दिप्ती शिंदे-दळवी
‘गगनचुंबी इमारतींमध्ये फक्त एकाकीपण असतं!’ – काहीच दिवसांपूर्वी नोएडातील एका महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिने केलेलं हे विधान आहे. या विधानाद्वारे शब्दबद्ध केलेला अनुभव हा फक्त नोएडामधील एका गृहनिर्माण सोसायटीची समस्या नाही; तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, बंगळूर, सुरत, कोलकाता, इत्यादींसारख्या अनेक मोठ्या आधुनिक शहरांमधील नागरी जीवनाचं एक तीव्र आणि खेदजनक वास्तव आहे. आज आपण इमारती बांधताना मजल्यांवर मजले चढवत आहोत; मजले एकमेकांना जोडत आहोत. पण विविध मजल्यांवर राहणारी माणसं जोडली जात आहेत का, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे.
सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये उच्चभ्रू high-rise सोसायट्यांमधील geographical proximity without emotional connection- म्हणजे भौगोलिक स्तरावर जवळीक असूनही भावनिक जवळीकतेचा अभाव- हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो. याच अनुभवावर आपण आज भारतीय स्त्रियांच्या बाजूने चर्चा करू.
काही वर्षांपूर्वीपर्यंतचा काळ आठवला; त्यातील चाळसंस्कृती आठवली की आपल्या नजरेसमोर येतात- एकाच मजल्यावरील १५-२० घरं (ज्यांना आधी खोल्या म्हणत असत); त्यांची २४ तास उघडी असणारी दारं, सकाळ-संध्याकाळ एका घरातून दुसऱ्या घरामध्ये सुरू असलेली खाद्यपदार्थांची देवाघघेवाण आणि खाद्यपदार्थांसोबत विचार, भावना, मतं, सुखदुःखं यांची होणारी देवाणघेवाण.
पण गेल्या काही वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. आता चाळी, बीआयटी चाळी आणि एकूणच चाळसंस्कृती राहिलेली नाही. आजकाल नवीन इमारतींमध्ये एका मजल्यावर फारात फार ६-७ कुटुंबच राहत असतात आणि त्यातही ही कुटुंबं विभक्त कुटुंबपद्धती अनुसरणारी असतात. त्यामुळे एका मजल्यावरील किमान २-३ घरांचे दरवाजे हे दिवसातील किमान १२-१३ तास बंदच असतात; तर ज्या घरांमध्ये सेवानिवृत्त किंवा वृद्ध माणसं राहतात, त्यांनाही त्यांचा वेळ घालवायला घरात टीव्ही लावून बसण्यापलीकडे किंवा फोनवर आपल्या नातेवाईकांशी गप्पा मारण्यात वेळ घालवण्यापलीकडे किंवा आजकाल वाढलेल्या सोशल मीडियाच्या वापरामुळे सोशल मीडिया वापरण्यापलीकडे पर्याय नसतो.
आज आपण एकमेकांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करतो; एकमेकांचे स्टेटस व्हॉट्सॲपवर पाहतो; इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्टोरीजसुद्धा पाहतो, पण आपण दिवसातून किती जणांना ‘तू कसा/कशी आहेस? सगळं ठीक आहे ना?’ हे विचारतो. हा आताच्या काळातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. (आज जिथे आपल्याला स्वतःला स्वतःचीच विचारपूस करण्यासाठी वेळ नाहीये, तिथे आपण इतरांची विचारपूस करायला वेळ, बौद्धिक आणि भावनिक ऊर्जा कोठून उसनी आणणार, हा मोठा यक्षप्रश्न आहे!)
भावनिक एकाकीपण हा सद्यस्थितीचा कदाचित सर्वात मोठा घटक असावा जो आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करत आहे. आणि या भावनिक एकाकीपणाला नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणारी मंडळी आणि दिवसभर घरात राहणारी मंडळी – हे दोन्ही वर्ग तितक्याच तीव्रतेने सामोरे जात आहेत. आणि ह्याला स्त्रीवर्गही अपवाद नाही.
