारा मलावष्टांभाचा त्रासही दूर होतो.

आणखी वाचा : आहारवेद : आरोग्यवर्धक रक्तपित्तशामक कोकम

० उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत असेल तर दुधीचा रस खडीसाखर घालून प्यावा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.

० स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे. या सूपाला सैंधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटकही मिळतात.

० अतिउष्णता, जुलाब, आम्लपित्त, मधुमेह, अति तेलकट खाणे यामुळे जर वारंवार तहान लागत असेल, तर अशा वेळी ग्लासभर दुधीचा रस चिमूटभर मीठ घालून घ्यावा. यामुळे घामातून शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात. तहान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही.

० शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे. हे तेल बनविताना दुधी भोपळ्यासोबत त्याची पाने व फुलेही घ्यावीत. या तेलामुळे थंडावा निर्माण होऊन शांत झोप लागते.

० लघवीला जळजळ होत असेल तर अशा वेळी ग्लासभर दुधीरस त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून घ्यावे. यामुळे मूत्रातील अतिरिक्त आम्लाचे प्रमाण कमी होते व साहजिकच शरीराची उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.

आणखी वाचा : आहारवेद : गरोदर महिला व गर्भस्थ बाळासाठी सर्वोत्तम कोहळा

० खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणे हे एक उत्तम औषध ठरते. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते. तसेच ताप चढत असल्यास दुधी किसून कपाळावर लेप लावावा. असे केल्याने ताप उतरण्यास मदत होते.

० पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताचा तसेच उष्णतेचा त्रास होत असेल तर नियमितपणे आहारातून दुधीचे सेवन करावे. यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते.

० दुधीचे बी औषध म्हणून उपयुक्त आहे. या बिया दुधात वाटून घेतल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढून विस्मरण कमी होते. तसेच मस्तकातील उष्णता कमी होऊन मेंदूचा उत्साह वाढतो.

० अति काळजीने मेंदूचा ताणतणाव वाढला असेल व त्यातून असह्य तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर अशा वेळी १ कप दुधीचा रसामध्ये १ चमचा मध घालून घ्यावा. यामुळे डोकेदुखी थांबते.

० अति उष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असेल तसेच डोळ्यांची लाली वाढली असेल, तर अशा वेळी दुधीचा कीस कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यांवर ठेवावा व शांतपणे पडून राहावे. यामुळे डोळ्यांची उष्णता कमी होते.

० आजारपणामुळे अशक्तपणा जाणवत असेल व शरीर कृश झाले असेल, तर अशा वेळी दुधी भोपळ्याचा हलवा हा खडीसाखर, वेलदोडे, दूध, बदाम, मनुके घालून जेवणानंतर खावा. यामुळे काही दिवसांतच शरीराचा अशक्तपणा दूर होतो.

आणखी वाचा : आहारवेद : सौंदर्यवर्धक काकडी

० तळपायांना भेगा पडल्या असतील, तर अशा वेळी दुधीने सिद्ध केलेले तेल तळपायांना लावून पायात मोजे घालावे. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होऊन भेगा भरून येतात.

० आहारामध्ये नियमितपणे दुधीचा वापर करावा. अनेक जणांना तसेच लहान मुलांना दुधीची भाजी खाण्यास आवडत नाही. अशा वेळी कोशिंबीर, थालीपीठ, पराठा, हलवा, सूप अशा अनेक स्वरूपांत दुधी भोपळ्यापासून पदार्थ बनवून त्याचा वापर करावा.

सावधानता

दुधी भोपळा हा नेहमी आहारात कोवळा व ताजा वापरावा. कोवळ्या भोपळ्यामध्ये औषधी पोषक गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्याचबरोबर तो नेहमी उकडून किंवा शिजवून खावा. जुनाट दुधी भोपळा जास्त प्रमाणात किंवा कच्च्या स्वरूपात खाल्ल्यास पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते.
sharda.mahandule@gmail.com