scorecardresearch

आहारवेद: स्रियांच्या विकारांमध्ये उपयुक्त आंबा

आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. पिकलेला आंबा पोट साफ करणारा, चरबी वाढविणारा, शक्तिवर्धक आणि उत्साहवर्धक असतो.

Mangifera indica, mango
गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठीही आंबा अतिशय उपयुक्त आहे.

फळांचा राजा अशी ओळख असणारे व आपल्या आंबट-गोड चवीने व रसाळ गुणधर्मामुळेच लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय असणारे फळ म्हणजे आंबा होय. हिंदीमध्ये ‘आम’ इंग्रजीमध्ये ‘मँगो’, संस्कृतमध्ये ‘आम्र’ तर शास्त्रीय भाषेत ‘मॅन्जीफेरा इंडिका’ म्हणून आंबा परिचित आहे. आंबा हा ‘ॲनाकार्डिएसी’ कुळातील आहे. तोतापुरी, हापूस, पायरी, उत्तर प्रदेशातील दशेरी, नीलम अशा अनेक वेगवेगळ्या जातींनुसार त्याचा आकार, रंग व चव थोडाफार बदलतो. आंबा हा आहार व औषध अशा दोन्ही दृष्टीने बहुमोल आहे.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : सासर-माहेरची सांगड घालायचीय?

आपल्या परिसरात, झाडावरच पिकलेला आंबा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी हितकारक असतो. आंबा हा नेहमी ताजा खावा व शक्यतो आंबा कापून खाण्यापेक्षा चोखून खावा. कारण कापून खाल्लेला आंबा हा पचनास जड तर चोखून खाल्लेला आंबा हा पचण्यासाठी सुलभ व हलका असतो. आंबा हा हिरवट पिवळा, गुलाबी पिवळा व हिरवा अशा रंगांमध्ये पाहावयास मिळतो. लखनवी आंबा फक्त पांढऱ्या रंगाचा असतो.

औषधी गुणधर्म

कैरी व आंबा या दोन्ही अवस्थांमध्ये या फळात औषधी गुणधर्म सापडतात. कैरी ही आम्लधर्मी स्तंभक आहे. तर कैरीची साल ही कषायगुणात्मक व उत्तेजक असते. पिकलेला आंबा हा मधुर, स्निग्ध, सुखदायक, बलदायक, पचायला जड, वायुहारक, थंड, शरीराची कांती वाढविणारा, जठराग्नी प्रदीप्त करणारा असतो. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, क जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, प्रथिने, आर्द्रता, मेद, पिष्टमय पदार्थ ही घटकद्रव्ये असतात.

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मुलांच्या बोलण्यातल्या ‘बिटवीन द लाइन्स’

आंबा खाण्यापूर्वी तो थोडा वेळ थंड पाण्यात भिजू द्यावा. त्यामुळे पूर्णपणे स्वच्छ करता येतो व देठाजवळचा चिक व्यवस्थित काढून टाकता येतो.
उपयोग

  • आंब्यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे रातांधळेपणावर आंबा औषधाप्रमाणे गुणकारी ठरतो.
  • बुबुळांची शुष्कता, डोळ्यांची आग होणे, खाज येणे हे नेत्रदोष, उन्हाळ्यामध्ये नियमित आंबा सेवन केल्याने टाळता येतात.
  • एखाद्या रुग्णाचे वजन कमी असेल व त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर अशा रुग्णांस पिकलेला आंबा व त्यासोबत दूध सकाळ, दुपार, संध्याकाळ असे रोज तीनदा द्यावे. आंबा चोखून खाऊन त्यावर दूध प्यावे. महिनाभर हा प्रयोग केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढून वजनही योग्य प्रमाणात होते.
  • जर पाण्यासारखे जुलाब होत असतील तर आंब्याच्या कोयीचे चूर्ण दीड ते दोन ग्रॅम मधाबरोबर किंवा पाण्यातून घ्यावे.
  • स्त्रियांच्या विकारांमध्ये आंब्याच्या कोयीचे चूर्ण खूप उपयुक्त ठरते. अतिरिक्त स्राव, श्वेतस्राव हे विकार आटोक्यात ठेवता येतात.
  • आंबा आतड्य़ांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतो. आमांशयाच्या रोगांमध्ये आंबा औषध म्हणून कार्य करतो. आंबा खाल्ल्याने मलावस्तंभाचा त्रास होत नाही. पिकलेला आंबा पोट साफ करणारा, चरबी वाढविणारा, शक्तिवर्धक आणि उत्साहवर्धक असतो.
  • अपचनाच्या तक्रारी तसेच रक्त कमी असल्याने होणाऱ्या विकारामध्ये आंबा सेवन करणे लाभदायक ठरते.

आणखी वाचा : आहारवेद : सुदृढ हृदयासाठी अननस

  • आंब्याची कोवळी पाने रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी कुस्करून ते पाणी प्यायल्यास मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवता येतो.
  • आहारामध्ये कच्च्या कैरीचे लोणचे, मुरंबा कायम वापरावा. फक्त लोणच्यामध्ये कमीत कमी तेल, मीठ व मसाला वापरावा. तर मुरंबा बनविण्यासाठी साखरेऐवजी गुळाचा वापर करावा.
  • आंब्याची साल व्रणरोधक स्तंभक व गर्भाशयाची सूज घालविणारी आहे. आंब्याची कोय ही कृमिनाशक असून गर्भाशयाची सूज कमी करणारी रक्तप्रदर व श्वेतप्रदरावर उपयुक्त आहे. लघवीतील जंतुसंसर्ग कमी करून मूत्रप्रवृत्ती साफ करणारी आहे.

सावधानता –

मधुमेह असणाऱ्यांनी, अतिलठ्ठ व्यक्तींनी आंबा खाऊ नये किंवा अगदी कमी प्रमाणातच खावा. कारण आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. कच्च्या कैऱ्या फार खाऊ नयेत, त्यामुळे घशात खवखव व अपचन, जुलाब, पोटदुखी या तक्रारी उद्भवतात. आंबा हा नैसर्गिक पद्धतीने पिकविलेलाच खावा. रासायनिक पद्धतीने पिकविलेला आंबा हा आरोग्यास घातक असतो.

sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 22:19 IST

संबंधित बातम्या