स्त्रीच्या बाबतीत भावनिक एकाकीपण ही समस्या केवळ ‘मला बोलायला कोणी नाही, माझी सुखदुःखं शेअर करायला कोणी नाही’, एवढ्यापुरतीच मर्यादित नसते. गृहिणी असो, खाजगी किंवा सरकारी आस्थापनांमध्ये काम करणारी नोकरदार स्त्री असो किंवा एक उद्योजिका असो- तिच्यावर अनेकदा फक्त तिच्याच नाही तर तिच्या आजूबाजूच्या अनेकजणांच्या भावनिक स्वास्थ्याची अदृश्य आणि अलिखित जबाबदारी असते. तिच्यासमोर तिच्या बुद्धीचा आणि भावनिक परिपक्वत्तेचा कस लावणारे अनेक प्रश्न दरदिवसाला आ वासून उभे असतात – मुलांच्या शाळेचं काय, घरातील वृद्धांची काळजी कोण आणि कशी घेणार, घरकाम करणारी व्यक्ती आली नाही तर काय होईल, आपला नवरा आज ऑफिसमधून उशिरा घरी आला तर घरातील कामांचं व्यवस्थापन कसं करायचं किंवा अचानक काही एमर्जन्सी आली तर शेजारी कोणाला फोन करायचा, असे एक ना दोन अनेक प्रश्न गृहिणी, नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या डोक्यात सतत पिंगा घालत असतात. म्हणूनच स्त्रीला तिच्या आजूबाजूला किती लोक किती वेळासाठी आहेत यापेक्षा किती लोक किती वेळासाठी तिच्या’सोबत’ आहेत, यातील फरक नेहमीच तीव्रतेने जाणवत असतो. एखाद्या स्त्रीसाठी फक्त माणसांची संख्या महत्त्वाची नसते, तर बऱ्याचदा आजूबाजूला उपस्थित माणसांच्या विचार, भावना, समंजसपणा, मानसिक आधार देण्याची वृत्ती यांची गुणवत्ताही महत्त्वाची असते.
हाय-राईज सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, ॲक्सेस कार्ड, इंटरकॉम, गेट इंट्री असते. पण कोणत्याही स्त्रीसाठी सुरक्षितता म्हणजे फक्त अनोळखी व्यक्ती घराच्या किंवा सोसायटीच्या आत येऊ न देणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही आहे. कोणत्याही स्त्रीला फक्त शारीरिक सुरक्षितता महत्त्वाची नसते, तर तिच्यासाठी भावनिक आणि वैचारिक सुरक्षितताही महत्त्वाची असते. शारीरिक सुरक्षितता म्हणजे- ‘मला काही झालं तर मला मदत करायला कोण येईल’, हा विचार! एक स्त्री घरात एकटी असेल आणि तिची अचानक तब्येत बिघडली किंवा रात्री एखादी एमर्जन्सी आली तर सुरक्षा व्यवस्था तिच्या मदतीचा एक भाग असू शकतो; पण ही अत्याधुनिक सुरक्षायंत्रणा मानवी नात्यांची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. आणि म्हणून आधुनिक सोसायट्यांना सुरक्षा सुविधांसोबत मानवी संबंधांच्या सुविधांचीदेखील आवश्यक आहे.
भारतातील शहरीकरणामुळे घर, सुविधा, दळणवळण आणि खाजगी अवकाश यांचं महत्त्व वाढलं आहे – स्वतंत्र फ्लॅट म्हणजे स्वातंत्र्य. स्वतंत्र स्वयंपाकघर म्हणजे स्वायत्तता. स्वतंत्र बेडरूम म्हणजे खाजगीपण… प्रत्येक व्यक्तीला, पर्यायाने प्रत्येक स्त्रीलाही ही खाजगीपण एका मर्यादेपर्यंत मिळणं तिच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचं असलं तरी जेव्हा याच खाजगीपणाचं रूपांतर सोशल विड्रॉअल म्हणजेच सामाजापासून दूर जाण्यात होते. तेव्हा त्याची किंमत त्या स्त्रीला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंबंधीच्या समस्यांच्या रूपात मोजावी लागू शकते.
आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीला प्रत्येक गोष्ट बाजारातून विकत घेता येते- फुड डिलिव्हरी, पाळणाघर, मदतनीस, वाहतुक व्यवस्था, मनोरंजन… पण एक गोष्ट विकत घेता येत नाही- विश्वासाचं नातं! आर्थिक समृद्धीने सुविधा निर्माण होतात; पण समुदाय निर्माण करण्यासाठी वेळ, परस्परता आणि सहभाग आवश्यक असतो.
स्त्रियांच्या बाबतीत समाज संघटन हा फक्त मनोरंजनाचा विषय नाही आहे. एक लहानसं महिलांसाठीचे मदत गट त्यांच्या अनेक समस्या कमी करू शकतं. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना भावनिक आधार, सुसंवाद, त्या सुसंवादातून अभिव्यक्तीची श्रीमंती ही जास्त आवडते.
पारंपरिकदृष्ट्या असं म्हटलं जातं की, व्यक्तीला मानसिक तणाव आला की तो एकतर Flight करतो (त्या तणावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो) किंवा त्या तणावाशी Fight करतो (त्या तणावाशी विविध मार्ग वापरून सामना करतो). शेली टेलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडलेल्या Tend-and-Befriend सिद्धांतानुसार, विशेषतः स्त्रियांमध्ये मानसिक तणावणानंतर जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधणं आणि मुलांची/आपल्या माणसांची काळजी घेणं, इत्यादी मार्गांद्वारे मानसिक स्वास्थ्याचं पुनरुज्जीवन करण्याचं वर्तन दिसून येतं.
या प्रक्रियेत अटॅचमेंट-केअरगिव्हिंग सिस्टीम, ऑक्सिटोसिन आणि रीप्रोडक्टीव्ह हार्मोन्स यांची भूमिका असते. सोप्या भाषेत सांगायचं तर – मानसिक तणाव आला तर ‘मी हे एकटीने कसं हाताळू?’ याऐवजी ‘माझ्या माणसांशी मला संवाद साधायचा आहे, बोलायचं आहे!’, ही वृत्ती पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक असते. पण याचा अर्थ पुरुषांना भावनिक आधाराची गरज नसते, असा मुळीच नाही आहे.
आणि म्हणूनच एखाद्या स्त्रीला ती केवळ एका उच्चभ्रू सोसायटीचा भाग असेल तेव्हा श्रीमंत वाटत नसतं, तर तिच्या आयुष्यात प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा गंध आणि ओलावा असणारी नाती असतील तेव्हा खऱ्या अर्थाने श्रीमंत वाटत असतं. पण सद्यस्थितीचा सगळ्यात मोठा विरोधाभास हा आहे की वाढत्या शहरीकरणामुळे, आधुनिकीकरणामुळे आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे एखादी बातमी, पोस्ट, रील एका सेकंदात असंख्य लोकांपर्यंत पोहोचते पण त्या बातमी, पोस्ट आणि रीलमागील संबंधित व्यक्तीचे खरे विचार, भावना, मत, दृष्टीकोन नेहमीच सगळ्यांपर्यंत पोहोचतात, असं नाही आहे. कारण – निव्वळ संवाद म्हणजे संबंधांशी जळणी नव्हे. स्त्रियांसाठी निव्वळ बोलणं पुरेसं नसतं. त्यांच्यासाठी अर्थपूर्ण सुसंवाद आणि त्याहीपलीकडे जाऊन जिव्हाळा आणि आत्मीयता महत्त्वाची असते.
स्त्रियांसाठी केवळ त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट, रीलवरील एक like, एक comment महत्त्वाची नसते. त्यांच्यासाठी WhatsApp group म्हणजे community नव्हे; Followers म्हणजे support system नव्हे. त्यांच्यासाठी महत्त्वाची असते-आपल्या हक्काच्या माणसांची वैचारिक आणि भावनिक उपस्थिती, विश्वास, परस्पर आदर, परस्पर मदत आणि भावनिक प्रामाणिकपणा.
जेव्हा एखादी स्त्री म्हणते, “मला खूप एकटं वाटत आहे,” तेव्हा तिला लगेच “positive राहा”, “स्वतःमध्ये रमायला शिका” किंवा “self-love करा” असा सल्ला देणं अपुरं ठरतं. कारण प्रत्येक वेळी समस्या व्यक्तीच्या मनात नसते. कधी कधी त्या स्त्रीच्या आजूबाजूच्या वातावरणातच सकारात्मक बदल घडणं गरजेचं असतं. जर एखादी स्त्री दिवसभर घरात एकटी असेल, दिवसभरात तिचं कोणाशीही अर्थपूर्ण संभाषण होत नसेल, तिच्या कामाची दखल घेतली जात नसेल आणि तिच्या मनात सतत असंख्य जबाबदाऱ्यांची जाणीव असेल, तर तिच्या एकटेपणाला ‘वैयक्तिक अशक्तपणा’ म्हणणं केवळ अन्यायकारक नाही तर अमानवी आहे.
आजच्या स्त्रियांना मग त्या गृहिणी असोत किंवा नोकरी व्यवसाय करणाऱ्या असोत; त्यांना वैचारिक, भावनिक स्वातंत्र्य जरी हवं असलं तरीही त्यांना त्यांच्या आयुष्यात अर्थपूर्ण नाती, सुसंवाद आणि खुल्या अभिव्यक्तीची गरज आहे. त्याशिवाय त्या आयुष्याचा खरा आनंद उपभोगू शकतच नाहीत.
त्यामुळे खरं सांगायचं तर- आपण उंचचउंच इमारती खूप बांधल्या. पण आता गरज आहे उंच नाती उभारण्याची- ज्या नात्यांमध्ये भावनिक आणि वैचारिक सुरक्षितता असेल. कारण स्त्रीच्या आयुष्यातील नात्यांमध्ये जर ओलावा असेल तरंच ती सर्वार्थाने सुखी-समाधानी राहू शकते. परिणामी तिचं कुटुंब सुखात-समाधानात राहू शकतं. आणि कुटुंबं सुखी-समाधानी झाली की समाज आणि पर्यायाने पूर्ण देश सुखी-समाधानी होऊ शकतो. आणि मग भारताचाही आनंद निर्देशांक (Happiness Index) उंचावायला वेळ लागणार नाही.
